Madhuri Lonkar

Inspirational

3  

Madhuri Lonkar

Inspirational

प्रेरणा

प्रेरणा

5 mins
216


कधी कधी आयुष्यात बरेचदा अगदी छोट्या प्रसंगांमधून, अनोळखी लोकांकडून आपल्याला काही शिकण्याची, आयुष्य जगण्याची प्रेरणा मिळते. मलाही मिळाली आहे, जी कायम लक्षात राहील. 


कॉलेजमध्ये असताना माझ्या जवळपास सगळ्या मैत्रिणीं कडे टू व्हिलर ( स्कुटी, कायनेटिक ) होत्या. मला सायकल छान चालवता येत होती तरीही दुचाकी गाडी चालवायची भीतीच वाटायची. कुठे ही जाण्या येण्यासाठी बस, रिक्षा असे पर्याय असल्यामुळे आपणही गाडी चालवायला शिकावं असं अजिबात वाटायचं नाही. 


लग्नानंतर ही तीच अवस्था. सगळ्या मैत्रिणी टू व्हीलर, फोर व्हीलर चालवायच्या, पण माझ्या मनात प्रचंड भीती. रस्त्यावरून जाणाऱ्या भरघाव वाहनांचा धक्का लागला तर ? अपघात झाला तर? असे कायम नकारात्मक विचार मनात यायचे. पण बाकीच्या बायकांना बघून एक दिवस ठरवूनच टाकलं की आपण ही ड्रायव्हिंग शिकायचं. मग नवऱ्याने स्कुटी घेऊन दिली आणि त्याच्याच मार्गदर्शना ने स्कुटी शिकायला सुरुवात केली. सुरुवातीला खूप भीती वाटली, कशीबशी सोसायटीच्या आवारातच शिकत होते, ते करताना नवऱ्याचा ओरडा ही खात होते हे वेगळं सांगायला नको. नवऱ्याने काही दिवस शिकवली आणि म्हणाला आता तुझी तूच एकटीने प्रॅक्टिस कर. मग दुपारच्या वेळी कामं आवरली की स्कुटी काढायची आणि सोसायटी मध्येच हळूहळू चकरा मारत बसायचं, बाहेर रस्त्यावर गाडी घेऊन जायचा धीरच होईना. एकदा सोसायटी मध्येच प्रॅक्टिस करत असताना तिथेच राहणारा बारा तेरा वर्षांचा एक मुलगा मला म्हणाला, "अहो काकू, किती दिवस झाले तुम्ही एवढीशी स्कुटी शिकताय?" त्याचं हे वाक्य वर्मी लागलं.


चेहऱ्यावर उसनं हसण्याचा आव आणत तिथून काढती स्कुटी काढली ती या निर्धाराने की उद्या काहीही झाले तरी रस्त्यावर गाडी घेऊन जायचे. मग दुसऱ्या दिवशी आजूबाजूच्या गल्लीतून सावकाश गाडी चालवून आले, त्यानंतर थोडा आत्मविश्वास वाढला. मग रोज गाडी घेऊन बाहेर पडू लागले पण जवळपासच. मुख्य रस्त्यावरून जाण्याचं धाडस अजूनही नव्हतच. आजूबाजूने जाणाऱ्या बस, ट्रक अशा मोठ्या गाड्यांची भीती वाटायची.

पुढे काही दिवसानंतर मला मगरपट्टा येथे एका ट्रेनिंग साठी जावे लागणार होते, ते ही दोन महिन्यांसाठी. आता नगर रोड वरून मगरपट्ट्याला एवढं ट्रॅफिक असणाऱ्या रस्त्यावरून ड्राइविंग करायचं म्हणजे पोटात गोळाच आला. पहिले दोन दिवस रिक्षाने गेले, पण घरी गाडी असताना रिक्षाने जाणे मनाला पटेना. मग तिसऱ्या दिवशी स्कुटी घेऊन निघाले. दोन गल्ल्या ओलांडून हाय वे जवळ आले पण हाय वे वरून भरघाव वेगाने जाणाऱ्या गाड्या बघून हातापायातलं त्राणच गेलं.


मग तिथेच बाजूला एका टपरीजवळ स्कुटी लावली आणि रिक्षाने पुढे गेले. रिक्षा पुढच्या एका सिग्नलला येऊन थांबली. माझ्या रिक्षाच्याच बाजूला कायनेटिक वर एक बाई होती. अगदी साधी साडी नेसलेली अशिक्षित बाई असावी. तिच्या गाडीच्या दोन्ही हँडल ला दोन मोठा पिशव्या अडकवल्या होत्या, पायाजवळ एक मोठी पिशवी आणि मागे एक मोठी पिशवी बांधलेली. त्यामध्ये जेवणाचे डबे होते, सगळे मिळून जवळपास ३५-४० डबे असतील. सिग्नल सुटे पर्यंत मी त्या बाईकडे बघतच बसले. ती कदाचित ऑफिस मधल्या लोकांसाठी जेवण बनवून त्यांना डबे पोहोच करण्याचं काम करत असावी. दुपारी बाराच्या उन्हात आयुष्याची लढाई जिंकण्यासाठी निघालेली ती एक वीरांगना वाटली मला. एवढं ओझं घेऊन एक साधी अशिक्षित बाई सिग्नल सुटताच भरर्कन माझ्या डोळ्यासमोरून ओझरती झाली, आणि एका मिनिटात आयुष्याचा एक धडा शिकवून गेली.


