Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.
Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.

प्रा.डॉ.नरेश शंकरराव इंगळे

Drama Tragedy


3  

प्रा.डॉ.नरेश शंकरराव इंगळे

Drama Tragedy


विफल प्रेमातही

विफल प्रेमातही

9 mins 527 9 mins 527

अरे वा! काय भुवन आज खूप मजेत दिसतोय, काय चमत्कार घडला. काही कळेनासे झाले, सतत नशेत गुंग असलेल्या भुवनला विचारीत असतानाच माझ्या मुखातून काही शब्द बाहेर पडण्यापूर्वीच त्याने मला हसतच म्हटले, काय दादा तुम्ही पण, असे बोलता, जणू तुम्हाला काही माहीतच नाही. जगावे तर कसे. चांगले राहिले तरी लोक काही ना काही कुरापत काढतात अन् वाईट राहिले तरी तेच, असे भावनाविवश होऊन मला म्हणत होता.


माणसाने स्वतःला जर ओळखले तर अधोगती त्याच्या जवळपासही फिरकत नाही. भुवनमधील बदल बघून खरोखरच खूपच अत्यानंद झाला होता, पण त्याच्यातील बदल अंतर्मुख करण्यास निश्चितच भाग पाडले. कारण भुवनला मी अगदी बालपणापासून जवळून पाहिले. त्याच्या जीवनात घडलेले एक ना अनेक चढ-उतार बघून कधीकधी असं वाटत होते की, भुवन स्वतःचे जीवन तर संपवणार नाही ना! पण त्याच्या बुद्धिचातुर्याने त्यावर मात करून बाहेर पडला तो आदर्श माणूस म्हणूनच!


भुवन तसा साधाभोळा, भावनाशील, चंचल आणि खूप हुशार होता. साधी राहणी, उच्च विचारसरणी सोबत सभ्यता ओतप्रोत भरलेली होती. कुणाला दुःख न पोहोचविता दुसऱ्याच्या दुःखाला आपले दुःख समजून त्यात समरस होण्यास कधीही मागे कचरत नसे. सामाजिक तळमळतेसोबतच शैक्षणिक उद्दिष्टाकडे कधीही दुर्लक्ष केले नाही. म्हणूनच तो प्रत्येक वर्षी प्रत्येक वर्गात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होत असे. प्रामाणिकपणा, समजूतदार, कर्तव्यतत्पर असलेल्या भुवनने गावातील लोकांबरोबर महाविद्यालयातसुद्धा आदराचे स्थान प्राप्त केले. म्हणूनच इतरांकडून होत असलेल्या आदरामुळे आपली इभ्रत कमी होणार नाही याची महाविद्यालयीन जीवनातही पुरेपूर काळजी घेतली. ऐन तारुण्यात असताना कुणाच्याही समोर प्रेमासाठी हात पसरला नाही किंवा तसा प्रयत्न केला नाही. मित्रमंडळीचे अनुभव लक्षात घेता प्रेमप्रकरणापासून सदा दूर राहण्याचा प्रयत्न केला. इतरांप्रमाणे भुवनच्याही मनाला भुलविण्याचा, त्याच्या भावना जागृत करण्याचा प्रयत्न केला असला तरी कुणालाही सकारात्मक होकार दिला नाही. पण शेवटी भुवन पण एक हाडामासाचा सर्वसामान्य युवक होता. त्यालाही मन, भावना होत्या. म्हणतात ना प्रेमात सर्व काही क्षम्य असतं. प्रेमाचा साक्षात्कार झाला की, कोणतेही उद्दिष्ट पूर्णत्वास जाण्यास वेळ लागत नाही. इतकेच काय तर एखाद्या कुकर्मी डाकूचेसुद्धा मतपरिवर्तन होऊन त्याच्या जीवनाला निश्चित आकार प्राप्त होण्यास वेळ लागत नाही. असाच साक्षात्कार विश्वमित्रासारख्या असलेल्या भुवनच्या जीवनात घडला.


प्रेम केल्या जात नाही तर ते आपोआप होत असते. आपल्या विचाराला विचार मिळणारी मुलगी मिळाली म्हणजे भावना जागृत होऊन प्रेमाचा गुलमोहर बहरू लागतो. त्याला आवश्यक असलेली सुंदर, सुशील, गुणी सुविचारी तसेच प्रफुल्लित, टवटवीत, नाजूक, कोमल मनाची, मितभाषी, कोकीळ स्वरांची, निस्वार्थ, निरागस, निष्पाप, सालस आचार-विचाराने परिपूर्ण अशा रश्मीला बघून त्याच्या हृदयाला पाझर फुटला. लवकरच त्यांच्यात एकमेकाला बघून प्रेम झाले आहे हे कळलेच नाही.


