Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Vasudev Patil

Drama Tragedy

3.0  

Vasudev Patil

Drama Tragedy

मावळती

मावळती

9 mins
1.0K


सूर्य सोनू सुताराच्या मळ्यातील भल्यामोठ्या वडाच्या झाडाआड कलला तसा मळ्यात दुपारपासुन थांबलेल्या मदन अप्पानं विहीरीच्या हुड्याचा आधार घेत काठी टेकत मळ्यातून घराकडची वाट धरली. त्यांना माहित होतं आता लवकरच झापड पडेल. पाय लंगडवत लंगडवत त्यांनी नदी पार करत पैलकाठ धरला. डोक्यातील विचाराचं काहूर थांबता थांबत नव्हतं. लालिमा पांघरलेला सूर्य वडाच्या पानातून डोकावत असला तरी त्याच्यात आता उद्यापर्यंत तरी उगवण्याची ताकद नाही, हे त्यांनी हेरलं. त्यांना आपली गत ही या सूर्यासारखीच झालीय याची जाणीव झाली व त्या जाणीवेने आपण जगण्यासाठी किती मजबूर व मरण्यासाठी असहाय झालोत यानं अधिकच पोटात गिड्डा पडला. आज परतायचंच नाही हे ठाणून आलो तरी विहीरीनं आपल्याला कवेत घेतलंच नाही. की आपणच...?


विमानं आपल्याला पुरतं बांधुन ठेवलंय. सकाळी मळ्याच्या धावेवरून मोहन कासाराच्या खलाटीच्या मळ्यातील चिंचेचं झाड तरण्या केशरी किरणाच्या सूर्यास थोपवण्याचा कितीही प्रयत्न करी तरी साऱ्या रानात प्राण फुंकत सूर्य वर येतो मात्र मावळतीला सोनू सुताराच्या वडाचं झाड सूर्याला पामकूच देत नाही. तसंच उमेदीत आपण साऱ्या संकटाचा सामना करत संसार उभा केला पण आता त्याच संसारानं उतरत्या वयात आपल्याला झाकाळायची तयारी चालवलीय.


गाव आलं. रानात गेलेली गुरं लाल, पिवळा धुरळा उडवतच गावात शिरत होती. नदीकडनं दूर आटत चाललेल्या धरणावरून टिटव्या, बगळे, किलकिलत आकाशात घिरट्या घालत रात्रीचा ठाव जवळ करण्याची तयारी करत होते. काशीबाचा रामू कापलेल्या गव्हाचं ट्रॅक्टर खळ्यात नेत होता. सिताबाची सून हातात बादली घेऊन म्हशीची धार काढण्यासाठी खळ्यात जात होती. मदन अप्पानं मारोतीचा चौक गाठला नी गावातील खांब्यावरचे लाईट उजळले. तोच समोरून येणाऱ्या सखानं मदन अप्पास राम राम घातला. पण मदन अप्पा आपल्याच तंद्रीत आपल्या राहत्या घरामागील गोठा जवळ करत होत. पुढे महादेवाच्या मंदीरात दिवा चढवायला आलेल्या पोरांनी पारावरच खेळ मांडत गलका चालवला होता.


गोठ्यात शिरताच विमल आजीनं, "इतक्या उशिरा पावेतो कुठं होता?" पृच्छा केली. मदन अप्पानं मोरीत हात पाय धूत, "मळ्यात" इतकंच तुटक उत्तर दिलं. तीन चार वर्षापासुन मळ्यात कधीच पाय न ठेवलेला मदन अप्पा आज मळ्यात अख्खा दिवस कसा, यानं विमल आजीचं काळीज चर्र झालं. विमल आजीनं घासलेटचा दिवा लावला होता. त्याची येऊ पाहणारी काजळी चाळवत 'सुखानं नाही जगू देत तर निदान सुखानं तरी मरु दे बाबा' मनोमन आळवणी केली. एवीतेवी तो चाळवला नसता तरी काहीच फरक पडला नसता. कारण त्यांना आता अंधारच अधिक जवळचा वाटत होता. आणि आज तर नभात चंद्र होता व त्याचा उजेड थेट गोठ्यात येत होता. त्याला अडवायला काहीच नव्हतं आज पहाटेच गोठ्याचं पुढचं व उत्तरेकडचं भिंताड पुर्ण पडलं होतं. पण दोघाचं नशीब चांगलं की वाईट देव जाणो! पण भिंताड बाहेरच्या बाजूनं धसलं होतं जर ते मध्ये गरगळलं असतं तर मदन अप्पा व विमल आजी दोघे झोपेतच गाढ झोपले असते. पण तरी मदन अप्पाला तेच वाईट वाटत होतं की भिंताड बाहेर का पडलं.


