वसुंधरा
वसुंधरा


रिमझिम पावसाचे
चांदणे रानात भरले
तुझ्या नावाचे गोंदण
सखे मनात कोरले
उधळती मोती पोवळे
सडा पडला वनमाळी
पुनवेची अर्धचंद्रकोर
तुझ्या डोंगर कपाळी
रातव्यांचे किर्र गुंजन
दरी कपारी उमटते
परडीच्या वेत केळी
वाऱ्यावरती डोलते
जटा सारिती मेघ
बटा सैर लटकती
चाले शिव तांडव
विजा कडकडती
पसरला धुंद गारवा
ओढ दाटली मनात
शिंपले वेचित निघाली
सखी अल्लड वनात
पान्हा फुटला नदीस
पाट दुधाचे लोटले
कोसळती धबधबे
रान धुक्यात पेटले
रात निघाली माहेरा
उगवली शुक्रचांदणी
पहाटे च्या माळरानी
नाचे मयुरी अंगणी