नैराश्य - एक वाळवी
नैराश्य - एक वाळवी


मनात खूप काही दुखतं, काहीतरी सलतं ,
दाट गर्दीत आधार शोधतं, हल्ली असं अनेकांचं होतं .
मिळाला खांदा तर ठीक नाहीतर एकटेपण उरतं !
एकटेपणा, नैराश्य नसतेच हे , ही असते वाळवी.
लागते मनाला, नकळत खोलवर पोखरत जाते.
आश्चर्य! बाहेरून मात्र सगळे सुंदरच दिसते .
विचित्र आवाज, खूप सारे भास,एकट्याचा प्रवास..
सुरू होतो परिचित अपरिचित सावल्यांचा खेळ !
कशाचा कशाला बसत नाही मेळ .
ना कसली जखम , ना कोणती लक्षणं !
विचारांनी सैरभैर फिरते दिशा दाही
आहे का मनाच्या रोगाला औषध काही ?
शोध संपतो, अर्थ हरवतो जगण्यातला,
राहते केवळ रितेपण , हातात येतो तोच दोर
अन् पुन्हा एक जिवलग जीवाला लावून जातो घोर .