रात्र
रात्र
रात शुभ्र चांदण्याची
रात निळ्या गोंदणाची
रात रुणुझुणती साद
अलवार पैंजणाची
आता समजावू किती
मन रातीच्या गं हाती
रात चांदबहराची
रात गोड जहराची
घेते दिसाला कुशीत
होते सांजेचा आधार
ओढी शाल काळोखाची
रात मायेचा पदर
रात जागते रातभर
तेवी दिप आठवांचे
सले एखादीच सल
भेदी रान काजव्यांचे
रात पश्चिमेची नदी
तिचा काळोखी उगम
नाते सावळ्या हरीशी
सांगे उरातला तम
अशी वेल्हाळशी धुन
तिच्या पाव्यात उमटे
रात सगुण निर्गुण
मनी मोरपीस दाटे
रात फेडते नभाशी
उभ्या दिवसाचे देणे
मग उगवी सवित
फळे रातीचे गं जिणे
फळे रातीचे गं जिणे
