ठाव
ठाव
श्रावणझडीनं झकूच लावल्यानं आभायात झकार पसरली होती. दुपारचा तीनचा वखुत असुनही वातावरणानं तर दिम्हय पांघरली होती जणू. गयभू आबा मोडक्या खुर्चीत रेलून पडणाऱ्या पावसाकडं उजाड नजरेनं पाहत होते. समोरच्या आपल्या हवेलीच्या भिंती झडीच्या पावसानं शेवाळून निळ्याशार झाल्या होत्या. वरच्या माळाच्या पत्र्याच्या वळचणीत पारवे, सायंका पोपट, टूकूर टुकूर पाहत जीव मुठीत धरून बसलेले होते. त्यांच्या संख्येत मात्र हल्ली कमालीची घट झाल्याचं गयभू आबास जाणवत होतं. काशी होती तेव्हा हवेलीत राहत असताना झडी लागली की ती या पाखरांना हवेलीच्या कोरड्या भिंतींच्या आडोशाला किंवा परसात झाडाखाली तांदूळ, दादर, बाजरीचा चुरा नित्यनेमानं चारी. तिच्या या बिनकामी उपद्व्यापास गयभू आबा हसत हसत चिडवे. "काशी काय लावलंस हे! ती उंडार पाखरं तू टाकलेले दाणं खाऊन आपल्याच हवेलीवर विष्टा टाकून चितरबितर करतात!"
"अहो आखाड सावनात झडीत जंगलात काही तयार होत नाही नी बिचारी मुकी पाखरं कुठं जातील चरायला! म्हणून चारतेय..."
काशीचं बोलणं आठवलं नी आबाच्या पापणकडा काशीच्या आठवणीनं ओलावल्या. त्यांनी काठीचा आधार घेत उठून दोन तीन डबे झामलत बाजरी शोधली व राहत असलेल्या मशीन घरच्या अंगणात कोरड्या कोरीवर टाकली. पण पाखरं खाली आलीच नाहीत.
आबा हताश भेसूर हसले.
"खारे बाबांनो! आता तुम्हास चारायला काशी थोडीच येणार..."
संध्याकाळी त्यांना भुकेची जाणीव झाली. सकाळी त्यांनी काहीच खाल्लं नव्हतं. मुलांनी हवेली विकायला काढलीय हे कळल्यावर त्यांनी संतापात सकाळी स्वयंपाकच केला नाही. पण कुडीत प्राण असेपर्यंत देहधर्म कुणाला चुकणार!म्हणून त्यांना आता सपाटून भुकेची जाणीव झाली. सगुणा व मोहन बाबू गावी गेल्यानं भाकरी त्यांना थापाव्याच लागणार होत्या. त्यांनी पावसानं सर्दावल्या कापसाच्या काड्या चुलीत घालत पेटवल्या पण आगीपेक्षा धुराचा गराटाच घरात जास्त मातला. डोळे चोळत 'आपल्या जीवनातही असाच गराटा मातलाय' या जाणिवेनं धूर गेलेले डोळे पाणावलेच. त्यांनी पीठ कालवत भाकरी थापून तव्यावर टाकली.
काशी किती दूरदृष्टीची होती. जीवनातून निघून जाण्याचा वखुत तिला कळला असावा. आठ दिवस आधीच हाताला काहीतरी लागलं व भाकरी टाकता येत नाही अशा बहाण्यानं उतारवयात भाकरी थापवायचं शिकवून गेलीय आपल्याला! त्यावेळेस 'जीवनात कधी गरज भासलीच नाही भाकर थापायची नी आता या उतारवयात काय थापायची भाकर?' सांगत आपण तिला चिडवलं.
”अहो शिकलेलं वाया जात नाही!" सांगत थापवायला शिकवलंच.
नी आज..... खरंच.
