स्वरपक्षांचे येणेजाणे
स्वरपक्षांचे येणेजाणे
1 min
224
स्वप्नांच्या कुरणातुन हल्ली
स्वरपक्षांचे येणे जाणे,
उठता-बसता हसता रुसता
सहजच आता सुचते गाणे.
कानी पडता ओळखीचे स्वर
मनमनिषेचे हळूच हसणे
दरवळणाऱ्या स्वरपुष्पांनी
लाजून पुन्हा गंधित होणे.
कानांमधुनी सूर झिरपता
रक्तातच त्यांचे विरघळणे
गुणगुणती देही रात्रंदिन
कधी ख्याल तर कधी तराणे.
नाही नाही म्हणता म्हणता
राधेने घननीळचि बनणे,
अस्तित्वच कण होते जेव्हा
अपुले हरणे कबूल करणे.