सिखो ना...
सिखो ना...
शेवटी एकदाचा सुरु झालाच पाऊस!!...परवा पासून हुलकावणी देतोय... रोज दुपारचं भरून येत होतं... वारा सुटत होता!... आणि जणू वारा पावसाला वाहून नेत होता!...आज सुद्धा कित्ती वेळापासून तगमगत होतं!... पण आला बाबा एकदाचा!... माडीवरच्या खिडकीच्या बाहेर हात काढून हातात पाऊस झेलताना ती विचार करत होती... स्वतः च्या तळहातात साठलेलं पाणी पाहून तिला सौमित्र ची कविता आठवली... त्यातली ती ओळ...
“तळहातावर साठेल इवलंस तळ.....”
“...गारवा !!...” ती स्वतःशीच पुटपुटली...
शेजारच्या घराच्या बाहेर खूप लहान मुलं-मुली पावसात खेळत होते!... त्यांना पाहूनच तिला इतकी मज्जा वाटत होती!... तिलाही वाटत होत... त्यांच्यातच जावंसं.... लहानपणीचा पाऊस... पावसाची गाणी.. छत्री उलटी करून त्यात पाणी साठवणं... कित्ती मज्जा!!!....
घराला पत्र्याचं छप्पर होतं... त्यावर पाऊस पडला कि इतक्या जोरात तडतड आवाज यायचा!!!... मग सगळी मुलं अंगणात धूम ठोकायची...
मोठी झाली... तसं पावसात भिजणं कमी झालं...
लग्न ठरलं... तसा पाऊस नवा .. वेगळा वाटला.....
“तिला पाऊस आवडतो... त्याला पाऊस आवडत नाही....” असंच काहीतरी होतं कि त्याचं !!
पाऊस पडायला लागला... कि तो वैतागायचा...
ती शांत असायची...
खाली गाडीचा होर्न वाजला... म्हणजे आलंच तो... अचानक आला पाऊस!... चिडला असेल...
ती लगबगीनी उठली... टॉवेल घेतला....
“काय चिखल झाला सगळीकडे...!! जरा पाऊस पडला कि ट्रॅफिक जाम झालंच म्हणून समजा...
सगळीकडे मरणाची ओल...” तिच्या हातातून टॉवेल घेत तो म्हणाला...
तिने पटकन चहा टाकला... भज्यांची तयारी केली... रेडीओ लावला...
शुभा मुद्गल गात होती... “ सिखो ना ...
. नैनों कि भाषा पिया!!!.....”
मस्त गारवा दाटलेला...
चहा गाळून ती पुन्हा एकदा खिडकीपाशी गेली...
मुलं घरी गेली होती...
एखाद दुसरं अजूनही भिजत होतं आणि मागून आया हाका मारत होत्या...
तिला खूप मज्जा वाटली...
लहानपणी पावसात भिजाल्यानन्तरची ती गरम पाण्याची अंघोळ... आणि स्पेशल आल्याचा चहा... सोबत थोडी बोलणी... आणि त्यामागची काळजी!.... सगळं आठवलं... तिचं तिलाच हसू आलं.....
कळलंच नाही तो कधी मागे येऊन थांबलेला...
चहा झाल्यावर म्हणाला... “अग एक काम राहिलंय... परत बाहेर जावं लागणारे... चल तू पण!!”
“पण भजी??”...
“उशीर होतोय.... आल्यावर कर... पटकन आवर... वेळ कमी आहे....”
थोड्याश्या नाराजीनेच ती तयार झाली....
दोघे बाहेर पडले...
“अहो कुठे चाललोय आपण?.... ऑफिस जवळ का?... काय काम होतं?”...
तो तिला गावाबाहेरच्या टेकडीवर घेऊन गेला...
समोर सगळं गाव धुवून निघाल्यासारख !...
ती बघतच राहिली...
“इथे काय काम आहे तुमचं?”....
माझ्या बायकोला पावसात भिजता आल नाही...
म्हणलं स्पेशल चहा तरी पाजावा...
असाही मला बनवता येत नाही!!....
इथला पिऊन बघ!!... आम्ही मित्र-मित्र यायचो कॉलेजला असताना!... खास चहा पिण्यासाठी!
पुन्हा पावसाचा शिडकावा सुरु झाला...
त्या दिवशी... त्या गारव्यात.... त्या पावसात... त्याच्याबरोबरचा... तो चहा... खरंच स्पेशल होता!!...
तिचं मन गुणगुणत होत...
“कहने को अब बाकी है क्या.... आखों ने सब कह तो दिया!...
सिखो ना.....नैनों कि भाषा पिया.......”