वारस - भाग ५
वारस - भाग ५
रामजीला आज सकाळी सकाळीच मल्हारी बाहेरून आलेला दिसला . एवढ्या सकाळी हा कुठे गेला होता ? रामजीला प्रश्न पडला . कारण एकतर मल्हारी कधीच लवकर उठत नव्हता .आणि आता तर बायको पण माहेरी होती . रामजीने सखुला विचारले तर तिलाही काही माहीत नव्हते .
मल्हारीलाच विचारावे म्हणून तो त्याच्या खोलीत गेला तर तो कपाटात काहीतरी ठेवत होता . रामजीची चाहूल लागताच दचकून मागे फिरला तसा त्याच्या हातून कसली तरी पुडी खाली पडली .रामजीला काहीतरी गडबड आहे याची जाणीव झाली .मल्हारी चेहऱ्यावरची भीती लपवत रामजीला काय काम आहे म्हणून म्हणाला . त्याची अवस्था बघून रामजी , " काही नाही . " असे म्हणून माघारी वळला .
रामजीला दिवसभर चैन पडेना . मल्हारी पण पेठीत आला नाही . तो समोर यायचं टाळत होता .नक्की काय करतोय हा मुलगा ? हा प्रश्न रामजीला अस्वस्थ करत होता . त्याने ठरवले याचा छडा लावायचा .तो सारखा मल्हारीच्या नकळत त्याच्यावर पाळत ठेवू लागला .
रामजीच्या लक्षात आले की मल्हारीचा कोणीतरी मित्र सारखा वाड्यावर येत होता .ज्याला रामजीने पहिले कधी पाहिले नव्हते . असेल कोणीतरी म्हणून त्याने दुर्लक्ष केलं .पण मल्हारीच्या वागण्यातला फरक त्याला जाणवत होता .तो पहिल्यासारखा आई सोबत , घरात बोलत नव्हता . बायको माहेरी आहे आणि बाळाला गमावल्यामुळे गप्प असेल म्हणून सखूने रामजीची समजूत काढली.पण तेवढ्याने रामजीचे समाधान झाले नाही .
एका दुपारी मल्हारी बाहेर गेला होता , ती संधी साधून रामजी भितभित त्याच्या खोलीत गेला आणि कपाटात काय ठेवले आहे ते शोधू लागला .
सगळ समान वरखाली केल्यावर त्याला ती पुरचुंडी सापडली , जी त्यादिवशी घाबरून मल्हारीच्या हातून खाली पडली होती. वास घेवून पाहिले रामजीने तर ती एका जहाल विषाची पूड होती . रामजी पुरता हादरला .नखशिखांत थरथरला . घामाघूम झाला तो एका अनामिक भीतीने .
तो सगळं परत पाहिल्यासारखं ठेवून तिथून बाहेर पडला . स्वतःच्या खोलीत येवून दार बंद करून घेत मटकन खाली बसला. त्याला काही सुधरेना. अंगातली भीतीची थरथर काही केल्या कमी होईना . बराच वेळ गेला तसाच .बाहेर सखू आवाज देत होती .तो तसाच उठला, पाणी पिला घटघट, तोंडावर पाण्याचे हबके मारून स्वतःला सावरत दार उघडून बाहेर आला .सखुला आत्ताच काही बोलणे योग्य नाही असे वाटून तो तसाच चौकीत साबळेना भेटायला आला.
सुरवातीला त्याने काही ओळख न देता फक्त विचारपूस करायला आलो असे सांगून तपास कुठवर आलाय म्हणून विचारले .
साबळेना पण काही शंका नाही आली , कारण रामजी त्या गावाचा विश्वासू आणि कर्तबगार व्यक्ती होता . साबळेनी तपासाची गती रामजीला
सांगितली . त्यांची गुन्हा करायची पद्धत त्यांनी त्यांचा तर्क लावून सांगितली . मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून , कोणाला काही कळायच्या आधीच , एक दोन भेटीतच त्यांचे शिल भ्रष्ट करून त्यांना संपवून टाकतात , त्याआधी विष पाजतात हे ऐकल्यावर रामजीला घाम फुटला . तो , " बर बर ! " एवढंच म्हणून तिथून उठला आणि बाहेर पडला . साबळे थोडे चक्रावले की रामजीला अचानक काय झाले ?