दोघेही एकमेकाच्या प्रेमात चांगले रमले होते. अखेरच्या क्षणापर्यंत साथ निभावण्याच्या आणाभाका घेतल्या होत्या, पण नियतीने अल्पावधीतच त्यांची एकमेकापासून ताटातूट केली होती. रश्मी त्याच्या सहवासातून दूर राहू लागली. तिच्या अशा वागण्याने भुवनवर जणू आभाळच कोसळले होते. कालांतराने रश्मी त्याच्या सहवासात कायमची निघून गेली. कालांतराने दूर जाण्याचे कारण समजले तेव्हा ती इतरासोबत विवाह बंधनात अडकली होती. ती संसारात सुखी समाधानी होती. पण तत्पूर्वी गैरसमज दूर होण्याच्या अगोदर रश्मीला गुन्हेगार ठरवून तो स्वतः वेगळ्या वळणावर येऊन ठेपला होता. पण रश्मीला संधीच मिळालेली नाही, ती तरी काय करणार?


रश्मीच्या बेवफाईने भुवन पूर्णपणे कोसळला होता. आपण स्वतः काय करीत आहे याचीही त्याला कल्पना नव्हती. अशा द्विधा अवस्थेत त्याला काय करावे अन काय करू नये, याचे भानच नव्हते. भूतकाळ त्याच्या नजरेआड होत नव्हता तर भविष्यकाळ अंधरकायमय वाटू लागे. परिणामत: त्याच्या दुःख यातनेत अधिकाधिक भर पडत असे. दुःख त्याचा पाठलाग करीत असताना तिच्यासोबत घालविलेले दिवस अन आणाभाका बेचैन करीत असे. अर्थात त्याची स्वप्ने पायदळी तुडविल्या गेली होती. रश्मीने आपल्यासोबत असे का वागावे आणि दगाबाजी का करावी? मला बाजू मांडण्याची संधी का दिली नाही? आपण तिच्या लायक नव्हतो का? लायक नव्हतो तर तिने हिरवी झेंडी का दाखविली? असे नानाविध प्रश्न, त्याच्यासमोर होते. तसेच यातना, वेदना सहन होत नव्हत्या. पण नाईलाज होता. आपल्या भावना सांगाव्या तर कुणाला. लंगोटी मित्र दुसऱ्या शहरात असल्याने इकडे विश्वासातला जेणेकरून त्याच्याजवळ सांगू शकेल असा मित्र नव्हता. भुवनला मार्ग सुचत नव्हता. जिकडे तिकडे अंधारच अंधार होता. कुण्या कामात तर बरेच बरे पण भूक तहान पण विसरला होता.


दिवसेंदिवस भुवनच्या दुःखात चांगलीच भर पडून रस्ता पण चुकत गेला. रात्रंदिवस घरी न येता बाहेरच्या बाहेर राहू लागला. अशातच भुवन वाईट सवयीच्या नादी लागला. वाईट व्यसनाच्या पूर्णपणे आहारी गेला, नव्हे! वाईट व्यसनाने त्याला चांगलेच पछाडले होते. अगदी निर्व्यसनी असलेला भुवन व्यसनाधीन बघून अनेकांनी तोंडात बोटे टाकली. इतराशी मान-मर्यादेने वागणारा भुवन राजरोसपणे सिगारेट, दारू पिऊन वावरू लागला. रश्मी दुसऱ्या गावी असल्याने तिला पुसटशीही कल्पना नव्हती कदाचित तिने बघितली असते तर आपली निवड काशी चुकीची होती हे तिच्या लक्षात आले असते. पण भुवनच्या वागणुकीतील बदलाला कारणीभूत कोण? रश्मी की भुवन?


कालांतराने भुवनची परीक्षा संपली. निकाल लागला. प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होणारा भुवन यंदा तृतीय श्रेणीत उतीर्ण झाला. आई-वडील कामापुरते शिकलेले असल्याने मुलगा पास झाल्याने आनंदीत होते. व्यसनाधीन असलेल्या भुवनला याचे काही सोयरसुतक नव्हते पण शैक्षणिक अधोगतीने आई-वडिलांच्या विश्‍वासघात करीत आहे ज्यांनी पोटाला चिमटा बांधून शिकविले त्यांच्या आशा-आकांक्षावर पाणी फेरणार आहे याने मात्र निश्चितच हादरला होता. भुवनच्या निकालाची माहिती रश्मीला पण झाली होती. परंतु, सामाजिक मर्यादा आणि आई-वडिलांची इभ्रत यामुळे तिची इच्छा असतानासुद्धा भेटू शकली नाही. मात्र प्रेमावर कितीही बंधने लादले तरी प्रेमी आशेवर जगत असतात. असेच एके दिवशी रश्मीच्या जवळच्या नात्यातील व भुवनच्या एका मित्राच्या परिवारातील लग्नात अचानक दोघांचा आमना-सामना झाला. त्यांच्या प्रेमप्रकरणाची माहिती असणाऱ्यांची संख्या आणि त्यातही तिचा पती तसेच आईवडील लग्न समारंभात असल्याने त्यांना सहजासहजी भेटता आले नाही. पण इतरांच्या नजरा चुकवून संधी पाहून ते एकमेकासमोर आले. भुवन शाब्दिक सूड घेऊन नाकारण्याचे कारण विचारण्याच्या बेतात होता. पण ती समोर येताच सर्व काही विसरला! सूड भावना लोप पावून अगदी प्रेमळ स्वरात म्हणाला, का गं रश्मी! मला वाऱ्यावर सोडून एकाएकी माझ्यापासून दूर का गेली?


ती घाबरली, स्वतःची इच्छा असतानाही वेळेअभावी समर्पक उत्तर देऊ शकली नाही. पण संक्षिप्त संवाद अन, स्वतःला ओळख, हा एकच शब्द उच्चारून निघून गेली. तिच्या पाठमोर्‍या प्रतिकृतीकडे तो बघत राहिला. ती केव्हा नजरेआड झाली याची त्याला कल्पनासुद्धा झाली नाही.


"स्वतःला ओळख" या शब्दाने त्याच्या मनात विचारांचे काहूर निर्माण झाले. पण त्याचे त्याला तात्काळ उत्तर काही मिळेना. पण तो एकच शब्द त्याचा पाठलाग काही सोडत नव्हाता. तिथे त्याने मनसोक्त दारू ढोसली. दारूकडे बघत गुणगुणत होता की, "स्वतःला ओळख, काय ओळखू, तू स्वतःला ओळख, मला याची काहीही एक गरज नाही, मोठी आली उपदेश करायला हारामखोर!" असा बडबडत असताना बाजूच्या टेबलवरचा युवक भुवनजवळ येऊन म्हणाला, तू स्वतःला कुठे ओळखले, तू तर बेवडा बहाद्दर, दारूबाज आहे, तू स्वतःला ओळखले असते तर दारूच्या बाटलीजवळ असता काय? आता तुझी ओळख बाटलीचा सोबती आणि वाट चुकलेला व्यसनाधीन तरुण आहे. तुझ्यासोबत कोण शहाणा मनुष्य मैत्री करणार! असे बोलून तो युवक भुवनला बेशुद्धावस्थेत त्याच्या घरी घेऊन गेला. तो युवक दुसरा तिसरा कोणी नसून त्याचा अगदी बालपणीचा मित्र तसेच वर्गमित्र वीरेन होता.


दुसऱ्या दिवशी भुवन शुद्धीवर येताच विरेनला विचारू लागला, अरे! विरेन मी इथे कसा काय? विरेनने घडलेला सर्व प्रकार त्याच्यासमोर कथन केला. हे ऐकून भुवन हताश तर झालाच शिवाय त्याला स्वतःची स्वतःला लाज वाटू लागली होती. विरेनलाही त्यांच्या वागण्याचे रहस्य उलगडले नव्हते. भुवनमध्ये असा एकाएकी बदल का?कारण भुवन व विरेन बालपणापासूनचे मित्र असल्याने त्याच्या आवडीनिवडी बाबत परिपूर्ण कल्पना होती. विरेन दूरच्या शहरात तर भुवनने गावालगतच्या शहरात इंजिनिअरिंग कॉलेजला प्रवेश घेतला होता. एक वर्षाच्या कालावधीत ते कधी एकमेकांना भेटले नाही. पण भुवनच्या प्रेमप्रकरणाची त्याच्या पत्रव्यवहारावरून कल्पना होती. पण अशा विचित्र वळणावर गेला असेल याबाबत तो पूर्णपणे अनभिज्ञ होता. भुवनची अवस्था बघून विरेनही हतबल झाला होता. शेवटी विरेनने भुवनला म्हटले की, भुवन, तू स्वतःला ओळख असे म्हणताच भुवनला रश्मीच्या शब्दाची आठवण झाली. भुवन स्वतःला सावरुन रश्मीने पण मला हाच प्रश्न केला. कदाचित तुम्ही दोघांनी संगनमत तर केले नाही! असे विनोदाने पण हताशपणे म्हणाला. अखेर विरेनने त्याची चांगली समजूत काढली आणि स्वतःला ओळखण्याचे मार्ग मोकळे करून दिले. भुवनही काही दूधखुळा किंवा अज्ञानी नव्हता. आपण खरोखर चुकलो काय? याबाबत स्वतःस्वतःच अंतर्मुख झाला.


रश्मीने आपल्याला का झिडकारले? तिने नाकारण्याचे कारण काय? माझ्यात कोणती कमतरता आहे? रश्मीचा जीवनसाथी म्हणून तिला सांभाळून घेण्यास असमर्थ आहे का? तिच्या आवडीनिवडी मी पूर्ण करू शकणार? रश्मी ज्या श्रीमंतीत वाढली तेवढे वैभव मी देऊ शकणार का? समाज आम्हाला स्वीकारणार का? आदी प्रश्नाबाबत स्वतःच नंतर अंतर्मुख होऊन रश्मीच्या भावी जीवनाचा विचार करू लागला. परंतु ज्या गोष्टीसाठी आपण रश्मीच्या प्रेमाला पारखे झालो त्या गोष्टी स्वतःच्या मेहनतीने हस्तगत करून आपणही तिच्या लायकीचे आहो हे दाखवून देण्याचा निश्चय केला.


भुवन स्वतःला ओळखून व्यसनाधीनतेतून पूर्णपणे बाहेर पडला. आपले ध्येय पूर्णत्वास नेण्यास पराकाष्ठा करू लागला. इतकेच नव्हे तर रश्मीने त्याला नाकारूनही मनोमन तिच्यावर एकतर्फी प्रेम करू लागला. जे कधीच तिला समजू शकले नाही. तिच्या नाकारण्याचे कारण न विचारता आपण तिच्या पसंतीस, कसोटीत उतरणार नाही तोपर्यंत तिच्या आसपासही फिरकण्याचे त्याने साहस केले नाही. कदाचित दुसरा एखादा युवक असता तर तिला नक्की जाब विचारला असता. पण भुवनने स्वतःची कमतरता समजून तिला दोषी ठरविण्याचे नाकारले. कालांतराने त्याची परीक्षा झाली. तो यावर्षी चक्क प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाला. भुवनमधील बदल बघून कदाचित रश्मीसुद्धा सुखावली असेल! 


कालांतराने भुवनने इंजिनिअरिंगचा अभ्यासक्रम समर्थपणे परिस्थितीशी संघर्ष करून पूर्णच केला नाही तर त्याने घवघवीत यशसुद्धा संपादन केले. आज तो एका नामांकित कंपनीत इंजिनिअर म्हणून कार्यरत आहे. ते केवळ त्याच्या मेहनतीच्या भरवशावर आणि रश्मीच्या एका शब्दामुळे! पण दुर्दैवाने रश्मी त्याच्या जवळुन कितीतरी दूर गेली जिथे जाण्याचे सर्वच मार्ग बंद होते. भुवन अंतिम वर्षात असताना सामाजिक रितीरिवाजाप्रमाणे ती विवाहबद्ध झाली होती. पण हृदयात त्याने तिच्यावर अतोनात जीवापाड प्रेम केले. ते आजतागायत कायम आहे. कायम राहील! रश्मी इतरांसोबत विवाहबद्ध झाल्याने भुवन निश्चितच दुखावला पण रश्मीच्या संसारात कधी हस्तक्षेप केला नाही. याउलट तिच्या नजरेसमोरून दूर राहून जेणेकरून भुवनचे आकर्षण कमी होऊन तिच्या सुखी संसारात रममाण होईल याच हेतूने तिच्या सुखाला आपले सुख समजून स्वतःचे दुःख, वेदना, यातना आणि भावना मनातल्या-मनात कायम ठेवल्या. कदाचित यालाच खरे प्रेम समजावे!


प्रेम हे मानवी जीवनाला मिळालेले अमूल्य असे वरदान आहे. वाट चुकलेल्यांना वाट दाखविते. काळोखाला प्रकाश देते, निराशेला आशेचा किरण दाखविते, जगण्यास व जगू देण्याची शक्ती प्रदान करते. परंतु, आधुनिक काळात प्रेमाचे स्वरूपच बदलून व्यक्ती तितक्या प्रवृत्तीप्रमाणे प्रत्येक जण आप-आपल्या सोयीनुसार उपयोग करतात ते खरे प्रेम नव्हेच! ते वासनेने बेधुंद झालेल्या प्रियकर-प्रेयसीचे शारीरिक सुखाचा अविष्कार होय. ज्यात फक्त शारीरिक समाधान प्राप्त होते. जे क्षणिक असते. म्हणूनच प्रेम बदनाम ठरत आहे. इतकेच नव्हे तर ज्या व्यक्तीवर आपण प्रेम करतो त्या व्यक्तीचे जीवन उद्ध्वस्त करण्यासही आजची तरुण पिढी मागेपुढे पाहत नाही. म्हणूनच दररोज आजूबाजूच्या परिसरात तथा वर्तमानपत्रात एकतर्फी प्रेमातून हत्या, आत्महत्या, पेटवून दिल्याचे प्रकार, किंवा पेटवून घेतल्याचे प्रकार, प्रेयसीच्या शारीरिक शोषणामुळे आत्महत्या, प्रेयसी गर्भवती राहिल्याने प्रियकराने "तो मी नव्हेच"ची घेतलेल्या भूमिकेमुळे उघड्यावर पडलेली प्रेयसी अशाप्रकारचे प्रकार पहावयास मिळते. ते तर प्रेमाचे विकृत स्वरूपच म्हणावे लागेल. जे शारीरिक आकर्षणातून निर्माण झाले. याला आपण खरे प्रेम म्हणाल का?


बदलत्या काळात विफल प्रेम आणि एकतर्फी प्रेमाचे जणू पेवच फुटले आहे. एकतर्फी प्रेमात तर ती आपली झाली नाही, म्हणून तिला दुसऱ्याची होऊ द्यायची नाही. तिचे जीवन उद्ध्वस्त करण्याचे प्रसंगी हिंसक मार्ग पत्करला जाते. पण ते कितपत योग्य आहे? ज्या व्यक्तीवर आपण प्रेम करतो त्या व्यक्तीला संपवून किंवा उद्ध्वस्त करून तिचे प्रेम मिळणार का? एकतर्फी प्रेमाप्रमाणेच प्रियकर व्यसनाधीन होऊन आपल्या अनमोल जीवनाचा नाश करतो. स्वतःच स्वतःच्या अधोगतीचा मार्ग स्वीकारतो. यात मात्र प्रेयसीला कारणीभूत ठरविल्या जाते. अशा कृत्यास तिची सहानुभूती, प्रेम, आपुलकी जिव्हाळा मिळणार का? ज्या कारणासाठी प्रेयसीने नाकारले ती कारणे शोधण्याचा प्रयत्न तरी केले जाते का?


कोणत्याही युवकाने ज्या कारणासाठी तिने नाकारले त्याचा शोध घेऊन त्यावर मात केल्यास तिच्या आदरास आणि अभिमानास निश्चितच पात्र ठरेल. तिच्या आदराबरोबर स्वतःचेही भावी जीवन सुखमय करण्यास मदत होईल. कदाचित भुवनने स्वतःला ओळखले नसते तर तो इंजिनिअर कधीच झाला नसता. प्रेमाने अन रश्मीच्या एका शब्दाने त्याला इंजिनिअर केले. कदाचित रश्मीलाही त्याचा अभिमान वाटत असावा! भुवनने रश्मीच्या विरहात स्वतःला बुडविले असते तर भुवनला ती कधीचीच विसरून गेली असती. व्यक्तीच्या यशात एखाद्या स्त्रीचा हात असतो ते भुवनने सार्थक करून दाखविले. माणूस प्रेमातच यशस्वी होतो, असं नाही तर विफल प्रेमातही यशस्वी होऊ शकतो, हे भुवनने दाखवून दिले. जर कुणाचेही विफल प्रेम असेल तर तुम्ही दुसरा भुवन होणार....!


Rate this content
Log in

More marathi story from प्रा.डॉ.नरेश शंकरराव इंगळे

Similar marathi story from Drama