Madhuri Lonkar

Children

3  

Madhuri Lonkar

Children

आई

आई

4 mins
303


आई ही आपल्या आयुष्यातील अशी व्यक्ती जीचं आपल्या बरोबरच नातं हे आपण जन्माला येण्याआधी पासूनच असतं. जगात जन्म घेण्या आधीच आपण तिच्या कुशीत जन्म घेतलेला असतो. तिच्या शरीराबरोबर जोडलेली आपली नाळ आपल्या जन्मानंतर तुटते आणि आईच्या शरीरापासून आपल्याला वेगळं करते पण तिच्या मना बरोबर जोडलेली आपल्या मनाची नाळ ती कधी तुटू शकते का ? कधीच नाही. म्हणूनच या जगात आईचं आणि मुलाचं नातं हे सर्वश्रेष्ठ मानलं जातं. आई म्हणजे सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय कारण आपल्यावर निःस्वार्थ प्रेम करणारी ती पहिली व्यक्ती असते आणि बहुदा शेवटची सुद्धा. तिच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे मदर्स डे. 


खरं तर आईचा सहवास मला थोडा कमी लाभला. माझं बालपण माझ्या आजोळी गेलं, तिथे सर्वार्थाने माझी आजी हीच माझी आई होती. कालांतराने घरी मामीचे आगमन झाले. माझ्या मामी ने ही माझ्यावर आई सारखं भरपूर प्रेम केलं. त्यामुळे मला नेहमी वाटायचं की मी खूप नशीबवान आहे की मला तीन आयांच प्रेम मिळतंय. वयोमानानुसार आजी जग सोडून गेली. तिच्या साठी आपण काहीच केलं नाही ही हुरहूर मात्र मनात राहिली.


माझ्या आईच्या सहवासात जो काही काळ मी घालविला त्यातून मी अनेक गोष्टी शिकले. तिच्या स्वभावातला कणखरपणा, न डगमगता प्रत्येक संकटाला धैर्याने सामोरे जाणे. ती कायम लढताना दिसली, रडताना तिला मी कधी पहिलेच नाही. आणि आम्हाला ही तिने हेच शिकवले "रडायचं नाही, लढायचं". तिच्या या कानमंत्राने मला ही आयुष्य जगायला खूप बळ दिलंय. वयाच्या ७३ व्या वर्षी सुद्धा तिचा प्रत्येक कामातला उत्साह अगदी दांडगा आहे. या वयातही ती कुणावर अवलंबून न रहाता अगदी स्वयंपाकापासून ते घरातील साफ सफाई पर्यंत सगळी कामे करते. रोज मनोभावे देवपूजा आणि दासबोध वाचन हे नित्याचेच तर सकाळी लवकर उठून योगा, प्राणायाम, ध्यान करणे हे कधीच चुकत नाही. त्यामुळे या वयातही ती मला माझ्या पेक्षा ही अधिक तरुण भासते. आज देवाचे खूप आभार की देवाने माझ्या आयुष्यात आईच्या प्रेमाची उधळण अगदी मुक्तहस्ते केली आहे.


आईचं भरभरून प्रेम मिळालेले अनेक या जगात आहेत पण याच प्रेमापासून खूप मुलं वंचित आहेत. आज मदर्स डे निमित्त अचानक मला अरमान आणि सानिया ची आठवण आली. पुण्यात माहेर या अनाथ आश्रमात वाढणारे हे दोघे बहीण भाऊ. त्यांचे आई वडील नाहीत किंवा कुणी इतर नातेवाईक ही नाहीत. खूपच गोड मुलं आहेत दोघेही. माझ्या बहिणीबरोबर पहिल्यांदा माहेर आश्रमात गेले. तिथे जेव्हा सानिया अरमान ला भेटले तेव्हा सुरुवातीला बोलायला दोघे ही थोडीशी लाजत होती पण नंतर मात्र अशा काही गप्पा मारायला लागली की जणू खूप जुनी ओळख आहे माझी आणि त्यांची. अरमान तर खूपच लाघवी वाटला. ७-८ वर्षांचा, अतिशय बोलके डोळे होते त्याचे. तो माझ्या आजूबाजूला असा वावरत होता जणू एखादं लहान मूल सतत आईच्या अवतीभवती रेंगाळत असतं अगदी तसा. माझ्या ओढणी बरोबर खेळण्यात त्याला मजा येत होती. गप्पा मारताना ही माझा हात हातात घेऊनच बोलत होता. मला खूप गहिवरून येत होतं. त्यांच्यासाठी आम्ही खाऊ आणि कपडे नेले होते. खूप खुष झाला ते बघून. 


