मृदगंध
मृदगंध
सुगंध आसुसलेल्या ओलेत्या मातीचा,
तनामनास ओलेचिंब करतो,
रोमांचित तो करून जातो. 1
सुवासिक जाई जुई, चाफा
अन मोगऱ्याचा गजरा
लावण्यवती केसात माळते
प्रियकर प्रफुल्लित होतो,
संमोहित तो होऊन जातो. 2
सुवासिक ती रात राणी
अन रजनीगंधा,
अधिर प्रेयसी प्रणयासाठी,
आतुर ती मिलनासाठी,
ओढ प्रणयगंधाची अनावर,
भिरभिरती नजर तिची
प्रियकराला शोधु लागली
वाट त्याची पाहू लागली. 3
मृदगंधित नाजुक ती
बकुळफुलें कोमेजली,
सुकली तरी दरवळतातच
जणू संसारात रमलेली युवती,
रुजलेली, हरपलेली, पुरंध्री. 4
गोड गोजीरा लाल गुलाबी गुलाब,
सुवासिक प्रेमाचे ते प्रतीक
जणू संसार गोड गुलकंद
तर कधी कटू अन काटेरी
परिमळ गुलाबाचा जेव्हां दरवळतो
मनास माझ्या प्रसन्न करून जातो. 5
सुगंधित तो वृक्ष चंदन
शीतल करीतसे माझे मन
माझ्या ओंजळीतली अबोली
न बोलता जीवनातले
सार सोपे सांगते. 6
हास्याची अन प्रसन्नतेची
बकुळफुलें विलसु देत मुखावर
दरवळु दे ती आयुष्यभर
दरवळु दे ती आयुष्यभर. 7