रामजी घरी आला तो सरळ आपल्या खोलीत गेला .सखू नवऱ्याला आज झाले आहे याचा विचार करत आपल्या कामात गुंतून गेली. रामजीला आठवले , त्यादिवशी जेव्हा मल्हारी सकाळच्या वेळी घरी आला त्याच्या आदल्या दिवशीच त्याचा तो मित्र दुपारचा घरी आलेला आणि दोघे बराच वेळ दार बंद करून बोलत होते. असेल कोणी म्हणून रामजीने आणि सखूने दुर्लक्ष केलं होतं आणि दुसऱ्या दिवशी दुपारी नदीच्या काठावर पाचव्या मुलीचा मृतदेह सापडला होता .
रामजी बधीर झाला पूर्ण .आपला मुलगा असले काम करू शकतो याची त्याला खात्री पटेना .मल्हारीच्या अनेक खोड्या त्याने नजरेआड घातल्या होत्या , त्याचा सोज्वळ चेहरा त्याचा गुन्हा मनाला मानू देत नव्हता . तो असं करूच शकत नाही असच रामजीचं मन त्याला समजावत होतं पण समोर दिसणारे चित्र त्याला स्वतःच्या मन:पटलावरून पुसता येत नव्हते .
काय करावे त्याला कळेना .दैवाला दोष देत तो असा कसा वंशाचा दिवा माझ्या पोटी जन्माला आला म्हणून ऊर बडवून घेवू लागला .
शांत झाल्यावर तो हे सगळं साबळेना सांगावं म्हणून चौकीत जायला निघाला .पुन्हा थबकला कारण आत्ता पर्यंत जेवढे गुन्हे झाले ,त्याचे काहीच पुरावे पोलिसांना सापडले नव्हते . मल्हारी आणि त्याचा मित्र विनापुरावे सहज सुटू शकत होते .सुटल्यावर रामजी आणि सखू कोणत्या तोंडाने त्याला सामोरे गेले असते ? आपलेच आईवडील आपल्याविरुद्ध तक्रार करताहेत हे कळल्यावर एवढे खून करणारा आपल्या आईवडिलांना जिवंत सोडेल का ? आणि रूपा ?? तिचे काय ?
सुनेच्या आठवणीने रामजी हबकला .
काय करायला हवे ? जे चाललंय ते चालू द्यावं का ? जेव्हा कळायचं तेव्हा कळेल पोलिसांना !असाही मल्हारी आणि त्याचा मित्र खुप खबरदारी घेतात गुन्हा करताना ! नाहीच कळणार कोणाला ! गप्पच रहाणं चांगलं ! नको कोणाला काही सांगायला !
रामजी विचारात कधी चौकीत पोहोचला त्याला कळलच नाही . विचारात तो तसाच एका पोलिसाला धडकला आणि खाली पडला . त्याला हाताला धरून उठवत पोलीस म्हणाला , " काय रामजी भाऊ ? कुठल्या तंद्रीत आहात ? "
रामजी ला कळेना मी इथे कसा आलो ??
त्यांचा आवाज ऐकून साबळे बाहेर आले .
काहीतरी गडबड नक्कीच आहे हे त्यांच्या लक्षात आले .ते रामजीला आत घेवून गेले , पाणी प्यायला देवून शांतपणे म्हणाले , " रामजी काही गडबड आहे का ? कधीच चौकीत न येणारे पाय नकळत आज दोन दोन वेळा कसे काय इकडे वळताहेत तुमचे ? "
रामजीला रडू आवरेना . पुरुषासारखा पुरुष हमसून रडू लागला . साबळेना पण कळेना .
त्याचे रडणे थांबले मग रामजीने काय काय झाले ते सांगितले .
