पुन्हा नव्याने भेटू या का
पुन्हा नव्याने भेटू या का
पुन्हा नव्याने भेटू या का
मनात दडले बोलू या का
अता मला मी गवसत नाही
कुठे हरवलो शोधू या का
कुणी कितीसे जपले आठव
न बोलताही सांगू या का
मिटून जावे हेवे दावे
अशा ठिकाणी जाऊ या का
उदास होता चंद्र रात्री
जरा तयाला छेडू या का
कधीच नाही जमले दोघा
असे स्वतःला झोकू या का
पुन्हा उशाला चंद्र घेऊ
अन् चांदण्यांना ओढू या का