दोन तासांनी ट्रेनिंग संपवून पुन्हा रिक्षाने घरी यायला निघाले. रिक्षातून बाहेर बघत असताना, एक अपंग माणूस ज्याला एक पाय नव्हता, तो ऍक्टिवा चालवत असताना दिसला. त्याने त्याच्या कुबड्या पुढे हँडल ला टेकवून ठेवल्या होत्या आणि तो एकच पाय खाली ठेऊन गाडी बॅलन्स करत होता. हे दृश्य बघून तर मी अवाक झाले आणि स्वतःचीच खूप लाज वाटली. एवढी जिद्द, चिकाटी आपल्या मध्ये का नाही याची खंत वाटली. जिथे माझी स्कुटी लावली होती तिथे रिक्षा सोडली आणि स्कुटी घ्यायला गेले. पाहते तर स्कुटी तिथून गायब. मग तिथल्या टपरी वाल्याला विचारलं तर त्याने सांगितलं नो पार्किंग असल्यामुळे आर टी ओ वाले गाडी घेऊन गेले. आता तर मोठी पंचाईत झाली होती. नवऱ्याला फोन करून हकीकत सांगितली. त्याने सांगितलं " घरी जा, मी संध्याकाळी आलो की गाडी घेऊन येऊ." मग पायपीट करीत घरी आले. सहा वाजता नवरा आल्यावर आम्ही गाडी आणायला विश्रांतवाडी पोलिस स्टेशनला निघालो. 


नवऱ्याला म्हटलं "जाताना रिक्षाने जाऊ, म्हणजे येताना दोघांना गाडीवर येता येईल". 

त्यावर नवरा म्हणाला " अजिबात नाही, मी माझी बाईक घेतो, येताना तू तुझी गाडी घेऊन यायचं." 


मग नाईलाजाने त्याच्याबरोबर गेले. दंडाची रक्कम भरून परत निघालो. एव्हाना सात वाजले होते. रस्त्यावर खूप ट्राफिक वाढलं होतं. एवढ्या गर्दीतून गाडी घेऊन जायची भीती वाटत होती. पण नवऱ्याने धीर दिला आणि सांगितलं की हळूहळू माझ्या मागे सावकाश गाडी चालवत ये. आणि मोठया धीराने गर्दीतून गाडी घेऊन घरी आले. काहीतरी मोठी गोष्ट मिळवल्याची भावना मनात येत होती. 


रात्री झोपताना ती डबेवाली बाई आणि तो अपंग माणूस बराच वेळ डोळ्या समोरून जातच नव्हते. ते दोघे ही मला जगण्याची एक प्रेरणा देऊन गेले. त्यात जो काही प्रकार घडला त्यामुळे खूपच अपराधीपणा वाटत होता. आता काहीही झालं तरी उद्यापासून रोज गाडी घेऊन ट्रेनिंगला जायचं असा ठाम निश्चय करूनच झोपी गेले. मग दुसऱ्यादिवशी पासून रोज गाडी घेऊन जाऊ लागले. हळूहळू आत्मविश्वास वाढू लागला. काही दिवसातच मी छान गाडी चालवू लागले. 


आता गाडी चालवणं टेन्शन नाही तर आनंद, मजा देऊ लागलं होतं. त्यावेळी टी व्ही वर प्रियांका चोप्रा ची स्कुटी पेप ची जाहिरात येत होती. प्रियांका एका गुलाबी स्कुटी वरून बिनधास्त जात आहे आणि तिच्या मागे अजून काही मुली स्कुटीवरुन मजेने जात आहेत, त्यामध्ये तिचा शेवटी एक डायलॉग होता " why should boys always have a fun ?"


त्यानंतर एकदा रात्री बाहेर हॉटेलमध्ये जेवायला जाण्यासाठी मी, नवरा आणि माझा तेरा वर्षांचा मुलगा आम्ही घरातून बाहेर पडलो. निघताना मी माझ्या स्कुटीवर आणि नवरा व मुलगा त्यांच्या बाईक वर निघालो. मी स्कुटी घेऊन सुसाट वेगात अनेक गाड्यांना ओवरटेक करीत हॉटेल जवळ पोहोचले. पार्किंग मध्ये गाडी पार्क केली आणि नवऱ्याची वाट बघत थांबले. काही वेळातच तो ही पोहोचला आणि जवळजवळ मला ओरडलाच " एवढी काय घाई होती तुला? किती जोरात आलीस, थोडं सावकाश चालवत जा" 


मग मी हसून अगदी प्रियांकाच्या स्टाईलमध्ये त्याला म्हटलं " why should boys always have a fun ?"


Rate this content
Log in

More marathi story from Madhuri Lonkar

Similar marathi story from Inspirational