हवी होतीस सोबत तू
हवी होतीस सोबत तू
क्षितिजावर गडद केशरी,आभाळ दाटते
पिंपळावरून पाखरांची,चंदेरी माळ उडते
दवबिंदूनी कमळाचे,कोमल भाळ व्यापते
हवी होती सोबत तू ,हृदयात हुरहूर दाटते
दर्यावर दूर लाटांचे, मधुर संगीत वाजते
ओष्टी माझ्या तुझेच, लाघवी गीत गाजते
निथळून वेडी सरिता,सागरात विरघळते
हवी होती सोबत तू ,हृदयात हुरहूर दाटते
धरतीच्या तृष्णेवरती,वर्षेची धार कोसळते
सृष्टीचे निर्मल अंग अंग,मोहरून शहारते
अवखळ ते मयूर आपला पिसारा फुलवते
हवी होती सोबत तू ,हृदयात हुरहूर दाटते
दिवाना होऊन भ्रमर,फुलांफुलांवर रेंगाळते
फुलावरील दव हिरव्या,अवनीला आलिंगते
गवताचे लवते पाते,थंडगार स्पर्शाने शहारते
हवी होती सोबत तू ,हृदयात हुरहूर दाटते
वेडे मन हे वृक्षलतांची, रहस्यवाणी बोलते
दूर कुठेतरी कोकिळा,मंजुळ गाणी गुणगुणते
चांदण्याची शीतलनशा विवेकबुद्धी हरवतं
हवी होती सोबत तू ,हृदयात हुरहूर दाटते
पौर्णिमेच्या चंद्रात जेंव्हा मुख तुझं भासतं
वाऱ्याची झुळूक जेंव्हा पैंजण तुझं घालत
मौन हे माझे जेंव्हा तुझीच प्रतिमा चितारतं
हवी होती सोबत तू ,हृदयात हुरहूर दाटते