तव्यावरची भाकर करपायला लागताच गयभू आबा भानावर आले. त्यांनी भाकरीवर चटणी तेल टाकत कसाबसा पोटाला आधार केला. त्यांनी झोपायची तयारी चालवली पण त्यांना माहित होतं झोप लागणारच नाही. काशी गेली ती आपली झोप घेऊनच. तुकड्या तुकड्यानंच एक दोन डुलकी काय तेवढीच झोप. पावसाचा जोर पुन्हा वाढला तसा गल्लीतलं पाणी घराच्या कोरीपर्यंत वर आलं. समोरच्या चौकातला राजखांबाचा दगडी ओटा पाण्यात बुडाला. गाव दरवाज्यात गावातून वाहून येणारं पाणी मावत नव्हतं. तप्तीमाय दोन्ही काठ वाहत असावी व थयीथयीनं गावात घुसायची तयारी करत असावी. तसा लाटांचा आवाज कानावर येत होता. काशीच्या उरल्यासुरल्या अस्थी त्या मायनं इमानेइतबारे समुद्रात बहुतेक पोहोचवल्याही असतील! काशीनं का एवढी घाई केली आपणास सोडून जाण्याची! गयभू आबानं खाटेवर कूस बदलवली.
मशीन घरात उंदीर धुमाकूळ घालत होते. तशाच आठवणीही त्यांच्या मनात धुमाकूळ घालू लागल्या. हवेलीसोबत हे घरही विकायला काढलंय. काशीनं निदान मोहन बाबू व सगुणामुळं का असेना पण अखेरचा निरोप हवेलीतून घेतला! पण आपणास हवेलीचाही ठाव मिळणार नाही की काय? देवा प्रत्येक माणसाची हयात कुठंही गेली तरी अखेर त्याच्या गाव पंढरीतल्या ठावातच व्हावी हीच तर इच्छा असते. मला लाभेल ना माझा ठाव? पण हवेली विकली तर? का विकायच्या आधीच घ्यावा निरोप? नी भेटावं काशीला?
पण या पळवाटेनं काशी स्विकारेल आपल्याला? ती तर लढवय्या होती. असली ढरपोक माणसं, डरपोक मरणाची तिला घृणा होती. मग आपण का ती वाट निवडावी? नाही हवेलीचा ठाव तर निदान काशी निमाली ती तापीमायची गावथळी तरी लाभू दे रे बाबा! आबा त्या विधात्याचा धावा करू लागले.
कशी वागतात माणसं! ज्याच्यासाठी, ज्या आपल्या आतड्या कातड्याच्या माणसासाठी आपण हयात झिजवावी तीच माणसं परकी होतात तर जगात ज्यांच्याशी काहीच संबंध, नातं नसतानाही मोहनबाबू, सगुणासारखी माणसं जीव ओवाळून टाकतात! खरंच 'ज
ीवन अनेक गाठींची गुंतावळ (गुथामुथ) आहे', असं काशी नेहमी म्हणायची. दोन वर्षापूर्वी अशाच श्रावणझडीत सगुणा व मोहनबाबू काशीमुळंच आपल्या जीवनात आलेत व आज आपला आधार होऊन बसलेत. का काशीला हे ही कळलं असावं व आपल्यासाठीच तिनं यांना जवळ केलं होतं.
सहादूनं महादूस हवेली विकायचा बहाणा केला नी बेघर केलं. आपलं हे मशीनघर कामास आलं व या घरात आलो. त्या दिवशीही असाच पाऊस होता.
मोहन हा गावातील बॅंकेत क्लर्क म्हणून नोकरीस लागला. त्याचं जवळचं असं कोणीच नव्हतं. या गावात येण्याआधी एक वर्ष तो दुसऱ्या गावास लागताच त्यानं सगुणाशी लग्न केलेलं. पण या लग्नास घरचा विरोध म्हणून सगुणाला माहेर तुटलं. त्यात मोहनची या गावात बदली झाली. तीन दिवस एकटा बॅंकेतच राहत त्यानं गावात कशीबशी खोली शोधली. छोटंसं गाव तापीकाठावर वसलेलं संपन्न असलं तरी पक्कं एकलखुरं. जुन्या विचारसरणीचं.
एखाद्या गोष्टीस एखाद्यानं नकार दिला तर अख्खं गाव नकार देई व एकानं घेतली तर बघता बघता विकली जाई.
