तळ्याकाठचा गुलमोहर
तळ्याकाठचा गुलमोहर
मनापासून झुकलेला......
निळ्याशार पाण्यात आपलचं
रूपडं पाहून खुदकन हसलेला
गुलमोहराच्या अधरांची
केशरलाली मस्त खुलत होती ...
पाण्याच्या गालावर
जेव्हां जेव्हां तरंगांमुळे
नाजूक खळी पडत होती
तो झुकलेला...
त्या निळ्याशार नितळ निळाईत
आपला लालकेशरी गडद
अहंकार विरघळून जायला...
तो झुकलेला...
भगवंताच्या प्रतिबिंबित
नीळ्या अथांगतेत लीन व्हायला...
तळ्याकाठचा गुलमोहर
मनापासून झुकलेला...

