गानसम्राज्ञी लता मंगेशकर
गानसम्राज्ञी लता मंगेशकर
सूर,ताल,लय,सिद्धी
तान कृष्ण मुरलीची,
स्वरतंतू गळ्यातले
तार रेशीम लडीची...१
बालवयातच गाणे
बाल कंठी रूजलेले,
होती लेक गायकाची
सूर पक्के बांधलेले...२
ओझे जबाबदारीचे
बालपणी खांद्यावर,
तरी पेलले लिलया
हुकूमत सुरांवर..३
नाट्य गायन जीवन
रोज जीवना आधार,
सांभाळले भावंडांना
गळी वीणेचा झंकार...४
सरस्वती वर देई
लता मंगेशकरांना,
स्वरलता नाव तुझे
सार्थ होईल गातांना..५
परिपूर्ण गायनाने
जग लताने जिंकले,
गान सरस्वती असे
नाव जगात जाहले..६
साध्या राहणीत सुख
वाणी मधाळ मुखात,
गृहकृत्यदक्ष लता
मोद नाते जोडण्यात..७
आला काळ भयानक
नेले गानसम्राज्ञीला,
सारे जन दु:खी झाले
कोणी गावे भैरवीला..८
सप्तसूर दुखावले
गेली त्यांची सूरराणी,
वाद्ये रूसली खोलीत
त्यांच्या नेत्रातही पाणी..९
भावपूर्ण श्रद्धांजली
वाहू स्वर सुमनांनी,
देव होतील आनंदी
लतादींच्या गायनानी...१०
