मृगधारा (अष्टाक्षरी)
मृगधारा (अष्टाक्षरी)
मृद्गंधाचा सोहळा
साजरा अवनीवर
मनभावन आगळा
कवडसे धरेवर !!1!!
मयुर पिसारा फुले
साद येई पावसाची
सृजन शहारा खुले
पुलकित रोमांचाची !!2!!
मेघ भारी नभांगणी
अल्लड खट्याळ वारा
सहस्त्रधारा अंगणी
धरती चुबिंती गारा !!3!!
सृष्टीने साज माळला
वर्षे धारा झरझर
सप्तरंगी बहरला
शेला चराचरावर !!4!!
कोसळती जलधारा
अवनी गाली हसली
नवचैतन्य आकारा
पर्णिका रानी रमली !!5!!
गंधाळलेली शिंपण
नंदनवन नटले
हिरवाईचे कोंदण
अमृतकुंभ सजले !!6!!