तुझ्या आठवांचा कल्लोळ
तुझ्या आठवांचा कल्लोळ


गर्द रात काळोखाची
आठवांचा हा कल्लोळ
रातराणी मधूगंधी
लडिवाळ नि वेल्हाळ..१
लाजवंती रूप तुझे
मनोहर आठवते,
मन माझे मोगऱ्याचे
गंधमय फुलविते..२
गुंजारव घाली मनी
तुझ्या शब्दांचे मोहोळ,
रोमरोमी भिनलाय
आठवांचा हा कल्लोळ..३
दरवळ या मोहाचा
अंतरात जपलेला,
आठवांचा हा कल्लोळ
हृदयाला रुचलेला..४
हृदयाच्या गाभाऱ्यात
स्मरदीप पेटलेला,
जरी दुरावा क्षणिक
रंग तुझा चढलेला..५
भाव बिलोरी चांदणं
तुझ्या माझ्या प्रेमातलं,
तुझ्या प्रेमानं राजसा
गोड साकडं घातलं..६
आता दुरावा सरावा
घडी मिलनाची यावी,
सखा मिठीत असता
शृंगाराची गाणी गावी..७