आई...
आई...
डोक्यावरती सूर्य आला होता. मी मी म्हणणारा सूर्य जीव खाऊन नुसती आग ओकत होता. सूर्यदेवाच ते रूप खूप भयानक वाटत होतं .त्यातून तप्त तप्त ज्वाला बाहेर निघत होत्या .जमिनीचेही ओठ सुकून त्यांना मोठमोठ्या भेगा पडल्या होत्या .तिचा घसा सूर्याच्या गरमाईने कोरडा पडला होता .गरम हवा वातावरणात होती आजूबाजूला दाट काटवान होतं.जंगलाची सुरुवात जिथून होते अशी ती जागा .अशा उन्हात कोणीही घराबाहेर पडलेलं नव्हतं .सगळीकडे भयाण शांतता होती .पक्षीही सगळे सावलीला बसून होते उन्हाचा आराम करत होते.
अशा कडक उन्हात कमळीच्या डोक्यावर सरपणाचा मोठा भारा होता .तिच्या केसातून घामाच्या धारा ओघळत होत्या आणि त्यातले थेंब जमिनीवर पडत होते .जमिनीवर थेंब पडताच त्याची वाफ होऊन दिसेनाशी होत होती .त्यावरून समजत होत की जमीन किती तहानलेली होती आणि सूर्य किती मनलावून आग ओकत होता .तिला स्वतःच अंग सगळे क्षीण झालेलं जाणवत होत .डोळे तिझे लाल झालेले होते असं वाटत होत की ती रात्रभर जागलेलीच होती .विस्कटलेले केस ,गोळा आणि मळकट झालेली साडी , दंडावर फाटलेला झंपर आणि जागोजागी सुईदोऱ्याने घातलेले टाचे ,पायात वेडीवाकडी खालून टाच उगाळलेली चप्पल हे सगळे तिझ्या गरिबीची व्यथा सांगत होते .
कमळी म्हणजे एक २७-२८ वर्षाची तरुणी जिचं लहान वयात लग्न झालं होत .पेताड नवरा तर कधीच तिला या नरक यातनेत सोडून मरून गेला होता .तिला लहान मुलगा आणि मुलगी होती .तिला हा संसार नको झाला होता पण चिमुकल्यांच्या तोंडाकडे पाहून कसेबसे दिवस लोटत होती . रोज कष्ट केल तरच घरात दोन वेळच कसबस जेवण मिळत होत .ज्यादिवशी कामाला ती जात नव्हती त्यादिवशी अक्षरशः तिझ्या घरात चूल पेटत नव्हती .तिला आणि तिझ्या त्या दोन चिमुकल्यांना पाणी पिऊनच झोपावे लागायचे .त्यामुळे स्वतःची कितीही आबदा झाली तरी ती त्या दोन जीवांची आबदा होऊ देत नव्हती .त्यांच्या मुखात दोन घास पडावेत यासाठी ती हाडाच काड करत होती .वेळप्रसंगी स्वतः पाणी पिऊन झोपत होती पण त्या चिमुकल्यांचे पोट भरत होती .त्यांच पोट भरलं की तिला वेगळाच आनंद होई .जेव्हा ते पोटभरून जेवून झोपत तेव्हा कमळा पदराचा बोळा तोंडात कोंबून तिझ्या या परिस्थितीवर रडत होती.तिझ्याकडे दुसरा काहीच पर्याय नव्हता .मिळेल ते काम करून ,सरपन विकून जे ५-१० रुपये मिळत त्यातच भागवून घेत असायची .कष्ट करून करून ती कृश झाली होती .हातपाय वाळून गेले होते .डोळे खोल खोल गेले होते .तिला अधून मधून खोकल्याच्या जबरदस्त उबाळ्या येत असायच्या .आतूनच असंख्य सुया एकाचवेळी सारख्या टोचाव्यात असं तिला होत होतं .आता तिझ्या शरीराने तिला उत्तर दिल होत .कधी कधी तर खोकल्याच्या उबाळी सोबर तोंडातून रक्त येत होत .आपण काही दिवसांचेच सोबती आहोत हे तिला पक्क समजलं होत .त्यामुळेच आपल्या माघे आपल्या चिल्यापिल्ल्यांच काय होणार या नुसत्या कल्पनेनेच तिझ्या पायाखालची जमीन सरकल्या जात होती .म्हणूनच ती तोंडात पदराचा बोळा घालून रडायची .देवाला कोसायची पण आता त्याचा काही काही उपयोग नव्हता .
आजही अशा कडाक्याच्या उन्हात दुसरीकडे काही काम मिळना म्हणून सरपणाची मोळी विकून मिळतील ते पैसे भेटतील त्यातून तिझ आणि त्या दोन लहानग्यांचे पोट भरायचे होते .आज तिझे शरीर तिला जड जड जाणवत होते .एक एक पाऊल ती बळजबरीने टाकत होती .त्यात डोक्यावर भला मोठा सरपणाचा भारा .तिला धाप लागत होती .आक्काबाई च्या दारात तो भारा टाकला आणि पदराने घाम पुसत आवाज दिला ," आक्का ,आवं ओ आक्का " सरपण आणून टाकलय बघा .या लवकर बाहीर ." मला लवकर घरला जायचंय माझी लेकरं उपाशी हायतं . तिझा आवाज ऐकत आक्काबाई बाहेर आल्या .आक्काबाई म्हणजे गावची पाटलीण .६० कडे झुकलेली .
आक्काबाई - आगं ,कमळे मरायचंय का काय तुला ?किती मोठा भारा आणलाय ?
कमळा - अहो पाटलीणबाई दोन दिस झाल्यात बघा माझी लेकरं उपाशीत .
असं म्हणताच टचकन तिझ्या डोळ्यात पाणी आलं आणि पदराने डोळे पुसत ती पुढे बोलू लागली .
कमळी - माझं मेलीच नशीबच फुटकं .नवऱ्याचं सुख नाही .लेकर हायेत त्यांच्यासाठी दिवस काढायचे .भुकेली असत्यान आता .
माझं मेलीच सारखं दुखत आसत .
असं म्हणताच पुन्हा ती रडू लागली तशी तिला खोकल्याची उबळ आली आणि ती पदर तोंडापुढे धरू लागली .
उबळ जाताच पदर रक्ताने माखून गेला होता .
आक्काबाई - आगं ,कामे हे काय ग ? रक्त आलंय तुझ्या तोंडातून .
कमळी - हो आक्काबाई ,थोड्याच दिवसांची सोबती हाय बघा मी .माझ्यामागं माझी लेकरं उघड्यावर पडतील या काळजीनं जीव रोज घाईला येतो बघा .सारा नियतीचा खेळ ह्यो .
आक्काबाई - कमळे , "तू काय बी काळजी करू नगोस ."
उद्यापासून माझ्याकड येत जा धुण्याभांड्याला तुला आणि तुझ्या लेकराला रोज दोन येळच खायला देत जाईल .येताना लेकरांना सोबत घेऊन येत जा खेळतील इथं अंगणात तर आम्हालाही बरं वाटल .तसही एवढं मोठं आंगण रिकामच आसत .त्यांना पाहून मलाही बरं वाटल .मी सांभाळत जाईल तुझं काम होऊस्तर .
आक्काबाईचं ते उदार मन पाहून जणू साक्षात देवच आपल्या मदतीला धावून आलाय की काय असं तिला वाटायला लागलं .आपण उगाच देवाला कोसत असतो असाही तिला वाटल .आक्काबाईच्या उदार मनाने आणि सहानुभूतीच्या बोलण्याने ती सुखावली होती .तिला तिझ दुखणं कुठच्या कुठं पळून गेल .तिझा जीव आता सुखावला होता .तिला माहित होत की पाटलीण निपुत्रिक होती माझ्यामाग ती माझ्या लेकरांना स्वतःच बनून घेईल .
आक्काबाई - आगं काय इचार करतेस एवढा ?
आवाज येताच कमळा विचारचक्रातून बाहेर येते .
कमळी - हो .उद्यापासून यील बघा .
आक्काबाई - थांब .म्या तुला भाकरी आणि उलशीक भाजी देते .तू बी खा आणि लेकरास्नी पण खाऊ घाल .
आक्काबाईच्या ही डोळ्यात वेगळीच चमक जाणवत होती .त्यांनी घरातून २-४ भाकरी आणि भाजी दिली .कमळाने तिझे पाय धरले दोघीनी एकमेकांच्या मनातला कौल ओळखला होता .
आता कमळीने सुटकेचा नि:श्वास सोडला .ती बिनघोर होऊन शरीर त्यागायला तयार होती .आता ती लगबगीने आवरू लागली .तिला तिझ्या लेकरांची ओढ लागली होती .तिन भाकरी आणि भाजी घेऊन घरचा रस्ता पकडला .आता सायंकाळची वेळ होत आली होती .
कमळा झपझप पाऊल उचलत होती .अंधार हळूहळू दाटू लागला होता .घर जसजस जवळ येत होत तशी तिझी नजर लेकरांना बघण्यासाठी आतुर झालेली होती .तिच्या डोळ्यात चांगलीच चमक होती .मुले दरवाजात बसली होती आईची वाट बघत.
आईला पाहिलं तशी मूलही टवटवीत दिसायला लागली .
आता अंधार किर्र झाला होता .मुलांना घेऊन ती आत गेली .दिवा लावला तसा उजेड घरभर धिंगाणा घालायला लागला .त्या मिणमिणत्या उजेडात त्या चिमुकल्यांची तोंड आनंदाने बहरून आली होती आईला पाहून चेहरा सुखावला होता .आईने आता खायला आणलं त्याने त्यांचा आनंद द्विगुणित झाला होता .आज पहिल्यांदाच त्यांना भाकरी खायला भेटणार होती त्यांच्यासाठी ती दिवाळीच होती .आईने सगळ्यांना ताट केलेली होती .आज पहिल्यांदा आई त्यांच्या सोबत जेवणार होती .रोज लेकरांना कमी पडू नये म्हणून ती पाठीमाघून जेवायची पण आज तसं नव्हतं होणार आज ती तिझ्या मुलांसोबत जेवणार होती त्यांना बघत बघत आपल्या मायेची आणि पोटाची खळगी भरत होती .एखाद्या आत्ताच्या सिनेमाला लाजवणारा प्रसंग त्या छोट्याश्या झोपडीत चालू होता .सुवर्ण अक्षरांनी लिहिला जावा असा तो प्रसंग .आता सगळ्यांची पोट भुकेने तर भरली होती पण एकमेकांच्या डोळ्यात आणि हृदयात साठवायला प्रेम कमी पडत होत .
आता झोपायची वेळ झाली .आईने ती दोन्ही लेकरं आपल्या जवळ घेतली आता तिला उद्यापासून पाटलीणबाईकडे काम होत .पोरांना उद्यापासून दोन्ही वेळच पोटभर जेवण भेटणार होत .ती आनंदाने नाचणार बागडणार होती .तिचाही जीव याने सुखावला होता .आनंदाने तिला झोपही येत नव्हती .पोर मात्र पोटभर जेवायला भेटल्याने केव्हाच झोपी गेली होती .आता कमळाला खोकल्याची उबळ आली पोर झोपेतून जागी होतील म्हणून ती उठून बाहेर गेली आणि पदराचा बोळा तोंडाला लावत खोकू लागली . ही उबळ बाकीच्या उबळींपेक्षा जास्त जोराची होती.तोंडातून जास्त रक्त येऊ लागलं तिला पाण्याची गरज होती .ती आत गेली तिझ्या छातीत जोराची कळ आली आणि ती जोरात जमिनीवरती कोसळली तसा भांड्यांचा आवाज झाला.त्यावेळी तिला आक्काबाईचं शब्द आठवले की "इथं अंगणात खेळतील मुलं ,तुझं होवूस्तर मी सांभाळल त्यांना ." या बोलण्यात तिला खूप मोठा आधार वाटला होता .आवाज झाला तशी मुल जागा झाली .आई आई काय झालं ओरडायला लागली .पण आता तो आवाज तिला ऐकू जाणार नव्हता कितीही ओरडले तरीही .तिझा जीव कधीच गेला होता .मुलांच्या रडण्याने आजूबाजूचे जागे झाले पाटलीणबाईलाही निरोप पोहचला .त्या आल्या लेकरांना जवळ घेतलं आणि पोटाशी धरलं .कमळीच्या चेहऱ्यावर एक सुख होत .तिझी लेकरं योग्य हातात पोहचणार आपल्या पाठीमाग त्यांची आबदा होणार नाही हे तिला नक्की समजलं होत म्हणून तिझा जीव निघून गेला . इतक्या दिवस ती फक्त या दोन जीवांसाठीच जगत होती .पण आता ती बिनघोर होती .
कमळी खूप आजारी होती यातून ती वाचणं शक्य नव्हतं .नियतीने त्या लेकरांना दुसरी आई दिली होती जी त्यांना आयुष्यभर जपणार होती .कमळीने रक्ताचं पाणी करून त्यांना मोठं केल होत .सहन होत नसतानाही तिझा आटापिटा होत होता त्या पोटच्या गोळ्यांसाठी .शेवटी आई ही आईच असतें .मरताना डोळे उघडेच होते जणू आक्काबाईला सांगत होते माझे दोन रत्न तुमच्याकडे सोपवत आहे आता ते तुमचेच आहेत.लेकरं रडत होती त्यांना काही काही माहित नव्हतं की आपली आई मेली आहे .आता ती कधीच परत येणार नाही ........
