वो रात कुछ अजीब थी
वो रात कुछ अजीब थी


“मनु... आत्या आली गं!”...
आईचा आवाज आईकुन मनस्वी लगेच उठून बाहेर आली.. आणि आनंदाने आत्याला कडकडून मिठी मारली!..
एखादं मिनिट तसच गेलं असेल... भानावर येत आत्या म्हणाली... “ कसं गं पिल्लू माझं!.. आत्ता-आत्तापर्यंत तू फ्रॉक घालून फिरत होतीस..आणि आता तुझं पिल्लुड आलंय!.. छान गरगरीत झालीयेस कि महिन्याभरात!... आणि काय गं.... ओली बाळंतीण ना तू?.. बाहेर काय फिरतेस?.. थंडी किती वाढलीये!.. बाळाला सर्दी होईल!... चल आत पटकन!...”
हात-पाय धुवून आत्या आत बाळाजवळ आली...
बाळ शांत झोपलेलं...
“मनु हा एकदम त्याच्या बाबासारखा आहे की!!... त्याला तसच उचलून घेत आत्या म्हणाली...
मनु खोटं रागवत म्हणाली.. “सगळेच असंच म्हणतात... आता तू पण!.. नीट बघ कि!.. एखादी तरी गोष्ट माझ्यासारखी असेल!...”
“रात्री जागवतो का?” आत्यानी हसून विचारलं..
“हो ना गं... रात्रीचे ११ वाजले कि उजाडतं त्याचं !.. मग अगदी पहाटे पाच पर्यंत कार्यक्रम सुरु!”..
“मग या बाबतीत तो तुझ्यावर गेलाय!... तू ही असंच करायचीस!”.... आत्या खळखळून हसत म्हणाली..
मनु पण मनापासून हसली...
त्यांच्या आवाजानी बाळ जागं झालं..
रडत माना फिरवत आईला शोधू लागलं...
“उठला का माझा माऊडा!... भूक लागली ना!... कोन आलंय बघितलश का!... आत्याआजी आलीये तुला भेटायला!”... मनु बाळाला घेत म्हणाली...
“काय ग मनु बारसं कधी ठरवताय?... सुजयला रजा कधी मिळतेय?... आणि बातम्यांतून काही-बाही येत असतं.. काश्मीर मध्ये तो आहे तिकडे सगळं कसं आहे ग?... धोका नाही ना काही?...” आत्यानी काळजीनी विचारलं...
“नाही आत्या विशेष काही नाही!... ठीक आहे सगळं.. तो येईल बहुतेक पुढच्या महिन्यात... त्यानी तर अजून याला पहिलाच नाहीये!...” मनुच्या डोळ्यात किंचित पाणी आलं...
तशी तिच्या डोक्यावरून हात फिरवत आत्या म्हणाली... “तुमचं आर्मीवाल्यांच आयुष्यच वेगळं!.. देव कुठनं तुमच्या गाठी जोडून देतो आणि त्या निभावण्याची ताकद देतो.. त्याचं त्याला ठाऊक!... आणखी वर्षभर असणार ना ग सुजय तिकडे?”
मनुनी मान हलवली...तिच्या पाठीवर थोपटत आत्या बाहेर गेली...मनुनी बाळाला पाजायला घेतलं तसं तिला स्वतःच च मगाचच बोलणं आठवलं...
“विशेष काही नाही..ठीक आहे सगळं..!”
ती स्वतःशीच हसली...
...आणि त्याबरोबर तिला काही महिन्यांपूर्वीचे ते दिवस आठवले... थोड्या दिवसांसाठी ती त्याच्या लोकेशनवर त्याच्या बरोबर राहू शकणार होती. प्रेग्नन्सीचा तिसरा महिना संपलेला... त्यामुळे डॉक्टरांनीही परवानगी दिली होती... फक्त काही बेसिक काळजी घ्यायची होती.... कित्ती खूष होते ते दोघंही!... दहा एक दिवस छान मजेत गेले!..
देवदाराच्या जंगलातलं गाव!...त्यातलं एका खोलीचं घर!... पूर्ण लाकडी... ऑप वर्क शेल्टर म्हणायचे त्याला... त्यांच्या ऑफिसर्स मेसच्या जवळच होत.
... आजूबाजूला सफरचंदाची आणि अक्रोडची झाडं... त्या आवाराच्या भोवतिनी गुंडाळलेल्या तारांच एक कम्पौंड आणि मुख्य रस्त्याजवळ पक्क्या भिंतीच कम्पौंड.... थोड्या थोड्या अंतरावरती उभ्या केलेल्या पोस्ट्स!.. काही जमिनीलगत...तर काही उंच..मचाणावर.. आणि त्यावर सतत गस्त घालणारे जवान!...
“कसं वाटतं रे इथे!... साधा walk करायचा म्हणल तरी इतक्या जणांच लक्ष असतं!..” ती म्हणाली तेव्हा केवढा हसला होता तो!... म्हणे “ madam, हे काही family station नाहीये!... इथे कधीही काहीही होऊ शकतं!... केवढी तरी खबरदारी घ्यावी लागते!..”
ती गेली तरी बिझीच असायचा तो... पण तिथल्या निसर्गाच्या प्रेमात पडली होती ती... एकटीच असली तरी तिचं तिचं रुटीन लावून घेतलं होतं तिने...
