मी पाऊस वेडी
मी पाऊस वेडी
पाचू गर्द मखमलीचे रान
सरी झिम्मड खेळती छान
केवडा श्वासात गंधाळला
मन अल्लड हरपले भान
टपटप तालावरती थिरकत
नाचते मी पाऊस वेडी राधा
मोरपंखी स्वप्नात रमता सवे
खट्याळ कृष्ण भोळा साधा
पापणीवर झेलते मौक्तिक
सभोवार शितल जलाचे पाट
रोमांचित होवून चालते मग
ती ओली चिंब लाल रानवाट
उनाड वाऱ्यासंगे स्वच्छंदी
क्षणात होवून फुलपाखरू
अंतरात सप्तरंगी उधळण
धुंद मना सांग कशी सावरू