STORYMIRROR

Surekha Pawar

Drama Inspirational

4  

Surekha Pawar

Drama Inspirational

शाळेची सहल: एक अवखळ प्रवास, एक सुंदर आठवण!

शाळेची सहल: एक अवखळ प्रवास, एक सुंदर आठवण!

3 mins
7

शाळेची सहल: एक अवखळ प्रवास, एक सुंदर आठवण!
   "चल गं बेटा, लवकर आवर... आज शाळेची सहल आहे ना!" आईच्या या एका वाक्याने डोळे खाडकन उघडायचे. रात्री कपाटात नीट रचून ठेवलेला पांढरा-निळा गणवेश, नवीन घेतलेली पाण्याची बाटली आणि डब्यात भरलेली छान भाकरी, चमचमीत ठेचा, कांदा नि पिठलं... शालेय जीवनातील सहल म्हणजे आमच्यासाठी एखाद्या मोठ्या सणासारखीच असायची!
       आमच्या लहानपणच्या सहली आजच्यासारख्या विमानाने किंवा मोठ्या रिसॉर्टवर जाणाऱ्या नव्हत्या. त्या असायच्या अगदी साध्या, अवतीभवतीच्या निसर्गाशी नाते सांगणाऱ्या. पावसाळा सुरू झाला की, आमचे शिक्षक आम्हाला जवळच्या डोंगरांवर घेऊन जायचे. हातात बियाण्यांची पाकिटे असायची. "मुलांनो, आज आपल्याला निसर्गाचे ऋण फेडायचे आहे," असं सरांनी सांगितलं की आम्ही अगदी उत्साहाने मातीत बियाणे रुजवायचो. तो पावसाचा पहिला सुवास, चिखलात माखलेले पाय आणि आपण लावलेल्या बीजातून उद्या एक मोठा वृक्ष तयार होईल हा निरागस आनंद काही वेगळाच असायचा.
     हिवाळा आला की सहलीची दिशा बदलायची. मग नदी, नाले, डोंगर आणि आजूबाजूचे हिरवेगार निसर्ग अनुभवणे हाच मोठा विरंगुळा असायचा. कधीतरी एखाद्या साखर कारखान्यात किंवा चॉकलेट फॅक्टरीत सहल जायची. तिथे साखर कशी बनते, चॉकलेटचे ते गोड पाश कसे तयार होतात, हे उघड्या डोळ्यांनी बघताना आमचे डोळे विस्मयाने मोठे व्हायचे. 
    दुपारच्या जेवणाची वेळ झाली की सगळे एका झाडाखाली गोलाकार बसायचे. आम्ही घरून आणलेली ती भाकरी-ठेचा आणि पिठलं-कांदा सगळ्यांसोबत वाटून खायचो. विशेष म्हणजे, आमचे शिक्षकही आमचा तो गावरान बेत अतिशय आवडीने आणि चवीने खायचे. 
   शिक्षकांसोबत बसून तो ठेचा-भाकरी खाण्याचा आनंद काही वेगळाच होता. शालेय जीवनात गेलेल्या या मोजक्याच सहली, पण तो आनंद कसा होता? एकदम स्वच्छंद! कोणतीही काळजी नाही, फक्त मित्रांसोबत हुंदडणे, शिक्षकांच्या धाकातही लपून खोड्या करणे आणि निसर्गाच्या कुशीत मनसोक्त रमणे.
     ...आणि काळाचे चक्र फिरले. ज्या शाळेच्या बसमध्ये कधीकाळी मी खिडकीपाशी बसण्यासाठी भांडायचे, त्याच बसमध्ये आज मी एक 'शिक्षिका' म्हणून चढले होते. होय, शिक्षिका झाल्यानंतर दरवर्षी मुलांना सहलीला घेऊन जाण्याचे दिवस सुरू झाले.
आता अनुभव पूर्णपणे बदलला होता. 
     लहानपणचा तो स्वच्छंदपणा आता एका मोठ्या जबाबदारीत बदलला होता. बसमध्ये चढल्यापासून ते मुलांची हजेरी घेणे, कोणी मागे राहू नये याची काळजी घेणे, कोणाला उलटी किंवा चक्कर येत नाही ना यावर लक्ष ठेवणे... डोळ्यात तेल घालून प्रत्येक मुलाकडे लक्ष ठेवावे लागायचे. पण गंमत म्हणजे, या जबाबदारीच्या ओझ्याखाली तो सहलीचा आनंद कुठेही हरवला नाही. उलट, प्रत्येक वेळचा अनुभव नवा आणि तितकाच समृद्ध करणारा होता.
     जेव्हा एखादा लहानगा निसर्गाचे सौंदर्य पाहून टाळ्या वाजवायचा, जेव्हा चॉकलेट फॅक्टरीत चॉकलेट बनताना पाहून मुलांच्या चेहऱ्यावर जे आश्चर्य उमटायचे, तेव्हा मला माझ्या बालपणाची सावली त्या मुलांमध्ये दिसायची. 
   मुलांचे ते निष्पाप हास्य, त्यांचा तो अवखळपणा बघताना माझ्यातील शिक्षिका कुठेतरी मागे पडायची आणि माझ्यातली ती 'लहान मुलगी' पुन्हा जागी व्हायची. मुलांसोबत गाण्याच्या भेंड्या खेळताना, त्यांच्यासोबत डबा खाताना मी वयाचे सगळे बंध विसरून जायचे.
      आजही जेव्हा शांत बसलेले असते आणि त्या जुन्या आठवणी डोळ्यांसमोरून जातात, तेव्हा मन एकदम भूतकाळात धाव घेते. असं वाटतं, ते दिवस कधी संपूच नयेत. आज मला या प्रवासातून एक गोष्ट नक्की जाणवते—शिक्षक हा वयाने कधीच मोठा होत नाही. तो कायम बालपणीसारखाच राहतो. कारण, रोज लहान मुलांच्या गराड्यात राहून, त्यांच्यात रममाण होऊन, त्यांच्यासारखंच निष्पाप जगणं शिक्षकाच्या नशिबात असतं.
      शालेय जीवनातील ती बालपणीची सहल आणि आज शिक्षिका म्हणून जाणारी सहल... दोन्हीची रूपे वेगळी असली, तरी दोन्हीचा गाभा एकच होता—तो म्हणजे 'आनंद आणि फक्त आनंद!' आजच्या धकाधकीच्या आयुष्य्यातही मनात जपून ठेवलेला हा सहलीचा कप्पा नेहमीच मनाला टवटवीत ठेवतो.

सुरेखा पवार धोंडगे. 17/10/2026.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi story from Drama