साबळे स्तब्ध झाले सारं ऐकून .गुन्हेगार तर कळला पण पुरावा कुठे होता काही मल्हारीला गुन्हेगार ठरवायला ?
त्यांनी मग गुन्हेगाराला पकडायला कसा सापळा रचला आहे त्याबद्दल रामजीला सांगितले .
रामजी आधीच उध्वस्त झालं होता .तो बरोबर करतो आहे का चुकीचे , ह्यातच अजून गुरफटला होता .
एकीकडे एकुलत्या एक मुलाचे आणि सुनेचे भवितव्य तर दुसरीकडे व्यसनाच्या हव्यासापोटी हकनाक बळी जाणाऱ्या निष्पाप मुली !
तो साबळेना , " जे योग्य असेल ते करा . " असे सांगून तिथून निघून आला .
साबळे आता कामाला लागले , त्यांच्या आखलेल्या सापळयाप्रमाणे त्यांना एका निडर मुलीची गरज होती ,आणि जी गावात नवीन आलेली असायला हवी होती .
त्यांच्या बघण्यात , त्यांच्याच खात्यातल्या एका पोलिसाची मुलगी होती .त्यांनी सगळी योजना तिला आणि तिच्या वडिलांना समजावून सांगितली .
गुन्हेगार पकडला जावा आणि इतर निष्पाप मुलींचे भवितव्य धोक्यात येवू नये म्हणून दोघे बापलेक तयार झाले त्या नाट्यात सहभागी व्हायला .
मुलीला एका पोलिसांच्या घरी पाहुणी आहे म्हणून थोड्या दिवसांसाठी राहायला बोलावले .जेमतेम ४ थी शिकली आहे आणि आता लग्न करायचे आहे .घरकाम शिकायला इथे बोलावली आहे असे , जे विचारतील त्यांना सांगायचे ठरवले .
गाव बघायचा बहाणा करून तिला मल्हारीच्या नजरेत कशी येईल याची पूर्ण खबरदारी घेत साबळे तिला गावात फिरायला न्यायला सांगत होते .
एक दिवस मल्हारीने तिला बाजारात पाहिले . साबळेचा माणूस कायम वेश पालटून तिच्याही मागावर असायचा . मल्हारीने तिला पाहिले , हे त्याच्या लक्षात आले . अर्धे काम झाले .
आता मल्हारी पुढे काय करतो हे बघायला साबळेनी रामजीला सांगितले . समजावले की कुठेही काही चूक करू नका , सगळं अगदी चोख पार पडलं पाहिजे .
एक बाप हतबल झाला होता पण एक जबाबदार नागरिक असणारा रामजी कसाबसा तयार झाला .
दोन तीन दिवस काहीच घडले नाही .मग एका दुपारी मल्हारीचा मित्र गुपचूप घरी आला . मल्हारी होताच .बराच वेळ झाल्यावर तो निघून गेला .
आता साबळेनी ज्या घरी ती मुलगी होती त्या घरावर कोणाच्याही नकळत पाळत बसवली .
दिवसभर काहीच घडले नाही पण थोडासा अंधार पडल्यावर मात्र मल्हारीचा मित्र घराजवळ घुटमळत असलेला दिसला .
मुलगी काही बाहेर आली नाही तेव्हा तो निघून गेला .दुसऱ्या दिवशी पुन्हा तसेच ...
साबळेनी मग मुलीला तो येतो त्यावेळी जरावेळ बाहेर यायला सांगितले .
दुसऱ्यादिवशी ती मुलगी आधीच बाहेर येवून बसलेली त्याला दिसली .त्याचे चेहऱ्यावरचे भाव बदलले .तो घराजवळ जावून एकदोन वेळा तिच्याकडे बघत तिथून निघून गेला .
एक दोन दिवस असेच घडले , मग एक दिवस त्याने तिला हातानेच मस्त असे खुणावले आणि निघून गेला .
मुलीला त्याच्याशी बोलायला सांगून साबळे आता शेवटच्या क्षणाची वाट बघत बसले .
मुलगी बाहेर येवून बसते आणि आपल्याकडे बघते , काही खुणावले की लाजते हे बघू तो मुलगाही जरा धाडस करून तिला भेटायला ये म्हणाला . हे सगळं कोणाच्याही लक्षात न येता , मावळतीच्या अंधुक प्रकाशात घडत होतं. तो सुध्दा कुणालाही दिसणार नाही अश्या ठिकाणी उभा राहून आपले काम साधत होता .
मुलीने , " कुठे भेटायचं ? " विचारताच त्याने ,
" नदीच्या कडेला मंदिर आहे तिथे भेटू ! " म्हणून सांगितले .दुसऱ्यादिवशी , " अंधार झाल्यावर ये . " म्हणून सांगून तो निघून गेला .
सावज अलगद जाळ्यात सापडत होते पण मल्हारी यात कुठेच नव्हता . रामजीला थोडंसं हायसं वाटलं . आपला मुलगा निर्दोष आहे म्हणून तो सुखावला .
साबळेनी पूर्ण तयारी केली . जरासा अंधार पडल्यावर नदीच्या किनारी जिथे म्हणून अडोसे होते तिथे तिथे कोणालाही दिसणार नाही अश्या वेशात पोलीस तैनात केले .
रामजी साबळेना म्हणाला , " साहेब यात माझा मुलगा नाही . हे सगळं त्याचा मित्र करतोय ! "
साबळे म्हणाले , " रामजी तसे असेल तर मलाही खुप आनंदच होईल . देव करो आणि असेच होवो ! "
रामजी पण सोबत निघाला साबळेच्या .
सगळे आपापल्या जागी दबा धरून बसले . मंदिराचा भाग सगळ्यांच्या नजरेच्या टप्प्यात येईल असे सर्वजण दबा धरून बसले पण मंदिराच्या परिसरातून कोणालाही काहीच दिसत नव्हते .
मुलीला वेळेवर निघायला सांगून , साबळे तिला म्हणाले , " खुप निडर आहेस तू , अजिबात घाबरायचे नाही , तो काय काय म्हणेल ते फक्त ऐकत रहा , आम्ही जवळच आहोत सगळे , काही चुकीचे घडतेय असे वाटले तर आम्ही लगेच समोर येवू , तू पण सावध रहा .त्याच्या लक्षात नाही आले पाहिजे की तू हे सगळं नाटक करते आहेस .तुझे वागणे अगदी नॉर्मल वाटू दे .तू खुप मोठे काम करते आहेस मुली , तूझ्या सारख्या मुलींच्या अनेक आई वडिलांचे आशीर्वाद आज तूझ्या पाठीशी आहेत .आपण नक्कीच यशस्वी होणार ! "
साबळेना आश्वासन देवून ती निघाली . अंधाराचा फायदा घेत ती जरा बिचकत नदीकिनारी जे मंदिर होते तिथे जरा आधीच पोहोचली .तिथे जवळपास कोणीच नव्हते .
मंदिराजवळ छोटासा बल्प लावलेला होता .त्याचा तेवढ्या पुरताच उजेड पडला होता .भकास वाटत होतं तिथलं वातावरण .
तिला जरा धडकीच भरली पण इतर माणसे आहेत याचे भान होताच ती जरा निर्धास्त झाली .
जरावेळ गेल्यावर तो मुलगा आला . तिच्याजवळ बसत त्याने तिची विचारपूस केली , तिनेही मग न घाबरता , त्याला काही संशय येवू न देता सांगितलं की , " लग्न करायचं आहे माझं , इथे आत्याकडे आले आहे , घरी फक्त वडील आहेत . घरकाम शिकायचे आहे म्हणून इथे सोडले वडिलांनी , एक महिना राहून जाणार आहे . "
तिने मग मुलाला विचारले , " तू काय करतो ? कुठे राहतोस ? मला का बोलावले इथे ? "
तो म्हणाला , " मला तू आवडतेस .मी बाजूच्या गावात राहतो .इथे माझे किराणाचे दुकान आहे .वडील आणि मी असतो दुकानात .माझ्या वडिलांना मी सांगितले आहे तू मला आवडते ते .त्यांनी तुला पाहिले आहे . त्यांना पण तू आवडली आहेस .आम्ही उद्या तूझ्या आत्याला सांगायला येणार आहे .हे सांगायला आणि तुझे मत काय आहे हे पहिले जाणून घ्यावे म्हणून तुला आज भेटायला बोलावले . "
" तुला मी आवडतो का ?"
