घे तलवार हाती गं...
घे तलवार हाती गं...
पदर डोईचा बांध कटीला
घे तलवार हाती गं.
मूक बधिर जग हे झाले,
आवाज न जाई कानी गं,
तूच कालिका अन तूच चंडीका,
रणांगण आज फक्त तुझेच गं.
सगे सोयरे सारे विकले,
कपटी द्युता बसले गं,
तूच कृष्ण आणि तूच द्रौपदी,
घे सुदर्शन हाती गं.
रावणे उचलून नेली सीता,
परी स्पर्श न तिजला केला गं,
कलियुगी दानव आज मातले,
काय चिमुकली अन वृद्धा गं.
जरी आज भयाने धरी मौन तू,
गिधाडे तुटूनी पडतील गं,
अष्टभुजा तू आज होऊनी,
महिषसुरास वधसी गं.
पदर डोईचा बांध कटीला,
घे तलवार हाती गं.
घे तलवार हाती गं.....
@--शरयू निंबाळकर
