विठोबा
विठोबा
अंगरखा नाही अंगी,
डोई मुंडासं बांधतो
अर्धपोटी बैल माझे,
शेत कसतो कसतो.
उन्हातान्हात राबून
दरसाल नांगरणी
कवळ्याशा हातानेच
लेक करी भांगलणी
नजर देतो आभाळा,
डोळा तरळते पाणी
कधी सजणार माझी
कारभारीण लक्ष्मीवाणी
खिचडी शिजे शाळेत
हजेरीचाबी घोटाळा
लेक लगनाला आली
कसं लागू तयारीला?
पावसाच्या लहरीनं
शेत झालं वाळवंट
बाजारी जित्राबं गेली
उरले रिकामे खुंट
चित्रा पडे अशी यंदा
माती गेलीया वाहून
बळीराजा मीच ,परि
गेलो कर्जात बुडून
हातपाय चालवतो
नावाचाच मी विठोबा
तृप्त कधी होईन मी
भरून माझा पोटोबा?
आज उघडं करतो
जखमी हे अंतरंग
आशेवर मी उद्याच्या
दिसतील नवरंग....