हात पाय धूत मदन अप्पा कोपऱ्यातल्या मोडक्या बाजेवर बसताच बाजेनंही 'कुचुम्डं कुच' आवाज करत त्याचीही अखेरच चालू असल्याची जाणीव उठवली. आज डबा येणारच नाही याची दोघांना खात्री होती. एरवी दररोज डबा येत नाही तर सकाळच्या प्रसंगानं चवताळलेली सून आज पाठवणारच नाही याची मदन अप्पास पक्की खात्री होती.


"आज मला भूक नाही. दुपारी मधानं बळजबरीनं मळ्यातच जेवू घातलं डबा नको मागवू,” काल रात्रीपासून न जेवलेल्या मदन अप्पानं सांगितलं.


"पण मला भूक लागलीय. डबा जाऊ द्या दुकानातनं काही तरी आणा,” विमल आजीनं विनवणी केली. मधा दुपारी मळ्यात गेलाच नाही तो आपल्याच जवळ होता म्हणून मदन अप्पासाठी विमल आजीनं जुन्या मडक्यात कधीची ठेवलेली पाचची नोट काढून दिली. अप्पा नोट घेत उठले व दुकानातून चुरमुरे, दाळ्या आणल्या. दुकानदार आत्मारामनं सकाळची कुरबूर व मदन अप्पाची गत माहीत असल्यानं पाच रुपयापेक्षा किती तरी जास्त चुरमुरे, दाळ्या दिल्या.


मदन अप्पा व आजीनं तरी रात्रीच्या नऊपर्यंत डब्याची वाट पाहिली पण डबा आलाच नाही. दोघांनी हुंदका दाबतच चुरमुरे खाल्ले. आज विमल आजीनं स्वत: अप्पास खाऊ घातलं. ते पाहुन अप्पा मनातल्या मनात, ‘विमले तुझ्या वचनात अडकलो गं!म्हणुन आज परत आलो. नाहीतर एव्हाना हा मदन आज विहीरीच्या तळाशी राहिला असता!’ म्हणत चुरमुरे घशात उतरवत होता.


त्यांना जगन्याच्या लग्नानंतरची ती रात्र आठवली. दोन्ही मुलांचं लग्न झालं. घर झालं, शेतीत आबादानी म्हणून लाडात येत, "विमे आज तू काहीही मांग मी नाही म्हणणार नाही. तू मला जीवनात भरभरून दिलंय गं!”


"खरच मांगू? मग तर आधी वचन द्या जे मागेन ते देणार!”


"दिलं वचन!”


"बघा जिवनात सारं मिळालं मला आपणाकडून. आता एकच इच्छा आहे. मला सुवासिनीचं मरण यावं व तुमच्या खांद्यावरूनच माझी अखेरची वारी व्हावी. बस्स काही नको मग मला!" विमलच्या या बोलण्यावर मदनरावांनी ओठावर हात ठेवत, "आजच्या या सुखाच्या घडीला हे काय अपभद्र बोलणं विमा!" टोकलं.

"बघा आधी हो म्हणा! वचन दिलंय!"

"विमे! विधात्याने कुणाच्या भाळी काय लिहलंय हे का कुणास कळलं का कधी!" आणि या वचनामुळेच आज अप्पा सकाळच्या प्रसंगानंतर मनाशी विहीर जवळ करायचं पक्कं ठरवून ही अप्पा माघारले होते.


विमला आजीला गलबलून आलं. आजीनं मनाशीच काही ठरवलं. आपल्यामुळं मानी नवऱ्याची किती अवहेलना होतेय, यानं त्यांनी पक्कं ठरवत मदनरावास झोपवलं.

