नासा येवतीकर

Tragedy

1  

नासा येवतीकर

Tragedy

टोकाचे पाऊल

टोकाचे पाऊल

5 mins
894


माधव ने राहत्या घरात पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली असल्याची बातमी हा हा म्हणता म्हणता संपूर्ण गावात पसरली. थोड्या वेळानंतर पोलीस आले आणि त्यांनी पंचनामा केला. त्याच्या खिशात एक चिठ्ठी सापडली त्यात लिहिलं होतं की, माझ्या मृत्यूस संस्थेचे अध्यक्ष आणि शाळेचे मुख्याध्यापक जबाबदार आहेत. त्यांनी मला मानसिक, शारीरिक आणि आर्थिक त्रास दिल्यामुळे मला हे टोकाचे पाऊल उचलावे लागत आहे. त्यामुळे या दोघांना अजिबात माफ करण्यात येऊ नये. संस्थेचे अध्यक्ष आणि शाळेचे मुख्याध्यापक यांना ही गोष्ट कळाली तसे ते दोघे फरार झाले. पोलीस त्यांच्या घरी जाऊन आले मात्र ते काही सापडले नाहीत. बायका-लेकरासह ते कुठे तरी दूर निघून गेले. माधवच्या आत्महत्येविषयी गावातील प्रत्येकजण हळहळ व्यक्त करत होता. प्रत्येकांच्या तोंडून त्यांच्याविषयी चांगलेच शब्द बाहेर पडत होते. अन्यायाविरुद्ध लढा द्यायला पाहिजे होता असे प्रत्येकजण म्हणत होते. पण प्रत्यक्षात त्याच्यावर जे प्रसंग ओढवले ते खरंच खूप कठीण होते का ? ज्यामुळे माधवला असे टोकाचे पाऊल उचलावे लागले. माधव हा चांगला शिकलेला, सुशिक्षित, साधा, भोळा आणि नाकासमोर चालणारा मनमिळाऊ स्वभावाचा होता. घरात अठरा विश्व दारिद्र्य असून देखील त्याने पदवी आणि बी एडचे शिक्षण पूर्ण केले. तो मुळात हुशार होता त्यामुळे त्याला कधीही नापासी ला तोंड द्यावे लागले नाही. त्याच गावात दहावी पर्यंतची एक संस्था होती. ज्यात त्याचे शिक्षण पूर्ण झाले. बी एडचा निकाल लागला आणि माधव प्रथम श्रेणीमध्ये पास झाला होता. बी एड झाल्यावर शिक्षकांची नोकरी नक्की मिळते या आशेवर त्याने वेगवेगळ्या शाळेत जाऊन आला. पण प्रत्येक ठिकाणी त्याच्या हुशारी पेक्षा पैश्याला जास्त मागणी होऊ लागली. माधव जवळ पैसा नव्हता त्यामुळे त्याला कोठेच नोकरी मिळत नव्हती. दिवसेंदिवस त्याचे दिवस खूपच कठीण होऊ लागले. मिळेल ते काम करत तो कसेबसे दिवस काढत होता. गावातील संस्थेचे अध्यक्ष एके दिवशी रस्त्याने जातांना माधवला रस्त्यावर काम करताना पाहिले. त्याला माधवची कीव आली. त्याने घरी भेटायला येण्याचे कळविले. तसा तो सायंकाळी घरी गेला. अध्यक्षांनी त्याची चांगली विचारपूस केली, चौकशी केली आणि त्यांच्या शाळेवर शिकवायला येण्यास सांगितले. महिन्याकाठी चार ते पाच हजार रुपयांच्या नोकरीवर माधव शाळेत शिकवायला जाऊ लागला. अध्यक्ष साहेब खरोखरच देवमाणूस होता. असेच वर्ष दोन वर्षे सरले. माधव शाळेत छान शिकवू लागला होता. त्यामुळे त्याची प्रसिद्धी ही वाढली होती मात्र त्याच्या वेतनात काही वाढ झाली नव्हती. एके दिवशी त्याने अध्यक्ष साहेबांना वेतन वाढवून