Sunita madhukar patil

Inspirational Others

4.5  

Sunita madhukar patil

Inspirational Others

व्हीस्पर... एक कुजबुज !!!

व्हीस्पर... एक कुजबुज !!!

4 mins
598


अमेय आज जरा लौकरच ऑफीसमधून घरी आला होता. आस्था आणि तो दोघे चहा पीत निवांत गप्पा मारत बसले होते. इतक्यात त्यांची छोटी चिमुरडी सखी हातात सॅनिटरी पॅड घेऊन आली आणि म्हणाली. "पापा, माझ्या डॉलसाठी छान गादी सापडली. मम्माने कपाटात लपवून ठेवली होती. मला सापडली, छान आहे ना !!!." 

अमेय आणि आस्था दोघे एकमेकांकडे आश्चर्याने पाहूं लागले. आस्थाने लगबगीने उठून तिच्या हातातील पॅड हिसकावून घेतलं आणि तिला ओरडणार इतक्यात अमेयने,"अगं, तिच्यावर ओरडू नकोस तिच्या कुशाग्र बुद्धीची तुला दाद द्यायला हवी. आता तिला त्या गोष्टीचा वापर का करतात हे ठाऊकच नाही तर तिला ओरडून काही उपयोग आहे का?" म्हणत तिला गप्प केलं.

सखी सहा वर्षाची होती. अमेयने तिला न रागावता तिच्या चिमुकल्या मनाचं कौतुक केलं. तिच्या कल्पनाशक्तीची दाद दिली. मासिक पाळीबद्दल समजावून सांगायचं तिचं वय नसल्यामुळे तो तिच्यासोबत खेळण्यात मग्न झाला. सखी सोबत खेळता खेळता तो आस्थाच्या अश्या वागण्याचा विचार करत होता. आस्था चांगली उच्चशिक्षित, नोकरी करणारी पण तिनेही ह्या गोष्टीवर अशी प्रतिक्रिया द्यावी हे काही त्याच्या मनाला पटत नव्हतं. त्याला अजुनही चांगलंच आठवत होतं, कधी दिवसा, कधी रात्री तर कधी बेरात्री कावळा शिवला आहे अस सांगून आई वेगळं अंथरूण करायची. कावळा कधीही येतो कुठून, आणि शिवून कसा जातोे आणि तो कोणाला दिसत कसा नाही हे काही केल्या त्याला कळायचं नाही. पण ते चार-पाच दिवस आईचं जेवण, ताट, कपडे सगळं वेगळं ठेवलं जायचं. तिच्या जवळ जायचं नाही आणि तिला शिवायचं नाही अशी सक्त ताकीद त्याला आणि त्याच्या भावंडांना असायची.

लहान असताना टीव्ही वर सॅनिटरी पॅडची जाहिरात झळकायची. जाहिरातीत पॅडवर निळं पाणी किंवा शाई ओतलेली असायची. तेंव्हा त्याचा अर्थ काहीच कळत नव्हता. एकदा तर बाबांना तो म्हणाला देखील होता की " बाबा हे शाई वगैरे सांडलं तर पुसायला छान आहे, बघा सगळी शाई कशी आत शोषली जातेय. किती छान ना !!! मला आणुन द्याल का?." तेंव्हा बाबांच्या हातचा एक फटका पाठीत पडला होता पण तो का पडला याच उत्तर त्याच्या बालमनाला तेंव्हा तरी गवसलेलं नव्हतं.

अमेयला आठवले एकदा त्याची आई खूप आजारी पडली होती. आठवड्याभरासाठी हॉस्पिटलमध्ये अॅडमिट होती. तेव्हा तिला पहिल्यांदा त्याने पॅड आणून दिले होते. पॅड कसे असतात याची उत्सुकता होतीच मनात म्हणुन उत्सुकतेपोटी ते पाकिट फोडून पाहिल्यावर पहिल्यांदा सॅनिटरी पॅड कसे असतात ते त्याला कळालं होतं. जसा जसा तो मोठा होऊ लागला आणि सायन्स शाखेचा विद्यार्थी असल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचा उलगडा त्याला होऊ लागला. तसा तसा तो या गोष्टीचा अगदी खोलात जाऊन विचार करू लागला. मग त्याचे मासिक पाळीत बाजूला बसण्यावरून आईसोबत खूप खटके उडायचे. 

