कृष्णवेळ
कृष्णवेळ
तुझ्यावर लिहिताना तुझ्यासारखेच बनावे लागेल
हे जेव्हा मला जमेल तेव्हा
ती असेल कृष्णवेळ
तुझे अस्तित्व कणाकणाने मला
सगळ्यात दिसते
हे तुझ्या माझ्यातले तादात्म्य
जेव्हा मला जाणवते
ती असते कृष्णवेळ
तुझा निळवर्ण तुझे विस्तीर्ण स्वरूप दाखवतो
तो विस्तीर्ण पणा मज मनास भारतो
माझ्यात हे भारलेपण येते
हो तेव्हा ती असते कृष्णवेळ
तू असतोस अल्लड बाललीलांमधे
दुधदहीलोण्याच्या उधळणी मधे
आणी गवळणींच्या आर्जवामधे..
असे गोकुळ जेव्हा घराघरात नांदेल
हो ती असेल कृष्णवेळ.
तुझ्या आठवाने आसक्त आरक्त होई राधा
आणि व्याकुळ बघ सकल गोपिकाही
असा वासनारहित प्रेमगंध जेव्हा फुलेल
हो ती असेल कृष्णवेळ..
तुच कर्ता अन करविता..
पार्थास कथली तू रे गिता..
सारथ्य त्याच्या रथाचे केलेस
धर्नुधारीस कर्म दर्शविलेस
कर्माविण न मुक्ती त्याग फळाची आशा
असे अर्जून जेव्हा घराघरात दिसतील
हो ती नक्कीच असेल कृष्णवेळ..
तू दिसतोस प्रत्येकाला आपआपल्या दृष्टीने
दिसतो तसा असशील अवघड हे सांगणे
तू भेटलास मज प्रसंगानुरूप परिस्थितीने
भासलास मज तू पिता,पुत्र ,बंधु,मित्र ,सखा
कैकवेळा तर स्वअस्तित्वातही
तुझ्या माझ्या भेटीची हा प्रत्येक क्षण
मज भासली कृष्णवेळ
मज भासली कृष्णवेळ
मज भासली कृष्णवेळ.
