त्याची वटपौर्णिमा
त्याची वटपौर्णिमा


"अहो काकू!!! तुम्हाला काही मदत हवी आहे का?
तुम्ही आज वडाची पूजा कशी करणार? काही मदत लागली तर सांगा." सीता आशाताईंच्या घरी जाऊन त्यांची विचारपूस करत होती.
सीता इथे रहायला आल्यापासून मागील चार वर्ष आशाताईंच्या सोबतच वटपौर्णिमेची पुजा करायला जात असे.
पण मागील चार दिवसापूर्वी आशाताई पाय घसरून पडल्या आणि त्यांचा उजवा पाय चांगलाच जायबंद झाला.
गुढग्याखालील हाडांवर हेअर लाईन क्रॅक आल्यामुळे प्लास्टर चढवावं लागलं. एक मुलगा तो कामा निमित्ताने बाहेर होता. घरी आशाताई आणि त्यांचा नवरा अशोकराव दोघेच. अश्यातच वटपौर्णिमेचा सण आला. शेजारील सीता दरवर्षी आशाताईंसोबत वडाची पुजा करायला जात असे. म्हणुन या वर्षी देखील ती त्यांची चौकशी करून काय हवं काय नको ते विचारण्यासाठी आली होती.
"अगं झाली माझी पुजा, तुझे काका पहाटेच वडाची पूजा करून आले."
"म्हणजे? नाही समजले मी, काकांनी पुजा केली?" सीताने आश्चर्याने विचारले.
"हो, काल पासुनच साहेबांची धावाधाव चालु होती, पुजेच्या सामानाची जमवाजमव करण्यासाठी. काल रात्रीच सगळी तयारी करून ठेवली होती आणि पहाटे लौकर जाऊन पूजा करून आले." आशाताईंनी खुलासा केला.
"अय्यो!!! किती छान, मला वाटत होत फक्त बायकाच वड पुजतात पण काकातर दोन पावलं पुढे निघाले. काकांनी तर नवीन आदर्शच घालुन दिला नव्या पिढी पुढे." सीता उत्साहाने आणि आश्चर्याने काकाचं कौतुक करत होती.
"अगं!!! अस काही नाही सीता, दर वर्षी ही किती भक्तीभावाने हे व्रत करत असते, लग्न झाल्यापासून अजिबात खंड पडू दिला नाही हिने मग या वर्षी पायामुळे तिच्या इतक्या वर्षाच्या परंपरेमध्ये खंड पडू नये म्हणुन केली पूजा." बाजुलाच बसलेल्या अशोक रावांनी सफाई दिली.
"नाही हं सीता ओठात एक आणि पोटात एक आहे ह्यांच्या!!!" आशाताई मिश्किलीने म्हणाल्या.
"अगं सीता मला सांग वटपौर्णिमेचे हे व्रत स्त्रिया आपल्या पतीच्या निरोगी आयुष्यासाठी आणि पुढच्या सात जन्मासाठी हाच पती मिळावा म्हणून करतात ना!!! हे व्रत नवरा-बायकोमधील प्रेम वृद्धिंगत होण्यासाठी आहे. एकमेकांबद्दलच प्रेम व्यक्त करण्यासाठी आहे. स्त्रीच्या साथीशिवाय, तिच्या मदतीशिवाय, त्यागाशिवाय पुरुष प्रगतीचा गड सर करू शकतच नाही. ती समर्थपणे संसार सांभाळते म्हणूनच पुरुष कतृर्त्व सिद्ध करु शकतो ना!!! तिच्या या संसारातील योगदानाची, तिने केलेल्या त्यागाची जाण ही असायलाच हवी ना गं!!! मग हे व्रत फक्त स्त्रियांनीच का करावे? तिच्या बद्दलच प्रेम नवऱ्याने ही व्यक्त करावं ना.
वटपौर्णिमेला स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करतात. पर्यावरणाच्या दृष्टीने वडाच्या झाडाचे महत्त्व विशेष आहे. ते सगळ्या झाडांमध्ये सर्वात जास्त प्राणवायू उत्सर्जित करणारे झाड आहे. आरोग्याच्या दृष्टीने हे उपयुक्त असे झाड असल्याने त्याच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करणे हा ही ह्या पूजेचा एक हेतू आहे." अशोकराव आशाताईकडे प्रेमाने पहात बोलत होते.
"अगं इतकंच नाही सीता तुला माहीत नाही माझ्या सोबत माझ्या पहिल्या वटसावित्रीच्या व्रतापासुन हे देखील दरवर्षी उपवास करतात बरे!!!" आशाताई हसत हसत सीताला सांगत होत्या.
"असं काही नाही हं, सीता खोट बोलतेय ही, अगं माझी तब्येत खराब झाली एक दोन वेळा म्हणुन नाही जेवलो मी."
"दरवर्षी बरी तुमची तब्येत खराब होते हो!!!" आशाताई अशोकरावांना चिडवत होत्या.
त्या दोघांचं हे प्रेमळ भांडण पाहून सीताच्या डोळ्यात अश्रू तरळले. तिला या दोघांकडून आज एक नवीन धडा शिकायला मिळाला होता. पती पत्नीने एकमेकांच्या भावनांचा आदर कसा करावा हे ती आज परत नव्याने पाहत होती. नवरा बायको दोघांनी ही आपल्या नात्याचा बहर हा आपण च निश्चित करायचा असतो. नातं सुंदरपणे चिरकाल टिकवून ठेवण्यासाठी दोघांनीही एकमेकांना सारखीच दाद द्यावी लागते. एक करतोय तर दुसऱ्याने मागे राहून कसं चालेल? माझ्यासाठी जसा तू तसंच तुझ्यासाठी सदैव मी सगळ्यात आधी असेल हा विश्वासच दोघांच्या नात्याची रेशीमगाठ कधी सुटू देत नाही तर उलट आणखी घट्ट करते.