अशी ही आता माणसाची नराधम जात झाली
अशी ही आता माणसाची नराधम जात झाली


म्हणतात मुलीवर असावं लागतं पित्याचं छत्र,
त्यानंच निभावलं पोटच्या गोळ्यावर बलात्काऱ्याचं पात्र,
बापाच्या त्या धमकवण्याला ती भीत गेली,
अशी ही आता माणसाची नराधम जात झाली॥
विसरले गुरुत्व ते आश्रमशाळेतील शिक्षक,
बनले ते चिमुकल्या विद्यार्थीनींचे भक्षक,
अंबटशौकी शिक्षकास लाजवेल ती गुरुशिष्याची रीत गेली,
अशी ही आता माणसाची नराधम जात झाली॥
जरी नाही भाऊ मला, माझा चुलत भाऊ खास,
मोठेपणी त्यानेच भरवला तिला बलात्काराचा घास,
माहेरची साडीसारखी बहिणीवरील भावाची ती प्रीत गेली,
अशी ही आता माणसाची नराधम जात झाली॥
मैत्रिणी खूप कमी मला मित्रच मिळाले फार छान,
वाढदिवशी तिच्या मित्रांना नाही राहिले मैत्रीचे भान,
परक्यातलं निःस्वार्थ नातं मैत्रीचं तशी मित्रांची नीति गेली,
अशी ही आता माणसाची नराधम जात झाली॥
जन्मापासूनच अधु पायाने म्हणतात मला गतिमंद,
जरी आले संकटे तरी सोडला नाही जिंकण्याचा छंद,
निर्दयाच्या कृत्यामुळे यशाच्या शर्यतीत तिची जीत गेली,
अशी ही आता माणसाची नराधम जात झाली॥
नित्याचाच झालाय हा दुराचार, अत्याचार त्याहून हिंसाचार,
का येत नाही असं कृत्य करताना थोडाही आचार-विचार,
मुलगी एकटी निघू शकेल घराबाहेर तशी रात गेली,
कारण अशी ही आता माणसाची नराधम जात झाली॥