STORYMIRROR

Surekha Pawar

Drama Inspirational

4  

Surekha Pawar

Drama Inspirational

नदिने सांगितलेले गोष्ट:

नदिने सांगितलेले गोष्ट:

3 mins
0


    माझ्या गावाच्या कुशीतून खळाळत वाहणारी ती केवळ एक नदी नव्हती, तर ती माझी बालपणीची सखी, माझी 'कान्हेरी माता' होती. 
       लहानपणापासूनच आमचं नातं असं काही घट्ट विणलं गेलं होतं की, तिच्या पाण्यात मनसोक्त डुंबल्या शिवाय आणि तिच्या लहरींवर आमचे आनंदाचे तरंग उमटल्या शिवाय आमचा दिवस पूर्ण व्हायचा नाही. 
    तिच्या काठावरची ती हिरवीगार आमराई आणि उन्हाळ्यात तिथे जाऊन मैत्रिणीसोबत मनसोक्त आंबे खाण्याची मजा... आहा! तो आनंद केवळ स्वर्गीय होता.
     पुढील शिक्षणासाठी जेव्हा मला गाव सोडून शहरात जावं लागलं, तेव्हा कान्हेरीच्या पाण्यात रोज डुंबणं सुटलं खरं, पण तिची ओढ अजिबात कमी झाली नाही. शहरात येता-जाता जेव्हा कधी मी तिच्यावरून जायचे, तेव्हा ती मंद वाहताना मला सुखद अनुभव देऊन जायची. 'मी अजूनही तुझीच वाट पाहतेय,' असं जणू ती तिच्या संथ संगीतातून मला सांगायची.
    काळ बदलला आणि शेवटी मे महिन्याचे ते दिवस आले, जेव्हा माझं लग्न ठरलं. लग्नाचा सोहळा थाटामाटात पार पडला आणि संध्याकाळच्या वेळी माझी पाठवणीची वेळ झाली. मी माझ्या लाडक्या गावाला आणि कान्हेरी मातेला सोडून सासरी निघणार होते. पण निसर्गाच्या मनात काहीतरी वेगळंच होतं.अचानक आकाश ढगांनी दाटून आलं आणि बघता बघता 'धो-धो' पाऊस कोसळू लागला. 
    माझ्या कान्हेरी नदीला एवढा प्रचंड पूर आला की, नदीने रौद्र पण तितकंच प्रेमाचं रूप धारण केलं. पुरामुळे आमची संपूर्ण वऱ्हाडी मंडळी गावातच अडकून पडली.
     आमचं गाव जरी छोटं होतं, तरी तिथल्या माणसांची मनं अथांग सागरा सारखी मोठी होती. ज्या घरासमोर पाहुणे थांबले, तिथेच त्यांची आदरातिथ्यासह मुक्कामाची व्यवस्था झाली. आणि अर्थातच, माझाही गावातला मुक्काम वाढला!त्या रात्री मला जाणवलं, हा पूर दुसरं काही नसून माझ्या कान्हेरी मातेचाच मायेचा जिव्हाळा होता. तिची इच्छा होती की, 'तू आजचा दिवस अजून माझ्या कुशीत राहून जा.' तिच्या डोळ्यातून वाहणारे प्रेमाचे अश्रू म्हणजेच तो पूर होता, ज्याने मला एका रात्रीसाठी तिथून हलूच दिलं नाही. एका आईने आपल्या लेकीला निरोप देताना अडवावं, तसंच कान्हेरीने मला थांबवून घेतलं होतं.आणि गंमत म्हणजे काय, दुसऱ्या दिवशी निसर्गाचं रूप पार बदलून गेलं होतं.
    सकाळी जेव्हा आम्ही निघालो, तेव्हा पूर्व दिशेला सूर्यनारायण प्रकट झाले. त्यांच्या कोवळ्या, सोनेरी किरणांनी पृथ्वीवर जणू मखमली पायघड्या घातल्या होत्या. 
    रात्री जिने पुराने मला थांबवलं होतं, त्याच कान्हेरी मातेने सकाळी संथ आणि शांत होऊन, माझ्या प्रवासाचे पाय धुवून मला अत्यंत प्रेमाने निरोप दिला.
     निसर्ग माणसावर किती अथांग आणि अलौकिक प्रेम करू शकतो, याचा हा जिवंत अनुभव माझ्या काळजात कायमचा कोरला गेला. 
     कान्हेरी केवळ पाण्याचा प्रवाह नव्हती, तर ती माझ्या आयुष्यातील प्रत्येक सुखा-दुःखाची साक्षीदार असलेली एक माऊली होती.
      खरोखर, ही जणू माझ्या आयुष्यात त्या कान्हेरी नदीनेच स्वतःहून सांगितलेली एक अबोल गोष्ट होती. ती माझ्या सुख-दुःखात नेहमीच एखाद्या जिवलग मैत्रिणीसारखी उभी असायची. तिची नि माझी मैत्री इतकी अथांग आणि घट्ट होती की, माझ्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाच्या म्हणजेच माझ्या लग्नाच्या दिवशीसुद्धा तिने पूर आणून मला प्रेमाने थांबवून घेतले.
     ही माझी लाडकी कान्हेरी नदी, माझी सखी खरोखरच किती छान, किती अपूर्व आणि मायाळू होती, याचा विचार करून आजही माझं मन कृतज्ञतेने भरून येतं.

   सुरेखा पवार ( धोंडगे)


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi story from Drama