द्यावे आणि शाळेत कायमची नोकरी द्यावी म्हणून विनंती केली. साहेबांनी मान्य देखील केली. येत्या जून महिन्यापासून माधवला शाळेत कायम करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. माधवला त्यादिवशी खूप आनंद झाला. काही दिवसानंतर आपण ज्या शाळेत शिकलो त्याच शाळेत कायम होणार याचा त्याला खूप अप्रुप वाटत होतं. पण माधवचं नशीब खोटं होतं म्हणूनच की काय फेब्रुवारी महिन्यात अध्यक्ष साहेबांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. माधवच्या जीवनात अध्यक्षांचे जाणे टर्निंग पॉईंट ठरले. अध्यक्षाच्या जाण्याने त्याच्या जागी संस्थेचे अध्यक्ष म्हणून त्यांच्या मुलाची नेमणूक करण्यात आली. तो तिशीच्या आतील तरुण आणि लाडात वाढलेला होता. त्याला कोणाच्या सुखदुःखाची काही काळजी नव्हती. तो आपल्याच मस्तीत जगत असे. मुलगा अध्यक्ष झाल्यापासुन शाळेचे जे चांगले वैभव होते ते बदलायला सुरुवात झाली. शाळेचे मुख्याध्यापक आणि अध्यक्ष आता एकाच ताटात जेवणारे बनले. मुख्याध्यापकानी त्याला खाण्याची, पिण्याची आणि इतर वाईट गोष्टीची सवय लावली. त्याला देखील तेच गोड वाटत होते. पूर्वीच्या अध्यक्षांनी जून पासून माधवला कायम करण्याचे आश्वासन दिले होते आणि त्यांनी त्याचे काम केले होते. माधव ला शाळेत कायम नोकरीवर घेण्याचे पत्र संस्थेला मिळाले. मुख्याध्यापकाने सर्वप्रथम ते पत्र अध्यक्षाला दाखविले. माधवला आपल्या संस्थेत फुकटात लागला आहे. आता तो चार पाच हजार रुपयेवर नोकरी करत आहे मात्र या पत्राने तो पंचवीस ते तीस हजार पगार उचलतो. तेंव्हा त्याच्याकडून काही तरी देणगी घ्यावी. अध्यक्षांच्या कानात त्याने ही फुंकणी मारली. माधवला पत्र आल्याची बातमी कळाली तसा तो खूप आनंदी झाला. त्याने मुख्याध्यापकाकडे पत्राची मागणी केली तर त्याने अध्यक्षाकडे जा असे सांगितले. माधव मग अध्यक्षांच्या घरी गेले आणि पत्राची मागणी केली. त्यावेळी अध्यक्ष महोदय घरात बसून दारूचे पेग घशाखाली घालत होते. एवढ्या सकाळी दारू पित असल्याचे पाहून माधवला देखील कसे तरी वाटत होते. दारूच्या नशेत तो म्हणाला, एक लाख रुपये घेऊन ये, तरच तुला हे पत्र मिळेल, अन्यथा नाही. माधव ने खूप विनंती केली. पण तो ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हता. शेवटी नाराज होऊन तो आपल्या घरी परत आला. दुसऱ्या दिवशी सकाळी शाळा भरल्या नंतर मुख्याध्यापकाने कालच्या विषयी माधवला विचारणा केली. माधवने घडलेली घटना सांगितली. त्यावर मुख्याध्यापकाने मधला मार्ग सांगितला तो म्हणाला, एकदाच पैसे देता येत नसेल तर महिन्याला दहा हजार रुपये भरून एक लाख पूर्ण कर. माधवला हे पटले. मग त्याने मुख्याध्यापका ला सोबत घेऊन अध्यक्षांच्या घरी गेले. मुख्यध्यापकाने सांगितल्याप्रमाणेच तो बोलला आणि