तर्री
तर्री
शंकर सैपाकी आज जरा लेटच उठला. शाळेला आणि पर्यायाने वस्तीगृहाला सुट्ट्या लागल्यामुळे त्याला दुसरं कामच नव्हतं. जरा रानात फिरून यावं म्हटलं. मोबाईल असूनही घराच्या आसपास रेंज नव्हती. माळात जरा टाईमपास होईल आणि एखाद्याला फोनही करता येईल असा विचार करून शंकर मोबाईल घेऊन माळाकडे निघाला. चायना मोबाईलच्या आवाजाने सगळा माळ दणाणून सोडला.
"हॅलो सर, काय म्हणत्येय सुट्टी?" शंकरने पवार सरांना कॉल केला.
"कोण? शंकर? बोल, काय म्हणतोस?" पवार सर.
"काय नाही म्हटलं, कालची तर्री पचली की नाही?" शंकरने हसत हसत विचारलं.
"अरे, काय सांगू, तुझ्या तर्रीने मोठा घोटाळा करून ठेवला ना, भाै!"
"काय झालं?" शंकरने आश्चर्याने विचारलं.
"काय सांगू वेड्या, निकम सरांना अॅडमीट करावं लागलं ना, तुझ्या तरीमुळे."
"कोण, पानीकम?" पांडूरंग निकम सरांना सगळेच पानीकम म्हणायचे. प्रसंगाचं गांभीर्य ध्यानात न घेता शंकर सहज त्यांना पानीकम बोलून गेला.
"अरे, पानीकम काय म्हणतोस? शिक्षक आहेत ना ते! का तुझ्यासारखे कामाठी, सैपाकी आहेत?" पवार सरांचा सूर काहीसा रागावलेला वाटत होता.
"सॉरी, सॉरी. काय झालं त्यांना?" जीभ चावत शंकर म्हणाला.
"काल तुझी तर्री वरपली चवाचवानी. मग निम्म्या रात्री लागलं पोट दुखायला. तेवढ्या रात्री गाडी काढली न् लगेच शिव्हीलला अॅडमिट केलं. एक तांब्याभर तर्री काढली त्यांच्या पोटातून." पवार सरांनी एका दमात सगळी कथा सांगून टाकली.
"बाप रे!!!"
"अरे, बाप रे काय म्हणतोस? अजून एक तास लेट झाला असता." तर निकम सरांचं काम तमाम झालं असतं. पवार सर म्हणाले.
दोन मिनिटं कोणीच काही बोललं नाही.
"आता तुम्ही कोठे आहेत?"
"आँ?" शंकरचा प्रश्न सरांनी नीट ऐकलाच नसावा.
"तुम्ही शिव्हिललाच आहेत का? आणि डिस्चार्ज केव्हा देणार आहेत?"
"हो... आम्ही आहोत सिव्हिललाच. दिवे सर, काकुळते सर आहेत सोबत. कदाचित संध्याकाळपर्यंत देतील डिस्चार्ज." पवार सर.
"बरं ठेवतो." काहीच न सुचून शंकरने कॉल डिसकनेक्ट केला.
कालचीच गोष्ट.
शाळेला सुट्टी लागली. मुलं आपापल्या घरी निघून गेली. आश्रमशाळेच्या शिक्षकांनी ठरवलं, मस्त पार्टी करूया. मग काय, पाच सहा जणांनी कॉन्ट्री केली आणि चार किलो ब्रॉयलर चिकन आणलं. मीठ मसाला तर शाळेच्या कोठीतच होता. मुख्याध्यापक पार्टीत सहभागी झाले नाहीत तरीही जोडीदारांना एवढ्याशा गोष्टीसाठी नकार देणं त्यांच्या जीवावर आलं. त्यांनी नकार दिला असता तरी कोठीच्या चाव्या शंकर सैपाकाच्या काब्यात. त्याला उल्लू बनवणं फारसं अवघड नव्हतं. घेतल्या मूठभर मोहऱ्या तर कोणाला पत्ता लागणार?
शंकरसारखा सैपाकी मास्तरांना शोधून सापडला नसता
. मटन चिकन बनवण्यात तर तो एक्सपर्टच होता. पवार सरांना त्याच्या हातची बिर्याणी खायची होती पण खास दमणहून आणलेले खंबे पचवायचे असतील तर रस्सा पाहिजेच असा दिवे सरांचा आग्रह पडला म्हणून बिर्याणीचा बेत कँसल झाला.
"सर तर्री घ्या तर्री." तर्री शब्दावर शंकर असा जोर द्यायचा की न पिणाऱ्यालाही प्यायचा मोह व्हावा.
तेज तर्रार तर्री! तिखट आणि चवदार. तिखट इतकी की जाग्यावर जुलाब सुरू. चवदार इतकी की जुलाबाची फिकीर न करता दोन एक कप जास्तच पिणार. मास्तरांनी दारू जास्त प्यायली की तर्री याचा हिशोब लावणं कठीण असलं तरी निकम सरांनी तर्री जास्तच घेतली असावी. सगळ्या पिताडांध्ये फक्त तेच शुद्धीवर वाटत होते.
निकम सरांना प्रत्यक्ष भेटल्याशिवाय शंकरला चैन पडणं मुश्किल होतं. तो चुपचाप घरी आला. कपडे बदलले आणि तो नाशिकला जायची तयारी करू लागला. आईने विचारलं तर म्हणाला, सहज जातोय. आपल्या जीवाला लागलेला घोर आईच्या जीवाला लागावा असं कोणत्याही मुलाला वाटणं शक्य नाही.
हे म्हणजे पार्टी कोणाची शिक्षा कोणाला! मोठ्या साहेबांना कळलं तर काय शिक्षा करतील कोणास ठाऊक! मागे एकदा मोठ्या साहेबांनी एवढ्याशा कारणावरून एका शिपायाला नोकरीवरून काढलं होतं. एवढ्यावरच त्यांचं समाधान झालं नाही म्हणून त्याला लाथाबुक्क्यांनी तुडवल्याचं शंकरने प्रत्यक्ष स्वत:च्या डोळ्यांनी पाहिलं होतं. आपल्यावर अशी वेळ येऊ नये म्हणून तो मनोमन प्रार्थना करू लागला. एवढं सगळं झालं नाही तरी लोकांना कळलं तर बदनामीची भीतीही त्याला सतावू लागली.
तालुक्याच्या गावी येताच बाळाने बाळसं धरावं तशी मोबाईलने पुन्हा रेंज पकडली.
"हॅलो, दिवे सर. आता कशी आहे निकम सरांची तब्येत?" पवार सरांचा नंबर आऊट ऑफ रेंज होता म्हणून शंकरने दिवे सरांचा नंबर ट्राय केला.
"म्हणजे?" दिवे सरांनी आश्चर्याने विचारलं.
"त्यांना अॅडमिट केलंय ना शिव्हिलला?"
"का बरं?"
दिवे सर असं का विचारताहेत हे शंकर सैपाक्याला कळत नव्हतं. पवार सर म्हणाले होते दिवे सर, काकुळते सर सिव्हिललाच आहेत. मग दिवे सरांना ही घटना माहीत कशी नाही. की आपल्या ऐकण्यात काही चुकी झाली.
"......."
"काही कल्पना नाही बुवा. आणि तुला कोणी सांगितलं?"
"..........."
"बरं, बरं. तू थांब मी पाच मिनिटात तुला कॉलबॅक करतो."
किती गाड्या आल्या न् भरून जिल्ह्याच्या गावाकडे निघून गेल्या. दिवे सरांची पाच मिनिटे संपायची नाव घेईनात. त्यांचा फोन काही येईना. पवार सर रेंजमध्ये येईना. पवार सरांनी चेष्टा केली की, ते सिरिअस होते हेही सैपाक्याला कळेना. घरी जावं की सिव्हिलला याचा निर्णय शंकरला घेता येईना. वेड्यासारखा तो कधी एसटी तर कधी काळी पिवळीकडे पाहत बसला.