आंबेमोहर
आंबेमोहर
भर दुपारी
काढणीच्या दिवसात
ज्वारीची पात लावून झाल्यावर
तू बसायची आम्हा लेकरांना घेऊन
आंब्याच्या सावलीला
थोडा विसावा मिळावा म्हणून
तुझा घामानं डबडबलेला चेहरा
पदरानं पुसायची
कपळावरच्या कुंकवाचा रुपया
शाबूत ठेवून
तुझा तो चेहरा पाहून भास व्हायचा
तुला नि ज्वारीच्या कणसांना
देवानं एकाच रंगात
रंगवल्याचा
तुझी कालवाकालव व्हायची
लेकरांच्या कोवळ्या हातावरचे फोड पाहून
नि मी ती वाचत असायचो
तुझ्या चेहऱ्यावर
तुझ्याच शाळेत शिकत असल्यामुळे
कोणत्याही लिपीविना
चिंधी;
घामात भिजून औषधी झालेल्या
तुझ्या जुन्या धुडक्याची
तू बांधायची ज्वारीचं पान लागून कापलेल्या बोटावर
नि सांगायची;
'धांडं घट्ट धरून उपटायचं,
निसरड्या हातानं कापत असतं' म्हणून
डोक्यावरचा मोहरलेला आंबा दाखवत म्हणायची
'लेकरांनो; आयुष्यात एक गोष्ट लक्षात ठेवायची,
आंबा जेवढा मोहरतोना,
तेवढ्या कैऱ्या लागत नाहीत त्याला कधीच'
आई;
तुझी ती मोहराची गोष्ट
आज आठवते
एखाद्या मोहरलेल्या आंब्याकडे पाहून
नि कळतो त्यातला खरा अर्थ
निम्म आयुष्य उलटून गेल्यावर