ती लाजून ,"हो !" म्हणाली .
जरावेळ अश्याच गप्पा मारल्या मग ती जावू का म्हणाली तर तो तिला म्हणाला , " अग फक्त जरावेळ थांब , माझा एक मित्र आहे , त्याला मी सांगितले आहे आज आपण भेटणार आहे ते . तू काय म्हणते ते माहीत नव्हतं ना म्हणून मी तुझ्यासाठी काही आणलं नाही . मला परत जायला वेळ लागला तर तुझा होकार आहे हे समजून तो तुझ्यासाठी काहीतरी घेवून येणारं असे आमचे ठरले होते .तो येईलच आत्ता ! "
तेवढ्यात तिला कोणीतरी येताना दिसले .माझा मित्रच आहे असे म्हणत तो त्याला पुढे घेवून आला .त्याच्या हातात ज्यूस ची तीन पाकिटे आणि अजून एक बॉक्स होता .तो तिच्याशी नमस्कार करून , बॉक्स तिच्या हातात देवून बोलायला लागला .
" माझ्या मित्राची निवड खुप मस्त आहे बरं का ! खुप आवडता तुम्ही त्याला . जेव्हापासून तुम्हाला पाहिलंय तेव्हापासून अगदी वेडा झालाय बघा हा ! "
आणि मग दोघेही हसू लागले .तिला ज्यूसचे एक पाकीट फोडून तिच्या हातात देवून ,तिला प्यायला लावले .
ज्यूस पिल्यावर अजून जरावेळ गेला तसे तिला गरगरायला लागले , ती चक्कर येवून पडताच दोघांनी एकमेकांच्या हातावर टाळी देत ,पुढच्या तयारीला लागले .
सावज अलगद जाळ्यात अडकले होते . त्यांना जास्त पुढे जाऊ न देत संधी मिळताच साबळे आणि लपलेले सगळे बाहेर आले , दोघांना पकडले आणि मुलीला पटकन दवाखान्यात हलवले .
दोघांना बेड्या घातल्या . सगळे निघाले तसे साबळे , रामजी कुठे दिसेना म्हणून मागे बघू लागले .अंधारात त्यांना काहीच दिसेना . दोघे जिथे होते तिथे जाऊन त्यांनी पाहिले असता , रामजी तिथेच गुढग्यात मान घालून हमसत होता.
साबळेना कळेना त्याचे कसे सांत्वन करू ?
"सावर रामजी स्वतःला ! जे घडलं त्यात तुझा काय दोष ? तू तुझे संस्कार दिलेस पण त्याचे कर्म जर असेच असतील तर तू काय बदलणार त्याचे नशीब ? "
असे म्हणतात , " बाप अंश देतो आणि मातेच्या गर्भात त्याचा वंश वाढतो .नऊ महिने तो गर्भ त्या मातेचा असतो , पण बाहेर जगात आल्यावर जेव्हा मातेची नाळ तुटते ना तेव्हा तो त्या मातेचाही रहात नाही . जन्माला येणारा प्रत्येक जण ज्याचे त्याचे नशीब घेवून येतो .आई वडील फक्त जन्म देवू शकतात पण मुलांचे नशीब नाही बदलू शकत ! "
" आपले नशीब चांगले असेल तरच चांगली संतती आपल्या पोटी जन्म घेणार ! असेच आपण समजायचे ."
" जे घडतं ते नक्कीच चांगलं नसतं , पण तरीही ते स्वीकारणं एवढच आपल्या हातात असत !! "
