Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.
Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.

Sarita Sawant Bhosale

Tragedy Others


3  

Sarita Sawant Bhosale

Tragedy Others


आई का ग केलीस पाठवणी माझी??

आई का ग केलीस पाठवणी माझी??

4 mins 289 4 mins 289

आजही ती एकटीच जेवत होती. नवरा,सासू,सासरे सगळ्यांची जेवण होऊन भांड्यांचा थर बेसिनमध्ये साचला होता. दोन वर्षांच्या लेकराला तासभर मागे पळून चार घास भरवून झोपवलं होतं. दिवसभर काम आणि मुलामागे धावपळ करून करून कंभर दुखत होती. पायातून मुंग्या येत होत्या. अंगातील त्राण निघून गेल्यासारखं वाटून अशक्तपणा डोके वर काढत होता. काहीही न खाता फक्त शांत पडावस वाटत होतं पण भांड्यांचा ढिगारा समोर दिसत होता. मुलासाठी चार घास पोटात घालणं गरजेचेच होतं. तसही हे दुखणं रोजचच होतं... कोणाला सांगायचं आणि कोण समजून घेणार होतं?? अंग तापाने फणफणत असो की चक्कर येत असो की हाताला चटका बसलेला असो की अजून काय पण कामाला सुट्टी कधीच नव्हती. त्यात मला काही त्रास होतोय म्हणून तोंड पाडून बसलं तर अजूनच कप्प्यातल्या शब्दसुमनांचा वर्षाव व्हायचा. कितीही त्रास होत असला तरी आवढा मनातच गिळून ठसठसत्या दुखण्यासहित घरच्यांच्या पोटासाठी चूल पेटवायला लागायची. ही पोट भरली की आपापल्या जागी आसनस्थ होऊन झोपेच्या अधीनही व्हायची. जिने आपल्याला खायला घातलं त्या अन्नपूर्णाने स्वतः काही खाल्लं का, तिला काही हवंय का हे कोणाच्या डोक्यातही कधी येत नव्हतं. ती घरात असून ती मात्र कोणाच्याच खिजगणतीतही नव्हती. आजही उभं राहता येत नसतानाही तिने थोडंस खाऊन कशीबशी भांडी घासली आणि उद्याच्या तयारीसह सगळं आवरून मुलाच्या बाजूला जाऊन धरणीवर पाठ टेकवली.         

आई ग! नकळत तिच्या तोंडातून बाहेर आलं आणि डोळ्यातून टपटप पाणी वाहू लागलं. मन आईभोवती गिरट्या घालू लागलं. लहान असताना आई वरण भात पोळी भाजी भरवण्यासाठी किती मागे पळायची. हाताला पकडून एका जागेवर बसवून भोपळ्याच्या,चांदोबाच्या किती गोष्टी सांगायची. चिडून म्हणायचीही कधी एकदाची मोठी होशील आणि स्वतःहून खाशील. दिवस भुर्रकन उडत मी मोठी तर झाले पण खा। ण्याचा त्रास आई मागचा सुटला नाही. हे नको ते हवंय..ते असच का तसच दे अस म्हणत तेव्हाही जेवणासाठी तिला खूप त्रास दिला. पण ती मायच शेवटी...जे मागेल ते करून दिलं... वेळप्रसंगी बाहेर जाऊन खायला पैसेही दिले पण उपाशी कधी झोपुच दिलं नाही. एकदा मैत्रिणीशी खूप मोठं भांडण झालं... म्हणून रुसून बसलेले आणि जेवत नव्हते तेव्हाही आई म्हणाली होती तू नाही खाल्लंस तर माझ्या घशातून घास उतरेल का ग राणी... तेव्हा मात्र मी तावातावात बोलले होते माझं पोट ते तुझं आहे का?? तू तुझ्या पोटासाठी जेव...मी नाहीच जेवले तर उपाशीच राहशील का?? ती काही न बोलता पाणी पिऊन ताटावरून उठली...मी तसंच तिचा हात पकडून खाली बसवलं...तिने चार घास मला भरवले आणि मग स्वतः खाल्ले. त्यादिवसापासून आजपर्यंत कितीदा भूक नसली तरी मी जेवले कारण ती उपाशी झोपू नये म्हणून. किती लहान सहांन गोष्टीत ती मला जपायची. जेवण शिकताना हाताला थोडाजरी चटका बसला तरी ती हळहळायची...नको करू म्हंटल तरी का करतेस अस डोळ्यात पाणी आणून ओरडायची. जराजरी अंग गरम लागलं तरी रात्रभर मांडीवर घेऊन बसायची. ती इतकं सोन्यासारख जपुनही आपण मात्र तिलाच रागवायचो...तुला हे येतच नाही...तू अशीच आहेस...तशीच का नाहीस म्हणून घालून पाडून बोलायचो. ती नेहमी साठवलेल्या पैश्यातून स्वतःला साडी न घेता आपल्याला ड्रेस घ्यायची पण तरीही काही कमी पडलं की मी लग्न होऊन सासरी गेल्यावरच तुला माझी किंमत कळेल अस उलट तिलाच ऐकवायचे. लग्नाची वेळ आली तेव्हा तीच जास्त खुश आणि तीच जास्त दुःखी होती. माझ्या पोटचा तुकडा,माझं काळीज मी तुम्हाला देते..तिला सोन्यासारखं जपा अस नवऱ्याच्या हातात हात देताना रडत होती. नवीन आयुष्याची सुरुवात करणाऱ्या मला तिच्या त्या वाक्यांचा अर्थ तेव्हा कळला नव्हता पण हळूहळू चांगलाच उमगू लागला.     

