" मनभावन श्रावण "
" मनभावन श्रावण "
1 min
116
नयनरम्य सृष्टीचा साज गोजिरा
अंगणी नटता मखमली हिरवळ
मनभावन श्रावण सण साजरा
श्रावण सरींचा मंद धूंद परिमळ ||१||
चराचरातुन उमलली धुदं प्रसन्नता
श्रावणधारा पुलकित मंद सुगंधात
सासुरवाशीणीला माहेर आठवता
मन घाली पिंगा दंग वारा परसात ||२||
मनभावन तृणांकुर शालु अवनीला
मृदगंधाचा परिमळ सुगंधी कुपीत
नवथर उत्सुक जावयास माहेराला
जीवलगाला उमगे अंतरीचे गुपीत ||३||
नयनरम्य सोहळा तनामनात साजरा
अचंबित होई अवघ्या सृष्टीचे रेखाटन
नवसंजीवन मधुर साज शृंगार लाजरा
नवसृजन बहरता अवनिला अलिंगन ||४||
सोमवार शिवाला प्रिय समर्पित मास
ऋतु हिरवा सणांचे मनभावन कोंदण
रंगी किमयागार निसर्ग धरतीचा श्वास
नवसृजनाने होई नदंनवन धरेचे अंगण ||५||