त्याची नोकरी तिथे टिकली. काही ही त्रास न घेता फुकटचे एक लाख रुपये मिळाले म्हणून त्यादिवशी दोघांनी जंगी पार्टी केली. नोकरी कायम झाल्यावर दिवाळी च्या सत्रात माधवचे लग्न झाले. सुशील आणि सुंदर मुलीसोबत माधवचे लग्न झाले. नजर लागावी अशी गोरीपान आणि सोज्वळ बायकोमुळे त्यांचा संसार सुखात चालू होता. दरमहा दहा हजार रुपये देत देत एक लाख रुपयांची देणगी माधवने दिली. एवढ्या गोष्टीवर खुश होणारे ते कसले मानव ! काही दिवसानी अध्यक्षांचा वाढदिवस आहे आणि ते साजरा करण्यासाठी त्यांनी माधवला पंचवीस हजारांची मागणी केली. माधवला नकार देणे अशक्य होते. दरवर्षी वाढदिवसाला ही रक्कम काढून ठेवावीच लागायची. एके वर्षी शाळेत वर्गखोली बांधायचे आहे म्हणून सर्वांकडून एक लाख रुपये देण्याची मागणी झाली. माधवला हे सर्व जड जात होतं. घरात कमावता एकटाच असल्यामुळे पगारातील एक ही पैसा मागे पडत नव्हता. हे एक लाख रुपये कसे द्यायचे याची त्याला काळजी लागून होती. पैसे देऊ शकत नाही म्हटलं तर काय होते की, मनात नाना प्रकारच्या शंका. मागे असेच एका शिक्षकाने पैसे देण्यास नकार दिल्यामुळे त्याला संस्थेतून काढून टाकण्यात आले होते. तशी पाळी येऊ नये म्हणून अध्यक्ष मागेल तेवढे पैसे माधव गुपचूप देत होता. अधुनमधून मुख्याध्यापक देखील माधवला त्रास देऊ लागला. तुला चांगले शिकविता येत नाही, पालकांची तुमच्याबाबत तक्रार आहे, मुलांवर तुमचे नियंत्रण नाही असे अनेक आरोप माधववर लावण्यात येऊ लागले. या सर्व प्रकारामुळे माधव प्रचंड मानसिक तणावाखाली जीवन जगत होता. माधवचा काही एक दोष नसतांना त्याला हकनाक त्रास दिल्या जात आहे हे इतर सहकार्यांना कळत होते मात्र ते काही करू शकत नव्हते. अध्यक्षांच्या मुलाचे लग्न जमले होते. काही दिवसांनी घरात लग्न सोहळा पार पडणार होता. त्यांच्या घरात सर्वत्र सनई चौघडा वाजत होता. सर्वत्र आनंदाचे वातावरण होते. जो तो आपल्या कामात व्यस्त होते. माधवला देखील या लग्नकार्यात काम करणे क्रमप्राप्त होते. जाणूनबुझुन माधवला या लग्नकार्यात अगदी छोटे काम देण्यात आले होते. शाळेत शिकविणारा तो एक हुशार शिक्षक मात्र येथे त्याची फारच गोची झाली. त्याला आलेल्या पाहुण्यांना पाणी देण्याचे काम देण्यात आले. तो नकार देऊ शकला नसता, त्याला त्याच्या नोकरीची काळजी लागली होती. या कामामुळे माधव खूपच नाराज झाला. लग्नकार्य संपले होते. माधवच्या घरातील सर्व मंडळी त्याच लग्नासाठी गेले होते. त्याला तो अपमान सहन झाला नाही, तो थेट घरी आला. घरात कुणीही नव्हते. घरी आल्याबरोबर रागाच्या भरात त्याने दार लावून घेतलं आणि छताच्या पंख्याला दोर बांधून गळफास घेतली आणि नेहमी अपमानित होणाऱ्या आपल्या जीवाला समाधान केलं. 


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy