उत्कट प्रेम.
उत्कट प्रेम.
अनुची आई अनु आणि दिपकच्या लग्नासाठी तयार नव्हती , पण अनुच्या हट्टापुढे तिने माघार घेतली . मुलगा मिलिटरी मधे जाणार होता आणि हेच एक कारण होते त्यांच्या नकाराचे.जे त्यांच्या वाट्याला आले ते मुलीला सोसावे लागू नये एवढीच त्यांची इच्छा होती पण म्हणतात ना लग्नाच्या गाठी स्वर्गातच बांधल्या जातात . त्याला कोणीही बदलू शकत नाही .
दीपक आणि अनुचे वडील दोघेही मिलिटरी मध्ये होते . दोघांची फॅमिली सुध्दा अगदी सख्खे शेजारी आणि त्यांच्या खुप चांगली मैत्री सुध्दा होती .
दीपक आणि अनुजा अगदी लहानपणापासून एकत्र वाढले . दोघांचे शिक्षण एकत्र झाले . दिपकला वडीलांप्रमाणे इंडियन फोर्स जॉईन करायची होती .
दोघांनी जेव्हा तारुण्यात प्रवेश केला तेव्हाच त्यांच्या मनातला प्रेमांकुर सुध्दा वाढीस लागला . कॉलेज संपताच त्यांनी आपले नाते घरात सांगितले आणि लग्नाबद्दल परवानगीही मागितली .
अनुने मेडिकलला जायचे ठरवले होते आणि दीपक इंडियन फोर्स मध्ये . दोघांचे शिक्षण पूर्ण झाल्यावर लग्न करायचे ठरले होते त्याप्रमाणे आता सहा वर्षांनी लग्नाचा विषय निघाला होता . मधल्या या सहा वर्षात अनुचे वडील एका लढाईत शहीद झाले होते तर दिपकच्या वडिलांना एक पाय गमवावा लागून ते आता रिटायर्ड झाले होते .
अनूच्या आईला दीपक आवडत होता पण त्याचा सैनिकी पेशा मनात कुठेतरी मुलीच्या सुखाच्या आड येत होता .
अनु आणि दीपक मात्र स्वतःच्या निर्णयावर आणि एकमेकांच्या प्रेमाबद्दल ठाम होते .
अनु आईला म्हणायची , " आमचे एकमेकांवर अगदी जीवापाड प्रेम आहे . आम्हाला लहानपणापासून एकमेकांची इतकी सवय लागली आहे की आता आम्ही आमच्या जोडीदारासाठी दुसऱ्या कोणाचा विचार करूच शकत नाही ."
" दीपक जेव्हा सीमेवर जाईल तेव्हा तू कशी राहशील बाळा त्याच्याशिवाय ? तिथे कधी काय होईल काही सांगू शकत नाही , उद्या देव न करो पण काही झालंच तर कसं आयुष्य काढशील ? " आई अनुला काळजीने बोलत होती .
अनु मात्र स्वतःच्या नशिबावर विश्वास ठेवून म्हणाली , " आम्ही दोन असलो तरी आमचे जीव एक झाले आहेत, आम्ही एकमेकांशिवाय लांब राहून जगू शकतो पण ज्या क्षणी एकाचे हृदय धडकायचे थांबेल त्याक्षणी दुसऱ्याचा श्वास बंद पडेल ."
आई अनुच्या पोरकट प्रेमाला समजावून सांगायचा प्रयत्न करून थकली . दिपकच्या घरी त्यांच्या लग्नाला काही विरोध नव्हता. त्यांनी अनुला कधीच स्वीकारले होते .
आईला मात्र आता अनुच्या नशिबावर विश्वास ठेवत या लग्नाला होकार देण्याशिवाय काही पर्याय राहिला नाही .
यथावकाश लग्न झाले आणि तीन महिन्यांनी दीपक सीमेवर पोस्टिंग होवू तिकडे रवाना झाला .
अनुही तिची प्रॅक्टिस पूर्ण करून घेत एका नामांकित हॉस्पिटल मध्ये जाऊ लागली .
दीपक अनुचा संसार पाच सहा वर्ष आनंदाने चालू होता . अनु पण त्याच्या पोस्टिंगच्या ठिकाणी एक दोन वेळा जाऊन राहून आली होती, दीपक बऱ्याच वेळा यायचा .
दोन्ही घरी आता त्यांच्या बाळाच्या आगमनाची प्रतीक्षा करत होते . दोघांनीही घरच्यांचे म्हणणे मनावर घेत त्यासाठी दोघेही तयार झाले होते .
अश्यातच सीमेवर लढाई सुरू झाल्याची वार्ता आली . दोन्ही घरी थोडेसे दडपण आले पण काहीही झाले तरी अभिमान वाटेल अशी मनस्थिती त्या घरच्या लोकांची असते .
देशासाठी लढणाऱ्या वीर जवानांनी भूमातेच्या रक्षणाची शपथ आपले प्राण तळहातावर घेवून घेतलेली असते आणि त्यासाठी ते स्वतःला खुप भाग्यवान समजतात .
अनु काही कामानिमित्ताने माहेरी आली होती . दुपारी जेवण करून ती जरावेळ तिच्या बेडमध्ये जाऊन झोपली होती . आईचे पुस्तक वाचन चालू होते . अनुला झोपेतच उचकी लागली , तिने उठून पाहिले तर जवळ पाणी नव्हते म्हणून आईला आवाज देत पाणी आण म्हणाली .
आई तिला पाणी द्यायला उठली तेवढ्यात फोनची रिंग वाजली म्हणून तीने पहिला फोन उचलला , अनुच्या सासऱ्यांचा फोन होता , त्यांनी फोनवर जे सांगितले ते ऐकून अनुची आई मटकन खाली बसली . त्याही मनःस्थितीत त्यांच्या मनात असंख्य विचारांचे काहूर उठले . तसेच कसेबसे स्वतःला सावरत अनुला कसे सांगू आता ? याचा विचार करत त्या तिच्या रुमकडे निघाल्या, त्यांना आठवलं ती पाणी मागत होती म्हणून मग पाण्याची बाटली घेवून त्यांनी बेडचा दरवाजा उघडला . समोरचे दृश्य बघून त्या नखशिखांत हादरल्या. त्यांना कळेना हे काय झाले ? अनु अनु म्हणत घाबरून त्या अनुजवळ गेल्या . अनु रक्ताच्या थारोळ्यात पडली होती . त्यांच्या लक्षात येईना हे कसे घडले ? त्या जोरजोरात रडू लागल्या .त्याच्या आवाजाने शेजारच्या घरातले धावत तिथे आले . त्यांनी पहिले अँब्युलन्स बोलावली आणि अनुच्या सासरी फोन केला .
उचकी लागली म्हणून अनु बेड वरून पाण्यासाठी उठली असावी पण पायात अडकलेल्या चादरीवरू असे वाटत होते की ती झोपेतच चादरीत पाय अडकून जवळ असणाऱ्या काचेच्या टेबलवर पडली , त्यावरची काच फुटून काचेचे काही तुकडे तिच्या कपाळात शिरले होते , ती काचेखालच्या दगडी स्टँड वर जोरात आपटली आणि तिच्या डोक्याला जबर मार लागला होता . फोनच्या नादात आईचे आत काय झाले याकडे लक्ष नाही गेले . बराच वेळ गेला होता त्यात . अनूच्या डोक्याला एका साईडने कानाजवळ बऱ्याच काचा शिरून खुप रक्तप्रवाह झाला होता .
अँब्युलन्स आली आणि अनुला हॉस्पिटलमध्ये नेले पण अती रक्तस्त्राव झाल्यामुळे आणि कानाजवळ असणारी नस तुटून तिच्यावर काही उपचार होण्या आधीच तिचा श्वास थांबला .
आई मात्र निश्चल होवून तिचे शब्द आठवत होत्या .
एकमेकांवर जीवापाड प्रेम करणारे दोघांच्याही नकळत आपापले साताजन्माच्या बंधनाचे वचन पूर्ण करायला नव्या प्रवासाला निघून गेले .