आई त्याला समजवायची, "अरे, तुला काय करायचं ह्या साऱ्या गोष्टींनी. ह्या बायकांच्या संबधित गोष्टी आहेत. या विषयावर बायकासुद्धा मन मोकळेपणाने बोलत नाहीत आणि तुझं काय चालू आहे. निर्लज्जपणे कोणत्याही विषयावर बोलत असतोस." "अगं, निर्लज्जपणे काय म्हणतेस आई, या विषयावर चर्चा व्हायला हव्यात. हा तुमच्या शरीर स्वास्थ्याशी निगडित विषय आहे. झाकून लपवून ठेवण्याचा विषय नाही." तो आईला समजवायचा. पण घरातील इतर वडीलधाऱ्यांची कर्मकांड चालूच असायची. स्वतःच्या सोयीनुसार प्रत्येक गोष्टींचे अर्थ लावले जायचे, नियम बनवले जायचे आणि हवे तेंव्हा त्याच्यात बदल ही केले जायचे हे त्याला कधीच पटत नव्हतं. 

त्याच्या लग्नानंतर आस्थालाही पाळीदरम्यान बाजूला बसण्यावरून पुन्हा खूप वादविवाद झाले. "अरे, हे पुर्वजानीं घालून दिलेले नियम आहेत. आम्ही सगळे बसत नव्हतो का बाहेर मग तुम्हाला काय होतं. ही आजची पिढी म्हणजे निव्वळ वाया गेलेली काही सोवळं ओवळ पाळायला नको." ह्या प्रकारची उत्तरे देऊन गप्प केलं जायचं. आई आणि बायकोमध्ये सँडविच होऊन जायचं त्याचं. पण त्याच्या विचारांवर तो नेहमीच ठाम असायचा परिणामी आस्थाच वेगळं बसणं बंद झालं. पण आता परिस्थिती बदलली आहे. दुकानातून पॅड आणताना पॅडची क्वालिटी, दर्जा या सगळ्या गोष्टींकडे लोकांचं लक्ष असतं. मुख्य म्हणजे दुकानदारदेखील पॅड कागदात गुंडाळून देत नाहीत. त्याच्या आईलादेखील त्याचं म्हणणं आता पटलेलं आहे. परिस्थिती बदलत आहे.

आता आता तर तो त्या चार दिवसात आस्थाची विशेष काळजी घेतो. तिला आराम कसा भेटेल, तिची जास्त चिडचिड होणार नाही या कडे त्याच लक्ष असतं. व्हीस्पर म्हणजे कुजबुजणे पण मासिकपाळी हा कुजबुजण्याचा विषय नाही. हा खुलेपणाने बोलण्याचा, चर्चा करण्याचा, विचारांमध्ये बदल घडवण्याचा विषय आहे. 

"अमेय, अरे सॉरी मघाशी माझं चुकलंच जरा, मला अस रिऍक्ट व्हायला नको होतं." आस्था सखी आणि अमेयसोबत खेळात भाग घेत बोलली आणि... अमेय तिच्याकडे पाहून गोड हसला.


© copyright

© all rights reserved.

या कथेच्या प्रकाशनाचे आणि वितरणाचे सारे हक्क लेखिकेकडे राखीव. कथेत अथवा कथेच्या नावात किंवा कथा लेखिकेच्या नावाशिवाय आढळून आल्यास तो कॉपी राईट कायद्याचा भंग मानला जाईल. कथा जशीच्या तशी शेअर करण्यास काहीही हरकत नाही.


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational