आयुष्याचा पोस्टमन
आयुष्याचा पोस्टमन
आयुष्याचा पोस्टमन...
आज पुन्हा एकदा दारी आला
कुठल्याही सही, शिक्क्याशिवाय असलेला,
मुदतवाढीच्या करारनाम्याचा लखोटा हाती ठेवला
अजूनही कारारनाम्यात,
अटी साऱ्या जुन्याच आहे
अंतिम निर्णयाचा अधिकार,
म्हणे फक्त माझाच आहे
तो बेरका नुसता डोळ्यात हासला,
आणि या छदाम्याने तो नेमका टिपला
मी म्हणालो...
अरे आता तरी अटी थोड्या शिथिल कर,
कुठेतरी पॉवर ऑफ ऑटोर्नीचा उल्लेख कर!
मान्य आहे मला, प्रोपर्टी सारी तुझीच आहे
ट्रस्टी म्हणून तरी, थोडा अधिकार देऊ कर!
त्यावर तो म्हणाला...
माझापण गुरगुरणारा एक बॉस आहे
ऑडिट रिपोर्टच्या डेडलाइनचे
माझ्या डोक्यावर खूप प्रेशर आहे
टर्म ऍण्ड कंडीशन तू नीट वाच
अटी अजून जाचक होताय!
आणि तुझ्या बकेट लिस्टचं काय?
कधी पूर्ण करणार?
काही कळतंय काय?
मी म्हणालो...
आजपर्यंत मला तरी,
सर्व कुठे वेळच्यावेळी मिळालंय?
डिले झाला तुझ्यामुळे,
कधी मी फाईन मागितलाय?
डायबेटिसलाही मी गोड करून घेतलाय,
B Pलाही 'बहोत प्यार से' कुरवाळतोय!
आणि परीक्षेच्या मार्काप्रमाणे,
डोळ्यांचा नंबर वाढतच राहीलाय,
सांग, कधी तुझ्याकडे कंप्लेंट केली हाय?
यावर तो हासत म्हणाला...
बालपण, कुमारपण खेळलोय की तुझ्यासंगे
तारुण्यातही कानाडोळा केला,
जेव्हा तुझी रासलीला रंगे!
गाडी तुझी आता घाटामध्ये आहे,
टॉप गियर नको आता,
स्पीड गव्हर्नरही सांगे
इच्छा, अपेक्षांचं तू नको दाबू एक्सलेटर
भले असो condition what so ever!
म्हणून म्हणतो...
आहे त्यात मस्त राहा, मजा कर
आणि या येथे
Received म्हणून सही कर
असा हा आयुष्याचा पोस्टमन...
दर वाढदिवसाला सांताक्लाॅजसारखा
न चुकता दारी येतो
भरभरून वाढदिवसाच्या शुभेच्छांसह
मुदतवाढीच्या करारनाम्याचा,
गुलाबी लखोटा हाती ठेवून जातो