उपरती
उपरती
उपरती
आयुष्याच्या वाटेवर चालताना आपल्या हातून कळत नकळत खूप चुका होतात. जर या चुका वेळीच टाळता आल्यातर, किती चांगलं होईल ना !!! जर वेळीच सावरलो नाही तर भविष्यात या चुकांमुळे खूप त्रास भोगावा लागू शकतो. वेळ निघून गेल्यानंतर उपरती होऊन काही फायदा नाही, नंतर उरतो तो फक्त पश्चाताप
१. उपरती... केलेल्या चुकीची !!!
विसर्जनापूर्वीची आरती, गजाननाचं रूप न्याहाळता न्याहाळता सुरेशराव आणि गोमतीच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या.
जणू साक्षात गजानन त्यांच्यासमोर उभं राहून त्यांना म्हणत होता,"निरोप कसला माझा घेता. संपूर्ण आयुष्य पैसा, प्रतिष्ठा, प्रसिद्धीच्या मोहापायी व्यर्थ घालवलं. मुलांना चार नैतिकतेच्या गोष्टी शिकवण्याऐवजी त्यांच्या सर्व योग्य, अयोग्य मागण्या पूर्ण करण्यात धन्यता मानली.
समाजात पत, प्रतिष्ठा वाढवी म्हणुन हा वृद्धाश्रम उभा केलात. त्याऐवजी बालसंस्कार केंद्र उभं करून मुलांना चांगले संस्कार दिले असते तर स्वतःच उभा केलेल्या वृद्धाश्रमात आज दिवस कंठायची वेळ आली नसती.
स्वतःच उभा केलेल्या वृद्धाश्रमात बसवलेल्या गणपती बाप्पाच्या आरती दरम्यान आज पहिल्यांदा त्या दोघांना जीवनात केलेल्या चुकीची उपरती झाली होती.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
२. विसर्जन की विडंबना... जाणा फरक तुम्हीच !!!
उद्या बाप्पाच विस
र्जन म्हणुन सगळी तयारी करून सोहम झोपी गेला.
" काय रे, उद्या माझं विसर्जन करणार? विसर्जनानंतर हे मातीच पार्थिव मातीतच मिसळायला हवं ना पण अस होतंय का? पूर्वी मातीच्या मुर्त्या बनवल्या जायच्या आणि त्या स्वच्छ नदीत, तळ्यात, विहरीत विसर्जित करताच विरघळून जायच्या रे.
" आजकाल तुम्ही काय ते पीओपीच्या मुर्त्या बनवता, त्या वर्षानुवर्षे तशाच पाण्यात पडून असतात आणि त्यामुळे पर्यावरणाचा किती ऱ्हास होतो हे कळत नाही का तुला? त्या समुद्रकिनारी जाऊन बघा एकदा !!! तुमच्या आराध्याची होणारी विडंबना.
" नद्या, तळी, विहरी तर उरलेच नाहीत. उरलीत फक्त नाले, गटारी. जीव गुदमरतो रे माझा त्या घाण पाण्यात. अरे, माझं आवाहन करून माझी विडंबना करण्याऐवजी मला तुमच्या मनातच स्थानापन्न करा ना !!! कायमचं." बाप्पाच्या डोळ्यात पाणी पाहून सोहम झोपेतून खाडकन जागा झाला.
वरील दोन कथांवरून आपल्याला हेच लक्षात येत की माणसाने आपल्या मर्यादा ओळखून वेळीच थांबायला हवं नाहीतर भविष्यात याचे वाईट परिणाम भोगावे लागू शकतात.
© copyright
© all rights reserved.
या कथेच्या प्रकाशनाचे आणि वितरणाचे सारे हक्क लेखिकेकडे राखीव. कथेत अथवा कथेच्या नावात किंवा कथा लेखिकेच्या नावाशिवाय आढळून आल्यास तो कॉपी राईट कायद्याचा भंग मानला जाईल. कथा जशीच्या तशी शेअर करण्यास काहीही हरकत नाही.