मनास कळले आलाय श्रावण.
मनास कळले आलाय श्रावण.
बहरून जातं जेव्हा अंगण
सुखावून टाकणाऱ्या हिरवळीने
तेव्हा समजावं आलाय श्रावण.
हिरव्याश्या पालवी वरती जेव्हा
नटू पाहतो एखादा दवबिंदू
तेव्हा समजावं आलाय श्रावण.
हलकेच येते सर रिमझिमणारी
आणि मोहरुन टाकते तन आणि मन
तेव्हा समजावं आलाय श्रावण.
शुभ्र दिसणारं आकाश
लगेच दिसू लागतं जेव्हा काळभोर
तेव्हा समजावं आलाय श्रावण.
इकडे पाऊस तिकडे वादळ वारा
तरीही नभात सजतो इंद्रधनु देखणा
तेव्हा समजावं आलाय श्रावण.
खिडकीत बसल्यावर येतो गंध ओल्या मातीचा
अन् मोहरून जातं जेव्हा मन
तेव्हा समजावं आलाय श्रावण.
कधी अडुन तर
कधी सरळ बरसतो जेव्हा नभ निळा
तेव्हा समजावं आलाय श्रावण.
निशिगंध दरवळू लागतो अंगणात
अन् पडतो जेव्हा रंगीबेरंगी फुलांचा सडा
तेव्हा समजावं आलाय श्रावण.
विसरून गती अन् प्रवाह
ओसंडून गाठतात जेव्हा नद्या डोंगरवाटा
तेव्हा समजावं आलाय श्रावण.
टपोरे थेंब जेव्हा मिलनास येतांत धरणीच्या
अन् मोहरते बावरते जेव्हा काळी आई
तेव्हा समजावं आलाय श्रावण
शब्दात जाते हरवून मन अन् लेखणी
सोडून कवीच्या मनाचा गाव जेव्हा
तेव्हा समजावा आलाय श्रावण.