एकदा अशीच रात्री त्याची ड्युटी होती... ती रूममध्ये एकटीच होती... तशी भिती नव्हती पण त्या रात्री का कुणास ठाऊक थोडी जास्त पळापळ चालू आहे असं सारखं वाटत होत... जागीच होती ती... नकळत थोडी सतर्क झालेली!..आणि २ वाजायच्या आसपास आधी मेसवर आणि मग पार त्यांच्या खोलीपर्यंत फायरिंग सुरु झालं..
ते आवाज!.. तो गोंधळ!... आणि ती एकटी!... प्रचंड हादरून गेलेली!...
“सुजय please माझ्याकडे ये!”... ती मनात म्हणत असतानाच दार वाजलं...
तिनी घाबरत विचारलं... “सुजय???”
“मेमसाब मै अनिल कुमार!.. साब का सहाय्यक... साब ने आप को यहां से निकलने के लिये बताया... बाहर गाडी खडी है... आप तुरंत निकलीये हमारे युनिटपे हमला हो गया है!”..
कालच तर त्यानी तिच्याकडून एक इमर्जन्सी बॅग भरून घेतली होती!...बॅग घेऊन ती लगेच बाहेर पडली! बाहेर प्रचंड फायरिंग सुरु होत.. भर रात्री त्या आवाजांनी सगळं दणाणून सोडलं होतं... आणि या दिव्व्यातून तिला पार निघायचं होतं!... तिनी एकदाच पोटावर हात ठेवला आणि निर्धारानी पुढे निघाली... त्याच्या सहकाऱ्याबरोबर.... मनात देवाइतकाच सुजयचा धावा करत होती पण तो त्याच्या कामात!...
तारेच्या फेन्समधून गोळ्या आरपार येत होत्या... धड दहा पावलं चलता येईना.. त्यांनी एका मोठया झाडाच्या बुंध्याचा आधार घेतला.. गुपचूप उभे राहिले!... आता पलीकडून फायरिंग कमी झालं आणि आपल्याकडून सुरु झालं... तेवढाच वेळ होता... ते वाकून पळत पुढच्या बंकर पोस्टपाशी पोहोचले!...आणि पलीकडून पुन्हा फायरिंग सुरु झालं... ती त्या बंकर मध्येच डोळे मिटून बसून राहिली... तसाच काही वेळ गेला असेल... बाकी काही सुचत नव्हतं... यात आपला जीव वाचेल कि नाही ते कळत नव्हतं... आता पुन्हा आपल्या बाजूनी फायरिंग सुरु झालं... तसा पुढच्या पोस्टवरून सिग्नल मिळाला आणि ते पुन्हा वाकून पळत पुढच्या बंकरपाशी जाऊन थांबले...
आता थोडी सवय झाली...त्यांच्याकडून फायरिंग सुरु असताना लपायचं आणि आपल्याकडून सुरु झालं कि सिग्नल मिळाल्यावर निघायचं... आत्ता त्या पोस्ट्सचं महत्व कळत होतं... तिथे गस्त घालणाऱ्या त्या जवानांच काम किती जोखमीचं आणि महत्वाचं आहे ते कळत होतं... अखेर ते रस्त्याजवळच्या पक्क्या भिंतीच्या कम्पाऊंडपर्यंत पोहोचले... अजूनही धोका टळला नव्हता... गोळीबार इथपर्यंत चालू होताच! शेवटी भिंतीला चिकटून हळूहळू चालत त्यांनी भिंत पार केली... बाहेर जिप्सी वाट बघत होती...ती आणि तिच्या पोटातलं बाळ दोघं सुखरूप बाहेर पडले... आत बसता-बसता तिनी शेवटचं मागे वळून पाहिलं... तिकडे अजूनही सगळं तसच चालू होत... किती वेळ?.... देव जाणे!....
आत्तापर्यंत बातम्यातून... पेपरमधून कळलेले प्रसंग... ज्यातून ती स्वतः जात होती... तिला स्वतःच कौतुक वाटलं!... तिनी तो प्रसंग निभावून नेला होता!.. पुढच्या क्षणी मनात सुजयचा विचार आला...पण यावेळी भिती नाही वाटली... अभिमान वाटला....आधार वाटला... तिथून निघून दुसऱ्या दिवशी सकाळी ती श्रीनगरच्या ट्रान्झिट कॅम्पमध्ये पोहोचली... आणि मग कुठे त्याच्याशी थोडं बोलणं झालं!...
“कसा वाटला शो?”... त्यानी चेष्टेनी विचारल होतं.....
अजून त्याचा त्या दिवशीचा आवाज कानात घुमतो!.. ती हसली..
“शो कसला!... हॉरर शो होता तो!”.... स्वतःशीच म्हणाली....
...आणि फटsss…..फटsssss च्या जोरदार आवाजानी भानावर आली!...रात्रीचे १२ वाजलेले... “कोणाचा तरी वाढदिवस दिसतोय!....” मनू विचार करत असतानाच आत्या आत आली...
“काय ग बाई लोकं... कधीही फटाके उडवतात!... केवढा तो आवाज!.... बाळ घाबरलं का गं?”
दोघींनी बाळाकडे बघितलं .... बाळ?...
ते तर शांत झोपलेलं...
“अगदी बाबावर गेलाय...” मनू स्वतःशीच हसत म्हणाली...