प्रेमाचे गाणे
प्रेमाचे गाणे
तुझ्या सावळ्या बटांना
जेव्हा स्पर्शते चांदणे
माझ्या ओठी येते
तुझे प्रेमाचे गाणे...
तुझे हसणे लाजणे
कधी उगाच थबकणे
उडे पदर वाऱ्यावर
जणू अत्तर शिंपणे...
असे चालता चालता
उगा मागे वेळावणे
माझ्या ओठी येते
तुझे प्रेमाचे गाणे...
नेत्र पल्लवींनी तुझ्या
उरी गुलाब फुलले
इंद्रधनुष्याचे रंग
तुझ्या गाली दिसले...
अशी तुझी गौर काया
बावरली गं पैंजणे
माझ्या ओठी येते
तुझे प्रेमाचे गाणे...
असा सोहळा सुखाचा
कसे अंग शहारले
साही ऋतूंचे आभाळ
तुझ्या अंगणी न्हाहले...
माझ्या अंतराचा सल
काय सांगू सजणे
माझ्या ओठी येते
तुझ्या प्रेमाचे गाणे...

