भय
भय
जायचे तुला आहे, जायचे मला आहे
माणसात मरणाचे, का अजून भय आहे
पाहिले इथे होते, काल गाव हसताना
आज भग्न सांगाडे, क्रूर जलप्रलय आहे
जाळतील घाईने, आपलेच सरणावर
सोहळा तुझा जोवर, भोवती वलय आहे
पाळतील काही क्षण, लंगडा दुखवटा अन्
जाहली जगाची ही, वाटते सवय आहे
नाचलो इशाऱ्यावर, कैकदा मदाऱ्याच्या
लावली मुकाट्याने, कोडगी सवय आहे
आसवांत भिजलेल्या, ह्या घरातल्या भिंती
जाणतात फासाचा, आतला विषय आहे