नवरा किंवा बाकी सासरची माणस कितीही प्रेमळ असली तरीही आईची जागा घेऊ शकत नाहीत. कधी जेवलीस किंवा का जेवली नाहीस म्हणून दटावून कोणी विचारत नाही. आज काय खायला हवंय की तुला काय आवडतं कोणीही विचारत नाही. आई आज हेच हवं असा हट्ट करणारी मी आज मात्र इथे स्वतःच्या आवडी निवडी विसरून सगळ्यांच्या आवडी निवडी जपते. माझ्या कपड्यांची,वस्तूंची सूत्रे आईच्या हातात सोपवणारी मी इथे सगळ्यांच्या वस्तू हातात आणून देते. हे वेळेवरच का नाही झालं म्हणत चिडचिड करणारी मी इथे सगळ्यांच्या जेवणासहीत औषधांच्या फिरण्याच्या वेळा पाळते. मी मात्र मला यात कुठेच दिसत नाही. किती दिवस झाले मी मलाच भेटली नाही....मला काय हवंय हे मलाच विचारण जणू विसरूनच गेले मी.      आता मी स्वतः एक आई झाले तेव्हा कळतंय आईचा जीव मुलासाठी कसा तीळतीळ तुटतो. आज त्याच्या पोटात घास गेल्याशिवाय माझ्या घशातून खाली उतरत नाही. त्याच्या सुखापलीकडे मला काही वेगळं दिसतही नाही. पण घरात इतकी माणसं असूनही रोज एकटी जेवताना, अंग दुखत असताना, तापाने फणफणत असताना, आवडीचा पदार्थ करताना, कोणी मन दुखावलं असताना , माझी मलाच शोधत असताना तू मात्र चेहऱ्यासमोर येतेस. निराशेत डोक्यावर हात फिरवायला आणि आजारपणात मायेने तूप भात भरवायला कोणी नसतं तेव्हा एकच विचारावं वाटत तुला सोन्यासारख जपलस लेकीला मग सासरी का पाठवलंस ग?    तुझ्याच जीवाला एकटीच ही लढाई लढायला शिकवलीस खरी...खंबीर स्त्री सोबत ती आज सक्षम आईदेखील झाली पण आजही ती तुझीच नाजूक,गोड, हळवी मुलगी आहे. तिन्हीसांजेच्या कातरवेळेत मन तुझ्या आठवणींत बैचेन होतं तेव्हा अल्लड मनात एकच प्रश्न उमटतो, तुझ्यात अन माझ्यात दुरावा निर्माण करणारं हे सासर नावाची रीत जन्मास कोणी घातली ग??

का केलीस ग पाठवणी माझी??                     

भेगाळलेल्या जखमांवर                      

मायेची फुंकर हवी,                     

ओघळत्या अश्रूंना हि                      

तुझ्या हातांची साथ हवी,                       

कणखर शब्दांच्या सोबत                       

प्रेमाची ओल हवी,                       

सुखात हे आयुष्यं सरण्या                        

आई फक्त तुझी कुस हवी    


प्रत्येक माहेरवाशीणीची आपल्या जन्मदात्री बाबतीत होणारी मनाची घालमेल शब्दांत मांडायचा हा छोटासा प्रयत्न. आवडला तर नक्की लाईक करा,कॉमेंट्स करा आणि शेअर करा फक्त नावसाहितच.    सदर कथेच्या प्रकाशनाचे आणि वितरणाचे हक्क लेखिकेकडे राखीव. कथा निनावी शेअर करू नका अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल. कथा आवडल्यास लाईक,कॉमेंट्स नक्की करा आणि शेअर करा पण फक्त नावसहितच


Rate this content
Log in

More marathi story from Sarita Sawant Bhosale

Similar marathi story from Tragedy