मोहन बाबू आपल्या गरत्या सगुणेसोबत तात्पुरता बाडबिस्तरा घेऊन आला. पडत्या झडीत तो गावात आला पण ज्यानं खोलीस होकार दिला होता त्यानं ऐन वेळेस नकार दिला. बॅंक सुटी असल्यानं बंद. गावात ओळख नाही. जायचं कुठं पडत्या पावसात? मोहन बावचळला. तो गयावया करू लागला. पण ना तर ना च. गरती सगुणा भिजत नवऱ्याकडं ठाव नसलेल्या नवख्या गावात टकामका बघू लागली. मोहननं परतत बस स्टॅण्ड गाठलं व तालुक्याला परतून लाॅजमध्ये थांबण्याचा विचार केला. माहेर गडगंज असूनही दुरावल्यानं सगुणाला रडू कोसळलं. त्यात झडीमुळं व तापीकाठचं गाव म्हणून गाडी आलीच नाही. बस स्थानकावरच्या पिंपळाच्या पारावरच अंधार पडायला सुरूवात झाली. पावसाचा जोरही वाढला. पिंपळाच्या खोडाच्या आडोशाला कुडकुडत हातात हात घेत एकमेकाची ऊब व धिरावा शोधत ते उभे होते. गावातले लोक फिरकेतच ना. जर कोणी चुकून आला तरी थांबेना. जवळच असलेल्या मशीन घरातून ओलेत्या गरत्या अनोळखी सगुणेस केव्हाची थांबलेली पाहून कोण असावेत ही पोरं? काशीबाईस दया आली. ती पडत्या पावसात घोंगडं घेऊन आली.
"कोण रं पोरांनो? कुठं जायचंय? का थांबलेत पावसाचे?"
त्या सरशी सगुणेच्या डोळ्यात टचकन पाणी आलं.
"मावशी, मी इथं बॅंकेत नवीनच बदलून आलो क्लर्क म्हणून. पण ज्यानं खोली द्यायचं कबुल केलं होतं त्यानं ऐनवेळेस नकार दिलाय. दुसरंही कोणी उभं करत नाही. आता गाडी पण नाही परतायला. म्हणून थांबलोत इथंच.”
काशीबाईनं सगुणेस घोंगड्यात घेत घरी आणलं. सगुणा तर ओळख नसतानाही काशीबाईस लेकीगत बिलगली. काशीबाईस आपलं गाव कसं आहे याची पुरती जाण असल्यानं व पोरीची अवस्था पाहून त्यांना थेट घरी आणलं. दोन तीन दिवस गयभू आबाकडंच राहूनही मोहनला खोली मिळेना. काशीबाईनं आबास पोरास हवेलीचं विचारायला लावलं. हवेलीचं नाव काढताच आबा पेटला.
"काशी जे स्वत:च्या जन्मदात्यास बाहेर काढतात त्यांना काय विचारतेस गं पुन्हा!" आबा कळवळून बोलले.
"अहो तसं नाही पण ज्याला ठाव नसतो ना, अशांसाठी करताना आपणास कमीपणा जरी घेण्याची वेळ आली तरी घ्यावा माणसानं. कारण ठाव नसलेल्यांना ठाव दिला तर असली माणसं उपकार विसरत नाही!"
काशीबाईनं सहादूस फोन करत हवेली भाड्यानं द्यायला लावली. सहादूनं आधी नकार दिला पण काशीबाईनं विनवत,
"पोरा सुनी पडण्यापेक्षा राहत्या घरात दिवा जळेल लक्ष्मी नांदेल, बघ विचार कर..." समजावलं.
सहादूनं होकार देताच मोहन बाबू व सगुणा मशीन घराजवळच्या गयभू आबाच्याच टोलेजंग हवेलीच्या सहादूच्या हिश्यात रहायला लागले. सगुणाला पडत्या पावसात व आपल्या अशा बिकट परिस्थितीत मदत करणारी काशीबाई आईच वाटली. त्यानंतर सगुणा काशीबाई व आबाजवळच राहू लागली. मोहनही आबांना त्याच्या परीनं सर्वतोपरी मदत करू लागला. सगुणेचं पहिलं बाळंतपण काशीबाईनीच केलं. माहेरचं कोणीच आलं नाही म्हणून सगुणा रडू लागली की काशीबाई आईसारखी धावे. तर ज्यांना जन्म दिला ते दोन्ही पोरं ढुंकुनही पाहत नाही नी मोहन बाबु व सगुना
त्यांची लेकरासारखीच काळजी घेत म्हणून त्यांनाही उभ्या हयातीत शून्यातून उभारलेलं सारं विश्व डोळ्यादेखत आपल्यांनीच ओरबाळल्याचं दु:ख जे नासूर बनत होतं त्याची तिव्रता या दोघांच्या प्रेमानं कमी होत होती. पण पोटची पोरं? त्यांना चैन पडू देत नव्हती.
गयभू आबानं कूस बदलली.... पावसानं तर थैमान घालत आपला जोर वाढवला.
क्रमश: