विजयादशमी आणि निसर्गाचे सोने'
विजयादशमी आणि निसर्गाचे सोने'
आश्विन महिन्याची ती प्रसन्न सकाळ... सर्वत्र दसऱ्याची लगबग सुरू होती. दारावर झेंडूच्या फुलांचे तोरण डोलत होते आणि घराघरांतून सुवासाचा दरवळ येत होता. दसरा म्हणजे साडेतीन मुहूर्तांपैकी एक, वाईटावर चांगल्याचा विजय मिळवण्याचा सण.
या सणाचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे 'सोने' म्हणून आपट्याची पाने एकमेकांना देणे.
आजचे सध्याचे वास्तव मात्र थोडे वेगळे झाले आहे. सकाळ होताच बाजारात आपट्याच्या पानांच्या पेंढ्या विकणारे विक्रेते बसले होते. शहरात राहणारी आजची पिढी उत्साहाने ती पाने विकत घेत होती. पण या उत्साहाच्या मागे एक उथळपणा जाणवत होता.
अनेकांसाठी हे 'सोने' देणे म्हणजे केवळ एक औपचारिकता झाली होती. हातात आपट्याची पाने घेऊन छानसे कपडे घालून फोटो काढणे आणि ते सोशल मीडियावर 'हॅपी दसरा' म्हणून पोस्ट करणे, एवढ्यापुरताच हा सण मर्यादित होत चालला आहे.
सर्वात मोठी खंत म्हणजे, ज्या निसर्गाने आपल्याला हे वैभव दिले, त्याचेच आज नुकसान होत आहे. पैशांच्या हव्यासापोटी जंगलांमधून, ग्रामीण भागातून आपट्याची झाडे बेसुमार ओरबाडली जातात. पाने तोडताना झाडांच्या फांद्या तोडल्या जातात, ज्यामुळे त्या झाडांचे अस्तित्व धोक्यात येते. आणि ज्या पानांना आपण सकाळी 'सोने' म्हणून आदराने डोक्याला लावतो, तीच पाने संध्याकाळपर्यंत रस्त्यावर, कचऱ्याच्या ढिगात पायदळी तुडवली जाताना दिसतात. हा आजच्या वास्तवाचा एक विदारक चेहरा आहे.
या बेसुमार वृक्षतोडीमुळे आज पर्यावरणाचा समतोल पार बिघडून गेला आहे. निसर्गाचे हे चक्र उलटल्यामुळे आज आपण कमालीची तापमानवाढ अनुभवत आहोत; ऑक्टोबर महिना असूनही उन्हाच्या झळा असह्य होत आहेत.
निसर्गाच्या या कोपामुळे यावर्षी पाऊस अत्यंत कमी पडला आणि अनेक भागांत दुष्काळ जाहीर करण्याची वेळ आली आहे. जर आज आपल्याला पाण्यासाठी आणि हिरवळीसाठी असे भीषण दिवस बघावे लागत असतील, तर विचार करा—येणाऱ्या पुढच्या पिढीच्या हातात आपण काय सोपवणार आहोत?
त्यांच्या वाट्याला फक्त रखरखते ऊन, पाण्याचा टिपूस आणि उजाड जमीनच येणार का? हा आज आपल्या सर्वांसमोर उभा असलेला एक खूप मोठा प्रश्नचिन्ह आहे.
पण दसऱ्याचा खरा अर्थ हा निसर्गाचा ऱ्हास करणे नव्हे, तर निसर्गाचे संवर्धन करणे हा आहे.
पौराणिक काळात जेव्हा आपट्याच्या झाडावर सोन्याच्या मोहरांचा पाऊस पडला, तेव्हा मानवाने निसर्गाला कृतज्ञतेची भावना म्हणून पुजले होते. आपट्याचे झाड हे केवळ धार्मिक दृष्ट्या महत्त्वाचे नाही, तर ते एक औषधी झाड आहे. त्याचे रक्षण करणे हे आपले कर्तव्य आहे.
सध्याच्या युगात खरी विजयादशमी साजरी करायची असेल, तर आपल्याला आपल्या विचारांमधील कचऱ्यावर विजय मिळवावा लागेल. बाजारातून पाने विकत आणून ती कचऱ्यात फेकण्यापेक्षा, यंदाच्या दसऱ्याला एक नवा संकल्प करणे गरजेचे आहे. तो संकल्प म्हणजे—निसर्गाकडून फक्त ओरबाडून न घेता, त्याला काहीतरी परत देणे.
सणाचा खरा आनंद तेव्हाच मिळेल जेव्हा आपण प्रत्येकाने आपट्याची पाने तोडण्याऐवजी, या दिवशी आपट्याचे किंवा इतर कोणतेही एक झाड लावून त्याचे संवर्धन करण्याची जबाबदारी घेऊ. जेव्हा सिमेंटच्या जंगलात पुन्हा एकदा हिरवेगार निसर्गाचे सोने बहरू लागेल, तेव्हाच खऱ्या अर्थाने निसर्गावरचा आणि पर्यावरणाचा विजय होईल. नात्यांमधील कटुता विसरून निसर्गाशी नाते जोडणे, हेच या विजयादशमीचे खरे आणि जिवंत रूप असेल.
सुरेखा पवार धोंडगे.