आम्ही बराच वेळ त्यांच्या बरोबर घालविला, संस्थेची माहिती करून घेतली. सानिया अरमान शिवाय ही अनेक मुलांना भेटलो. प्रत्येकजण आपआपल्या कामात बिझी होता. आईवडील जवळ नसतानाही सगळी मुलं एकदम आनंदी वाटली. निघण्याची वेळ झाली. आम्ही निघालो तेव्हा अरमान आमच्या आधी गेट जवळ येऊन थांबलेला, मी गाडीवर बसून त्याला बाय करताना त्याने पुन्हा जवळ येऊन माझा हात हातात घेतला, तोंडातून शब्द निघत नव्हते पण त्याचे उदास डोळे मात्र बरंच काही बोलत होते, जणू सांगत होते की मला सोडून नको जाउ. मी घरी आले. त्यानंतर कित्येक दिवस अरमानचा चेहेरा माझ्या नजरेसमोरून जात नव्हता.


दोन तीन महिन्यानंतर पुन्हा त्याला भेटायला जायचं ठरवलं पण तो पर्यंत लॉक डाउन सुरू झालं.आजतागायत पुन्हा त्याला भेटणं झालच नाही. मध्यंतरी माझ्या बहिणेने संस्थेमध्ये फोन केला होता तेव्हा ती सानियाशी बोलली. अरमान काय करतो विचारलं तर तो झोपलाय असं तिने सांगितलं. अरमान त्या दिवशी दिवसभर उपाशी होता. नियमाप्रमाणे त्यादिवशी सकाळी पाणी भरण्याची पाळी त्याची होती. त्याचा खूप वेळ पाणी भरण्यात गेला, तो पर्यंत सकाळचा नाश्ता संपून गेला होता. थोड्या वेळाने दमून तो झोपला. जेवणाची वेळ झाली तरी तो झोपलाच होता. त्याला कुणी उठवलं ही नाही आणि तो दिवस भर तसाच उपाशी बसला होता. रात्रीच जेवला. हे ऐकल्यावर माझ्याच पोटात अगदी ढवळल्यासारखं झालं. असं वाटलं की आता अरमानची आई असती तर तिने त्याला असं उपाशी राहू दिलं असतं का ?


आज जगात अरमान सारखी अनेक पोरकी मुलं आहेत ज्यांनी कधीच आईला पाहिलं नाही, ज्यांना आईचं प्रेम माहीत नाही, आईजवळ हट्ट करणं माहीत नाही, आई जवळ रडणं माहीत नाही, आई जवळ मनातल्या भावना व्यक्त करणं माहीत नाही, कधी आई चुकलीच तर आईलाच ओरडणं माहीत नाही. ज्यांच्या वाट्याला आई आलीये अगदी खूप वर्षांपर्यंत, त्यांनी देवाचे आभार माना. आणि आई जवळ नसेल तर अरमान ची आठवण काढा, तुमचं दुःख नक्कीच कमी होईल. 


काही दिवसांपूर्वी एका काव्य स्पर्धेत विषय आला होता "कल्पनेचा कुंचला". आता या कल्पनेच्या कुंचल्यातून काय रेखाटायचं हा विचार करत असताना अरमानची आठवण आली आणि त्याच्या जागी स्वतःला ठेऊन ही कविता लिहिली.


 *कल्पनेचा कुंचला*

कल्पनेच्या कुंचल्यातून

रेखाटले चित्र आईचे

तिच्या प्रेमळ स्पर्शाचे

मायेच्या उबदार पदराचे 

नेहमीच पाहिले तिला

स्वप्नात आणि अनोख्या चित्रात

दिसली नाही कधीच ती

जीवनाच्या वास्तवात

कल्पनेच्या कुंचल्यानेच

साकारले तिचे डोळे

जाणवू लागले अचानक

भाव त्यातील विरळे

चित्रातल्या आईचं रूप

कमालीचं भावूक

घेण्यास मज कवेत

तिचे ही हात उत्सुक

कल्पनांचे मांडून खेळ

बागडले तिच्या अवती भवती

क्षणात पुसले रंग

गालावरून ओघळणाऱ्या आसवांनी

भांबावले पुन्हा मन

शोधण्या सहवास तिचा

रेखाटण्या मनःपटलावर

हाती पुन्हा कल्पनेचा कुंचला


Rate this content
Log in

More marathi story from Madhuri Lonkar

Similar marathi story from Children