त्या अल्बमच्या पानांवर
त्या अल्बमच्या पानांवर
स्वयंपाक घराचा ओटा आवरून, साफ करून सगळी झाकपाक करून वसुधा झोपायचे म्हणून पलंगावर लवंडली. तिचा नवरा, वसंत गाढ झोपला होता. ती डोळे मिटून निश्चिंत पडली. घड्याळाचा काटा पुढे सरकत होता पण तिला झोप लागेना. थोडे दूध पिऊया म्हणजे झोप लागेल या विचारांनी ती उठली. कपात गरम दूध त्यात साखर आणि जायफळ टाकून ते निवांत पिण्यासाठी ती हॉलमध्ये येऊन बसली.
टीपॉयवर पडलेल्या अल्बम कडे तिचे लक्ष गेले. तो अल्बम ती चाळू लागली. लक्ष्मीच्या बालपणीचे फोटो पाहून तिचा धीर सुटला. पुन्हा लक्ष्मीच्या आठवणींची जखम भळाभळा वाहू लागली.तिचे पहिले बाळंतपण आठवले तिला ---!!!
सुंदर,गोरीपान,हसरी,गालाला सुंदर खळी,असे लोभस रुप पाहून ती तर हरखूनच गेली. तिला पाहून सारेच जण हरखले होते. पहिली बेटी धनाची पेटी म्हणून तिचे नाव लक्ष्मी ठेवले होते तिच्या आजीने---!
तिच्या जन्मानंतर वसंतला खूप मोठे प्रमोशन मिळून त्याला आसाम बॉर्डरला जावे लागले. प्रमोशन मिळाल्याने वसंतही खुश होता. पण त्याला आता एकट्याला जावे लागणार होते, बायकोला आणि लेकीला न घेता. लक्ष्मी लहान होती ना---!
चंद्राच्या कले प्रमाणे लक्ष्मी मोठी होत होती. ती जेव्हा सहा सात महिन्यांची झाली तेव्हा वसुधा आसाम मध्ये तिच्या नवऱ्याचे पोस्टिंग होते तिथे गेली.
तिचा नवरा वसंत एअर फोर्स मध्ये नोकरी करत होता आणि आसाम सारख्या जंगली भागात त्याची पोस्टींग होती,
तेथे गेल्यावर तिथले हवामान, निसर्ग सौंदर्य,
तिथल्या लोकांचे माणुसकीचे वागणे सारेकाही वसुधाला आवडले होते. चांगलीच रमली त्या वातावरणात ती.
वसंत ऑफिसला गेल्यावर वसुधा शिवणकाम, भरतकाम, विणकाम करत लक्ष्मीला सांभाळत तिचा वेळ जात असे.संध्याकाळी वसंत आल्यावर लक्ष्मी सोबत खेळण्यात वसंत पण भान विसरून जात असे.
वसंतला फोटोग्राफीचा छंद होता. निसर्गाने परिपूर्ण असलेल्या त्या भागाचे त्यांनी कितीतरी सुंदर फोटो काढून स्पर्धेत पाठवले. अनेक बक्षिसेही मिळाली होती त्याला..
एकदा तर लक्ष्मीचे वेगवेगळ्या हावभावातले फोटो काढून त्याने स्पर्धेसाठी अल्बम पाठवला होता. बाल सुलभ भावनांचे अत्यंत सुंदर क्षण टिपलेला तो अल्बम जागतिक स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पटकावून वसंतला फोटोग्राफीचा फार मोठा सन्मान प्राप्त झाला होता. जगभरातून त्याच्या फोटोग्राफीचे आणि लक्ष्मीच्या बाललीलांचे कौतुक होत होते.
वसुधाला तर लेकीच्या आणि नवऱ्याच्या कौशल्याच्या कौतुकाने स्वर्ग दोन बोट उरला होता. त्यांचे किती कौतुक करू आणि नको असे तिला झाले. "आज भरून पावले मी" या विचारांनी ती सुखावली होती. सुख म्हणजे नक्की हेच असते असे तिला जाणवत राहिले.
वसुधाच्या जिवनांअंगणात लक्ष्मीच्या बाललीलां सौख्याचे चांदणे शिंपडत होत्या जणू---!
लक्ष्मी जेहा वर्षाची झाली तेव्हा मोठ्या समारंभ पूर्वक त्यांनी तिचा वाढदिवस साजरा केला. नातेवाईक, मित्रपरिवार यांच्यासोबत समारंभ आनंदाने पार पडला. तिचे असंख्य फोटोज्, व्हिडिओज् त्यांनी काढले.
शिखरावर पोहोचला होता त्यांच्या जीवनातला आनंद----!!!
आणि ती दुर्दैवी संध्याकाळ----, त्यांच्या आयुष्यात फार मोठा दुःखाचा डोंगर उभा करून गेली. "काय झाले होते बरे--???"
सकाळी टिफिन घेऊन वसंत ऑफिसला गेला. घरातली सारी कामे आटोपून वसुधाने आराम केला. संध्याकाळी नेहमीप्रमाणे ती लक्ष्मीला घेऊन अंगणात बसली होती. साऱ्या शेजारणी एकत्र येऊन रोज गप्पा मारीत असत . पण त्यादिवशी अजून कोणीही आले नव्हते. अचानक काहीतरी आठवले म्हणून वसुधा घरात गेली आणि आपले ते काम आटोपून बाहेर आली.
"अरे, लक्ष्मी कुठे गेली? इकडे तिकडे रांगत तर गेली नाही ना?"या विचाराने वसुधाने शेजारी पाजारी लक्ष्मीची विचारपूस केली पण लक्ष्मी कोणाकडेच नव्हती. घराच्या मागे, पुढे , आजूबाजूला सगळीकडे त्यांनी पाहिले पण लक्ष्मी त्यांना दिसलीच नाही. ती अंगणात बसली तेव्हा आजूबाजूचे कोणीही बाहेर बसले नसल्याने त्यांनाही कल्पना येईना. वसुधाच्या हृदयाचा ठोकाच चुकला-----,
तेवढ्यात दूरवर जंगलातून भयंकर आवाज आला. तेव्हाच वसंतही ऑफिस मधून घरी आला. शेजाऱ्या पाजाऱ्यांसह धावपळ करून जंगलाच्या जवळपासच्या भागात पहाणी केली. एक अस्वल वेगाने पळताना त्याला दिसले. आणि काय आश्चर्य---!!!
त्याच्या तोंडात चक्क एक लहान मूल दिसले लक्ष्मीने घातलेल्या लाल फ्रॉकच्या रंगावरून त्यांनी ओळखले की ती लक्ष्मीच आहे. खूप प्रयत्न केले पण ते अस्वल वेगाने लक्ष्मीला घेऊन निघून गेले.
तत्क्षणी वसंत ने सेशन कमांडरला फोन करून घडलेला प्रसंग सांगितला. स्पेशल पुलीस स्कॉड नेमून योग्य कार्यवाही करण्याचा आदेश दिला गेला.
पुलीस स्काॅड लगेचच कामाला लागले. अवघ्या दहा मिनिटात त्यांनी अस्वलाला पकडून लक्ष्मीची सुटका केली. रक्तबंबाळ लक्ष्मीला त्यांनी ताबडतोब हॉस्पिटल मध्ये ऍडमिट केले, पण यश मिळेल अशी शक्यता फारच कमी होती. डॉक्टरांच्या प्रयत्नांनी आणि परमेश्वराच्या कृपेने लक्ष्मी शुद्धीवर आली. लक्ष्मी घाबरल्यामुळे तिला फार मोठा धक्का बसला होता. त्यातून तिला पूर्णपणे बरे व्हायला फार वेळ लागला.
शत्रूला थरथरा कापायला लावणाऱ्या एका जवानाची मुलगी अस्वल घेऊन गेला आणि तो काही करू शकला नसता तर केवढा दैव दुर्विलास घडला असता !
वसंत आणि वसुधावर कोसळलेले दुःखाचे आकाश देवाने आणि दैवाने तोलून धरले होते.
"आपल्या सुखाला कोणाची नजर तर लागली नाही ना?"या विचारांनी वसुधा अर्धमेली झाली होती तेव्हा.
आणि आज तोच अल्बम तिच्यासमोर दुःखसुख मिश्रित कडू-गोड आठवणींच्या
रुपाने तिला जणू जागवत होता. आणि मग काय ते जायफळाचे दूध तसेच ठेवून भरल्या डोळ्यांनी धावत जाऊन तिने आपल्या लक्ष्मी आणि चिमुकल्या वैभवला छातीशी कवटाळले. त्यांच्या असंख्य पाप्या घेतल्या. लक्ष्मी तर आईकडे बघतच राहिली.
"काय झाले आहे आज आईला?"तिला समजेना.
वैभव मात्र खदखदून हसत होता आनंदाने.
वसंतने तर त्या प्रसंगाचा इतका धक्का घेतला होता की त्याने त्याचा आवडता कॅमेरा लॉकर मध्ये बंद करून ठेवला. आणिआपला फोटोग्राफीचा छंद पूर्णपणे हृदयातून काढून टाकला होता,पण वसुधाने त्याला सावरले, मनवले. आणि त्याला वैभवचेही अनेक फोटो लक्ष्मीसोबत काढायला उस्फूर्त केले.आणि स्पर्धेत पुनश्च अल्बम पाठवायला प्रवृत्त केले. मग काय !
परिणामी त्याची अनुभवी कौशल्यपूर्णता प्रथम क्रमांक पटकावती झाली. त्याच्या छंदाचा जणू पुनर्जन्मच झाला वसंतच्या आणि वसुधा मनोमनी सुखावली !!!! सुखी सहजीवनाचे रहस्य त्यांच्या संसारात दिसून येत होते ,हेच खरे--!
जुन्या आठवणींच्या गोतावळ्यात हरवलेली वसुधा भानावर आली.
आज वसुधाला तर त्या अल्बमच्या पानांवर वसंतला मिळालेले दोन गोल्ड मेडल्स दिसत होत "
तिला ह्या पूर्वी लाडक्या लक्ष्मीच्या जिवावरच्या प्रसंगाने तो अल्बम रक्ताळलेला वाटायचा का???
काळ मनुष्याच्या मनावर पडलेले दुःखाचे डाग पुसून टाकत असतो हेच खरे-!!!!!!!