मागे गोठ्यात गाई-बैलं गव्हाणीतला चारा पोटात बकाबका ढकलत निवांत रवंथ करीत होती. दिवा मलूलपणे ठणठणतच होता. उन्हाळ वारा पडलेल्या भिंताडाकडनं भराभरा, भसाभसा वाहत होता. त्यानं पहाटे पहाटे मदन अप्पास झपकी लागली. संधी साधत विमल आजीनं चोरपावलांनी धडपडत उठत गोठ्याचं परसदार गाठलं. मावठीच्या घोडकल्यात अडकवलेल्या दांडीला थरथरत्या हातानं दोर अडकवला नी...


भोरभोट्या झपकीतनं उठताच मदन अप्पा विमा कुठं गेली पाहत गोठा झामलू लागले. तोच हडकुळ्या देहाचा झुलता झुला दिसताच अप्पा कोसळले.


"विमे खरंच लक्ष्मी गं तू! सुवासिन जायला निघालीस!" 


सून, जगन्यानं नाटकी हंबरडा फोडत झुलता झुला उतरवून राहत्या घरात आणला. खांद्यावर विमेला पोहचवण्याचं वचन दिल्यानं नाईलाजानं मदन अप्पास राहत्या घरात जावंच लागलं.

मोठा मुलगा रमण परिवारासहीत पाचच्या सुमारास पुण्याहून येताच विमेला आंघोळ घालत मधानं अप्पास उठवलं.


"मधा पोरा तुझ्या मालकिणीची तीच इच्छा होती. चल पोरा माझ्या खांद्यावरच तिला अखेरच्या वारीस पाठवायचंय!”


"अप्पा शहाणे सवरते ना तुम्ही!मग धीर द्यायचं सोडुन तुम्हीच..."

नदी घाटावर जिभल्या चाटत अग्नीज्वालांनी विमल आजीला कवेत घेताच, "सुटलो गं बये तुझ्या वचनातून! आता मी मोकळा आहे माझ्या वाटेला जायला...” म्हणत मदन अप्पानं मनात उभ्या जन्माचा आक्रोश मांडला.


रात्री अनिच्छेनचं भाकरीचा कोर तुकडा ढकलत उष्टं तोंड करताना अप्पांना विमलनं आपणास काल शेवटचे चुरमुरे भरवल्याचं आठवलं नी त्यांनी हातावर पाणी घेत अंगणाचा कोपरा धरला.


दहा दिवस त्यांनी कसेबसे काढले. रमण, जगन व सुना आईचं कार्य पुरं करण्याआधीचं मरत भाग शेताची वाटणी कशी करावी याचं गणित मांडत होती. एवीतेवी जगनच ते खात होता. पण तरी रितीरिवाजाला तिलांजली देत बाप हयात आहे याचं भान सोडत तो सोपस्कार ते आधी पार पाडत होते.


मदन रावांना आपल्या संसारातून आपल्याला पोरांनी जितेपणीच कसं उठवलं हा सारा पट आठवू लागला.

मोठा रमण पुण्यात मल्टीनॅशनल कंपनीत मोठ्या हुद्द्यावर होता. जगनचं लग्न होताच आपली जमापुंजी, विमल आजीच्या अंगावरचं सोनं सारं मोडत अप्पानी त्यास पुण्यात टोलेजंग बंगला बांधुन दिला. पण उतारवयात अप्पा व आईसाठी बंगल्यात जागाच मिळाली नाही. मोठ्या फुशारकीनं आई-बापास घेऊन गेल्यानंतर सुनेनं काही दिवसातच सळो की पळो करून सोडलं. रमणनं त्यांना वृद्धाश्रमात ठेवण्याचा निर्णय घेताच अप्पा-आजीनं गावचा रस्ता धरला. कसंही असला तरी जगन्या निदान खाऊ तरी घालेन या आशेने ते गावात परतले. पण जगन्याच्या रखमेनं जखमेवर मीठ चोळत त्यांची रवानगी गोठ्यात केली. उमेदीत मदन अप्पांनी विमलाईनं मोठ्या हौसेन हे राहतं घर बांधलं होतं. खोल्या किती व कशा काढायच्या, देवघर कुठं, न्हाणीघर कुठं, भिंतीला कुठं किती खुंट्या, भिंतीत कपाटं कशी काढायची, सारं बयाजवार व हारीखानं विमलाई आखणी करत घर बांधलं नी आज त्याच घराला पोरांनी पारखं केलं व गोठ्यात मुक्काम हलवला. अप्पा संतापानं विमलेला गाव सोडायला विनवू लागले. पण या वयात कुठं जायचं? पोटाची खळगी भरायची कशी? याचं भान असणारी विमल आजीनं अप्पास शांत करत समजावत कसंही असलं तरी, गोठा का असेना पण गावच्या पांढरीतच राहण्यास विनवलं. पण जगन्याची रखमा गोठ्यात काढूनही जेवणाचा डबा देईच ना. तरी कुतरओढ सहन करत अप्पा-आजी कुत्र्यागत जिणं सहन करत राहु लागली. पावसाळ्याच्या शेवटी शेवटी गोठ्याच्या भिंती सुटू लागल्या. त्या पाहून अप्पांनी एक दिवस जगन्सास विनवलं,

"जगन पोरा गोठ्याच्या भिंती सुटल्यात रे! झोपजागीत पडल्या तर... भिती वाटते रे! तेवढ्या काढून घालून तरी दे!"


मदन अप्पास वाटत होतं भिंती पाहून पोरगं राहत्या घरात राहायला बोलवेन.

पण जगननं भिंती पाहत,

"काय पडणार नाहीत अजून, पडतील तेव्हा पाहू!” सांगत वेळ मारून नेऊ लागला.

पावसाळा संपला भिंतीचे तडे वाढतच राहिले.

मध्यंतरी जगन्याचे सासू-सासरे आले. महिना झाला तरी मुक्काम हलेना. त्याची गैरसोय होऊ नये म्हणून रखमानं जगनला टाॅयलेट बांधायला लावला. अप्पानी बांधकामाचं काम चालु असताना जगन्यास कामातच काम भिंतीही बांधण्याचं पुन्हा विनवलं. रखमाचं पित्त खवळलं.


"चालले गोठ्याच्या भिंती बांधून. गोवऱ्या मसणात गेल्या नी नवीन घराची हौस करतात. पडली तर पडली भिंत. आता कुठं कणसं लागणार आहेत. रायचं असेल तर उगंमुगं रायचं नाहीतर गावच्या मंदिरात मुक्काम हलवायचा!”

अप्पा आजीला तर हे ऐकून मेल्याहून मेल्यागत झालं. अप्पांनी व्याह्यासमोर पाणउतारा होताच अगतिकतेने जगनकडं पाहिलं. जगनच्या तोंडातून एक शब्द निघाला नाही.


अप्पा व आजी वर्मी घाव बसल्यागत मुकाट्यानं गोठ्यात शिरली.

रात्री झोपताना विमलाई अप्पास म्हणाली,

"काहो आपणास एक मुलगी असायला पाहिजे होती!"

"का?अडल्या नडल्या वेळी आपल्याला राहता आलं असतं म्हणून!" अप्पाच्या या बोलण्याबरोबर विमलाई व अप्पाही एकमेकांना बिलगत रडायला लागलीत.


दोन दोन दिवस उपास घडू लागले. कधी तरी मधा घरुन गुपचूप डबा घेऊन देऊन जाई. मधा अप्पाकडं सालगडी म्हणून राबला होता. त्या काळात विमलाई अप्पानं त्याला माया लावली होती. त्याचे उपकार तो पडत्या काळात फेडत होता. पण रखमाला हे कळताच आपली बदनामी करतात म्हणुन मधादेखत सासू-सासऱ्याशी कडाक्याचा वाद घातला व मधाशीही हमरी तुमरी केली. त्या दिवसापासून मधाही येण्यास कचरू लागला. पण तरीही तो अप्पांना गुपचुप घरी बोलवून जेवू घाली व गुपचुप नजरेत येणार नाही अशा रितीनं विमलाईस डबाही देई. कसंतरी दिवस काढणं चालू होतं. जगन तर ढुंकूनही पाहिना. तीच गत रमणचीही.


अखेर भिंती ढासळल्याच. पण त्या बाहेरच्या बाजुनं म्हणुन जीव तरी वाचला. आवाजानं गर्दी गोळा झाली. जो तो रखमा व जगन्यास बोलू लागला. तोच रखमानं नाटक करत, ही माणसं आमच्या जिवावरच उठलीत. यांना आम्ही नकोच, असं नाटक करत अंगावर घासलेट टाकत कांगावा केला. त्यानं जगन्या खवळला व तो अप्पावर धावून गेला. अप्पावर हात टाकला. अप्पाचा देह मारानं नाही पण 'पोटच्या पोरानं हात उचलला!आयुष्यात कमावलेल्या इज्जतीचं खोबरं झालं!’ या विचारानं थरथरू लागला. मधा आडवा पडला नी जगन मागं सरकू लागला.


"मधा सोड त्याला! त्याला मारू दे!त्याला जन्माला घातलं या अपराधाची मला सजा मिळायलाच हवी!” अप्पा आसवं गाळत थरथरू लागला. जगन निघाला. गर्दी पांगली. अप्पा व विमलाईला शांत करत मधाही घरी परतला नी अप्पांनी मळ्याची वाट धरली. पण विमलाईचं वचन आडवं आलं नी अप्पा परतले. अप्पाला सारं आठवताच व विमलेच्या आठवणीत ते अंधारात रडू लागले.


दसवं, तेरावं, तर्पण झालं. विमलाईच्या पिंडाला कावळा शिवलाच नाही. अप्पा काय समजायचं ते समजला. असंही ते वचनातून मुक्त झालेच होते.

सकाळी रमण पुण्याला परतताना अप्पाला सोबत येण्याचं सांगू लागला. पण तोच घरातून मोठ्या सुनेनं दरडावत सुनावलं,

"अहो अप्पांना कशाला आपल्या सोबत नेतायेत? ते येथेच बरे!"

संयमाचा बांध फुटत होता तो महत्प्रयासानं अप्पांनी दाबला. रमण गेला नी रखमानं तोंड उघडलं,

"पाहीलंत निदान आम्ही गोठा तरी ठेवलाय!”


अप्पानं काठी घेतली नी आकांतानी भरलेल्या हृदयानं गोठ्याची वाट धरली. तेरावं झालंच होतं .राहत्या घरात राहण्याचं प्रयोजनच संपलं होतं.


संध्याकाळ होताच गोठ्यात अंधार पसरला. अप्पा दिवा लावायला उठू लागताच विमलेच्या आठवणीनं गलबलले. पाणी पिऊन ते गाव झोपण्याची वाट पाहू लागले. अकरा वाजले. अप्पानी पायात चपला अडकवल्या. काठी घेतली. एकवेळ गोठा, मागच्या बाजुनं राहत्या घरावर नजर टाकली व वाट धरली. मधाचं घर लागलं. अप्पांना मधाची भेट घ्यावीशी वाटली. पण उगाच मोह उत्पन्न होईल नी मग पुन्हा रखडणं नकोच, म्हणून महादेवाचा पार मारुतीचं मंदीर ओलांडू लागले. वतनाच्या मारूतीचं दुरुनच दर्शन घेत अप्पा चार-पाच किमी दूर नदी घाटाकडं निघाले. पहाटपर्यंत ते घाटावर पोहोचले. घाटाजवळच नदीवर बॅरेज बांधून पाणी अडवलं होतं. पुढच्या गावांना उन्हाळ्याची पाणी टंचाई भासत होती म्हणून बॅरेजच्या दोन खिडक्या उघडल्या होत्या. जवळच घाटावर विमलेला जाळलं होतं त्या जागेवरच कुणाचं तरी प्रेत जळत विझण्याच्या वाटेवर होतं.


अप्पा बॅरेजवरील पुलावर चढले. चप्पल व काठी ठेवली. घाटाकडं पाहत, "विमल आलो गं," म्हणत पाण्यात उडी घेतली.


दोन दिवसांनी मधानं विमल आजीला जाळलं होतं त्या घाटाजवळच वाहत्या धारेच्या काठावर तरंगणारं अप्पाचं प्रेत हुडकलं...


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama