STORYMIRROR

Surekha Pawar

Drama Inspirational Others

4.5  

Surekha Pawar

Drama Inspirational Others

खडूस संपला तरी.....

खडूस संपला तरी.....

2 mins
12

खडू संपला तरी...
     माझ्या हाताच्या बोटांना पांढऱ्या खडूला पकडण्याची खूप जुनी सवय आहे. आज मी शिक्षिका म्हणून निवृत्त झाले असले, तरी या खडूशी माझी मैत्री मी शिक्षिका होण्याच्या खूप आधीपासूनची आहे.
   लहानपणी जेव्हा मी पहिलीत पाऊल ठेवलं, तेव्हा माझ्या हातात पहिल्यांदा खडू आला. पाटीवर 'अ', 'आ' गिरवताना माझी बोटं थरथरायची, पण त्या चिमुकल्या खडूने मला साथ दिली. 
   अक्षरांना आकार देता देता कधी माझं बालपण संपलं आणि मी मोठी झाले, माझं मलाच समजलं नाही. पुढे जाऊन मी मराठी आणि भूगोल या विषयांची शिक्षिका झाले. 
   ज्या फळ्याकडे मी विद्यार्थी म्हणून पाहत होते, आज त्याच फळ्यासमोर मी शिक्षिका म्हणून उभी होते.माझ्या हातात पुन्हा एकदा तोच पांढरा खडू आला.
    भूगोल शिकवताना फळ्यावर जगाचे नकाशे, डोंगर-नद्या रेखाटणे असो, किंवा मराठीचे धडे शिकवताना सुंदर अक्षरात सुविचार आणि कविता लिहिणे असो; हा खडू माझ्या बोटांमध्ये अगदी सहज फिरायचा.
    मराठीचे संस्कार आणि भूगोलाचे ज्ञान विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवताना या खडूने मला मोलाची साथ दिली. वर्ग संपायचा, खडू हळूहळू झिजायचा. शेवटी त्याचा एक छोटासा तुकडा उरायचा आणि संपून जायचा. 
   पण खडू जरी संपला तरी त्याने फळ्यावर सोडलेले शब्द आणि दिलेले ज्ञान कधीच संपत नाही, हे मला ठाऊक होते.आज मी शाळेतून अधिकृतपणे निवृत्त झाले आहे. 
    काळही बदलला आहे आणि आज डिजिटल युग आले आहे. पण माझी ज्ञानदानाची आणि अभिव्यक्तीची सेवा थांबलेली नाही.
    आजच्या या डिजिटल युगातही मी 'प्रतिलिपी' ॲपवर माझ्या कथांचे लेखन करत आहे आणि 'इन्स्टाग्राम'वर नवनवीन व्हिडिओ बनवून लोकांपर्यंत पोहोचत आहे. 
    आज जर मी या वयातही नवीन तंत्रज्ञानाशी इतक्या सहजपणे जुळवून घेऊ शकले असेल, तर ते केवळ माझ्या त्या जुन्या मित्राच्या म्हणजेच 'खडूच्या' कृपाशीर्वादाने!
   कारण त्यानेच सुरुवातीला माझ्या बोटांना अक्षरे गिरवायला शिकवले, माझ्यामध्ये आत्मविश्वास निर्माण केला आणि आयुष्यभर काहीतरी नवीन शिकण्याची वृत्ती दिली.
   आज माझ्या हातात प्रत्यक्ष खडू नसला, तरी त्याची पांढरी पूड आणि त्याचे अस्तित्व माझ्या हृदयात कायम आहे.
    खडू संपला तरी... त्याची आणि माझी घट्ट मैत्री, त्याने दिलेले संस्कार आणि शिक्षिका असण्याचा माझा अभिमान माझ्या हृदयात आणि आता या डिजिटल विश्वातही आयुष्यभर जिवंत राहील.

सुरेखा पवार धोंडगे. 6/10/2026


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi story from Drama