पितळ
पितळ
ते शिमग्याचे दिवस होते. शिमग्याचे वीर नाचवून सारा गाव शांतपणे झोपी गेला होता. सदाही दोन तासांपासून तळमळत झोपण्याचा प्रयत्न करत होता. आत्ताशी कुठं निद्रादेवी त्याच्यावर प्रसन्न होत होती. दोन तासांची तपश्चर्या फळाला येत होती. अशातच गावातील सर्व कुत्री हेल काढून रडू लागली. जणू गावात कुणी मेलं आणि रडायला माणूसच शिल्लक नाही. त्यांचं ते विचित्र रडणं सदाचं काळीज चिरत गेलं. तिरमिरीत सदा उठला आणि दार उघडून बाहेर आला. अंगणाच्या कडेला पडलेला मोठासा दगड कुत्र्यांवर भिरकावला तशी ती सगळी शेपूट घालून पळाली आणि गल्लीच्या दुसऱ्या टोकाला जाऊन रडू लागली. सदाने अंग मोडून आळस दिला. दारातून आत शिरता शिरता सदाने सहज मागे पाहिलं तीन-चार मैलांवर पितळ्या डोंगर उभा होता.
सदा आत आला. दार बंद करून खाटेवर पडला आणि पुन्हा नव्याने झोपेची आराधना करू लागला. परंतु आता त्याच्या मनात सारखे पितळ्या डोंगराचेच विचार येत होते. जणू तो त्याला खुणवत होता 'ये आज खूप तोफगोळे पडतील.' आता होईल ते होवो. मनाचा धडा करून सदा उठला. अंगावर सदरा चढवला. खुंटीवर टांगलेली मळकट पिशवी खांद्याला अडकवली. कोपऱ्यात पडलेली काठी हातात घेतली. 'रातच्याला बरी असती. किडूक मिडुकच काय पण मोठ्यात मोठं जनावर एका टोल्यात आडवं पडंल.' चार्जिंगची बॅटरी दुसऱ्या हातात घेतली. अंगावर डोक्यापासून कमरेपर्यंत शाल गुंडाळून घेतली. आपल्या नेहमीच्या हत्यारांनी सज्ज होत त्याने दाराच्या मागे ठेवलेल्या चपला पायात सरकवल्या. पाठीमागे आवाज न होता दार हळूच ओढून घेतलं. नाहीतर नुसत्या आवाजानेही आई जागी व्हायची. 'तिथं काय तुझ्या बापाचा मुडदा उकराया चाललाय?' ह्या प्रश्न शिवाय आईचं बोलणंच सुरु व्हायचं नाही.
आज त्याला पहिल्यांदाच आईच्या पाया पडावं वाटलं. तसं पाहिलं तर आजवरच्या अनेक मोहिमांत त्याला आईच्या आशीर्वादाची गरज पडली नव्हती. 'पण आजच असं का व्हावं? न जाणो ही आपली शेवटची मोहीम असावी. पितळ वेचता वेचता एखादा गोळा पडून आपण मेलो तर...'
कल्पनेनेच सदाच्या अंगावर शहारे आले. पण तरीही ही न घाबरता तो निघाला. गल्लीच्या दुसऱ्या टोकाला त्याचा जिवलग मित्र महादू रहायचा. चोरून दूध पिणाऱ्या मांजरासारखा दबकत दबकत सदा महादूच्या घराकडे निघाला. कुणी हाटकलं तर त्याच्याकडे उत्तर नव्हतं. सगळा गाव झोपला असला तरी आपल्याला चोरून कोणीतरी पाहत असल्याचा भास त्याला होत होता.
सदाने महादूच्या दाराची कडी वाजवली. आतून काहीच आवाज आला नाही. 'झोपला असेल बहुतेक. एवढ्या रात्री त्याची झोपमोड का करावी? जरी महादू यायला निघाला तरी त्याची बायको येऊ देईल का?' हाही प्रश्न होताच.
महादू हा सदाच्या प्रत्येक बऱ्या-वाईट कामाचा भागीदार होता. सदाच्या पाप-पुण्याचा मुख्य साक्षीदार. त्याला सोबत घेतल्याशिवाय ऑपरेशन पितळ्या डोंगर यशस्वी होणार नव्हतं. आता घरी जाऊन झोपून घ्यावं असा विचार सदाच्या मनात आला. पण त्याआधीच त्याचे पाय पितळ्या डोंगराची वाट चालू लागले होते. पाय नेतील तिकडे सदा चालत होता.
समोरच तीन-चार मैलांवर लाखांचा पोशिंदा पितळ्या डोंगर उभा होता. हा डोंगर म्हणजे एक भली मोठी टेकडी होती. देवळाली आर्टिलरी सेंटरमधून अनेक वेळा या टेकडीवर तोफगोळ्यांचा मारा होत असे. तोफगोळ्यांतून उडालेले पितळ, ब्रांझ, निकेल वगैरे धातू गोळा करून ते भंगार बाजारात विकून अनेकजण आपलं पोट भरत होते. खूप जणांचे संसार या पितळ्या डोंगराने सावरले होते. त्यापेक्षा अधिक उध्वस्त झाले होते. पितळ विकून व्यापारी गबर झाले होते. पण पितळचोरांना फारच थोडे पैसे मिळायचे. वरून पोलीस वगैरे पकडतील याची टांगती तलवार सतत डोक्यावर असायची. कधीकधी खंदकात लपून बसलेल्या टोळीवर चुकून एखादा तोफगोळा पडायचा. मग बिचार्यांना मारण्याशिवाय पर्याय नसायचा. नाहीच मेलं तर हातपाय तुटायची फुल्ल गॅरंटी! हात पाय नाही तुटले तर डोळे कामातून जायचे. अनेकांच्या चेहऱ्यावर बॉम्बस्फोटाचे विचित्र डाग पडायचे. सदाच्या दहेगावात अशी उध्वस्त झालेली अशी अनेक कुटुंबे होती.
सदा एकटाच पितळ या डोंगराकडे जाऊ लागला. ही वाट त्याच्या इतकी परिचयाची झाली होती की डोळे झाकूनही तो पितळ्या डोंगराकडे जाऊ शकला असता. पितळ वेचण्याचं कौशल्य त्याच्या रक्तातच होतं. त्याचा बाप शंकऱ्या अटल पितळचोर होता. त्याच्या सगळ्या टोळीपेक्षा दोन तुकडे अधिकच पितळ त्याच्या झोळीमध्ये असायचं. त्याच्या हावरटपणामुळे त्याचे सगळे दोस्त त्याच्यावर जळायचे. त्याच हावरटपणापायी एक दिवस डोक्यात गोळ्या पडून मेला बिचारा! सदाच्या चुलत्यानेच म्हणजे दाम्यानेच शंकऱ्याला उचलून आणलं होतं. सदाला अजूनही आठवतो तो रक्ताळलेला चेहरा. त्याच्या आईला तर कापरच भरत. पितळ्या डोंगराचे नाव घेताच तिच्या हातापायावरून वारं जातं.
सदाची आई मोठी धीराची बाई होती. नवरा मेल्यानंतर सगळं आयुष्य तिने उघड्या कपाळाने काढलं. सदाला वाढवलं. चांगलं शिकवून मोठं केलं. तिच्या दिराने जावेने तिला घराबाहेर काढण्याचा प्रयत्न केला. पण गाव सोडून गेली काही नाही ती गेली असती तर दाम्याने तिची जमीन बळकावली असती. सदा तिच्या जगण्याचा एकमेव आधार होता. त्याला ती जिवापाड जपत होती. त्याला कुठं दुखलं खुपलं तर लगेच घाबरी व्हायची.
सदा आपल्याच विचारात चालला होता. 'एवढं शिकून काय फायदा? आईने रक्ताचं पाणी करून वाढवलं, शिकवलं. पण काय उपयोग? वाया गेलं सगळं! गाववाले म्हणतात, 'बारावी शिकलं म्हणजे लय झालं.' 'लय कसं अर्धवटच झालं. नोकरी मिळत नाही. सुतार-गवड्यांच्या हाताखाली काम करण्याची लाज वाटते. एवढी सोन्यासारखी जमीन आहे पण अौत हाकायची अक्कल नाही. चांगला मिलिट्रीचा कॉल आला होता. पण आई पाठवल तर ना! म्हणे, 'एकुलता एक मुलगा मुलकाच्या तिरी गोळी लागून मेला तर?' 'तर काय? जन्माचं कल्याण होईल. चार लोक नाव तरी घेतील. इथं अंगावर बॉम्ब पडून मेलो तर कुत्र पण विचारणार नाही. मृत्यूच्या विचारांनी सदाच्या अंगावर पुन्हा काटा उभा राहिला.
'पण आपण तरी काय करणार? आयतं बसून आई किती दिवस आपल्याला पोशिल? गाववाले पण साले भीक पण घालत नाही. चोऱ्यामाऱ्या करून तुरुंगात जाण्यापेक्षा हा धंदा एकदम मस्त आहे. फार नाही पण पोटापाण्याचा प्रश्न तर सुटतोय. आईच्या नकळत हे व्यसन जडलंय आपल्याला. सुटता सुटत नाही. आईला कळलं तर वैतागून जीव देईल. कुणी सांगावं, चिडून आपलाच जीव घ्यायची.'
सदाने मागे वळून पाहिलं. त्याचं गाव खूप दूर राहिलं होतं. रातकिड्यांची किरकिर त्याला एकटं असल्याची जाणीव करून देत होती. पण घाबरायची काही गरज नव्हती. थोड्याच अंतरावर एक झोपडी होती. ती पितळ चोरांचा खास पेट्रोल पंप होती. सदाचे पाय आपोआपच झोपडीकडे वळले. 'दारू पण अशी चीज आहे की दोन घोट पोटात जाताच मरणाचं भय पळून जातं. सुखात आणि दुःखातही दारू सोबत असते. मेल्यावरही मुडद्याच्या उशाशी दारूची बाटली ठेवावी लागते. थोडक्यात सांगायचं म्हणजे मेल्यावरही ही माणसाच्या सोबत येते ती दोन घोट दारू!'
सदा झोपडीच्या अगदी मागे जाऊन कानोसा घेऊ लागला. मध्ये पिताडांची पार्टी चालली होती. बेवड्यांचे हास्यविनोद, काळ्या गुळाच्या दारूचा फक्त दारुड्याला मोहक वाटणारा वास, पेल्यांचा आवाज ह्यामुळे सदाच्याही तोंडाला पाणी सुटलं. अचानक
खी:खी:चा हास्यस्फोट कानी आला. आवाजाने सदा दचकला. हा आवाज नक्की दाम्या काकाचा होता. आई म्हणते, 'काकापासून सावध रहा. असा राग येतो ह्या काकाचा! वाटतं, पितळ चोरताना अंगावर गोळा पडून मरावा. गावातील घाण तरी जाईल एकदाची! काकाच्या लक्षात यायच्या आत आपण इथून सटकलं पाहिजे.' पाणवठ्यावर आलेला काळवीट जसा वाघाचा भीतीने पाणी पिताच निघून जातो तसाच तो काकाच्या भीतीने दारू पितात पितळ्या डोंगराकडे चालता झाला. आपल्याला कोणी चुकूनही पाहणार नाही याची तो पुरेपूर काळजी घेत होता.
झोपडी पासून दूर गेल्यावर आपल्या मागून कोणी येत नाही हे पाहून त्याच्या जीवात जीव आला. विचारात हरवलेला सदा पितळ या डोंगराच्या पायथ्याशी आला. चोरांनी बनवलेली पितळ्या देवाची पितळी मूर्ती चार-पाच शेंदुर लावलेल्या दगडी देवांच्या घोळक्यात आरामात बसली होती. आपल्याला भरपूर पितळ मिळावं आणि आपण सुखरूप असावं म्हणून बहुतेक पितळभक्त या देवाला नवस करत. काहीजण तर आपल्या दुष्मनावरच तोफगोळा पडावा म्हणूनही नवस करत. 'पडला तर नेमका दामू काका वरच पडू दे.' म्हणून सदाने अनेक वेळा नवस केला होता. आजही सदाने पितळ्या देवाला भक्तिभावाने नमस्कार केला आणि तो खंदकात जाऊन बसला.
सदाने खंदकातून आपल्या गावाकडे नजर टाकली. तेथून काही दिसण्यासारखं नसलं तरी विजेच्या खांबावरील चार-पाच दिवे तेथे गाव असल्याची जाणीव करून देत होते. 'आज फायरिंग झाली तर आपली चांदीच होईल आणि आपल्यावर पडला एखादा गोळा तर राखसुद्धा होईल! अशा भयाण ठिकाणी मेलो तर कुत्रसुद्धा आपल्या नावाने रडणार नाही. आपली आईच आपल्यासाठी चार-दोन अासवं गाळील बिचारी! किती स्वप्ने पाहिली होती तिने आपल्यासाठी. पण आपण मात्र तिच्या स्वप्नांना काडी लावली. आपण तरी काय करणार? कामधंदा करता येत नाही आणि फुकट बसून खावत नाही. आपल्या बरोबरीच्या पोरांची लग्न होऊन दोन-चार पोरं पण झाली त्यांना. पण आपल्यासारख्या बेकाराला कोण मुलगी देणार? आणि दिलीच एखाद्याने जीवावर उदार होऊन तर तिला काय खाऊ घालणार? पितळाचे तुकडे? नाहीतरी बायकोची कटकट पाहिजेत कशाला? कशाला म्हणजे? आईला मदत करायला. तिने का जन्मभर कष्टच करत राहायचे? ते काही नाही, आईच्या सुखासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. कुठेतरी कामधंदा करून आपलं आयुष्य घडवलं. पाहिजे नको हे कुत्र्याचं जिणं. उलटसुलट विचार करत त्याला झोप येऊ लागली. झोप असह्य होऊन तो खंदकातच घोरू लागला.
सुखी संसाराची स्वप्ने पाहणाऱ्या सदाला झोपेतही चांगलंच स्वप्न पडलं. स्वप्नात तो नवरदेव झाला होता. गावातल्या त्याच्या ओळखीच्या ठकीशी त्याचं लग्न लागलं आणि आईने आशीर्वाद देतानाच दोघांनाही शेतावर पाठवलं. मग ते दोघेही जोडीनेच शेतावर गेले. आपल्या शेतावर नांगर हाकताना त्याला खूप आनंद झाला. अंगाला घामाच्या धारा लागल्या तसा पाऊस सुरू झाला. नुसता पाऊसच नाही तर जोडीला विजाही चमकत होत्या आणि ढगांचा ही गडगडाट होत होता. आणि विजांचा चमचमाट होत होता. दचकून सदा जागा झाला. क्षणभर आपण कोठे आहोत हेच त्याला कळत नव्हतं. विजा चमकत असूनही पाऊस कसा पडत नाही याचं त्याला आश्चर्य वाटत होतं. पण क्षणातच तो आवाज ढगांचा नसून आपण वेचायला आलेल्या पितळी तोफगोळ्यांचा आहे हे लक्षात येताच त्याला हसू आलं.
एकसारखे तोफगोळे येऊन डोंगरावर आदळत होते. त्यांच्या प्रचंड आवाजाने कानाचे पडदे फाटून जातात ती काय असं वाटत होतं. डोळ्यांची बुबुळं बाहेर काढणाऱ्या अतितप्त उजेडाने जीव नकोसा झाला होता एक गोळा अगदी त्याच्या जवळच येऊन पडला. नशीब खंदकात पडला नाही. नाहीतर सदा 'सदा के लिये' झोपून गेला असता. डोळे बंद करायला क्षणाचाही उशीर झाला असता तर तप्त धूळ डोळ्यात जाऊन कायमचा आंधळा झाला असता.
राजाने प्रसन्न होऊन भिकाऱ्याच्या झोळीत सोन्याच्या मोहरांची बरसात करावी त्याप्रमाणे सदाच्या पुण्यात पितळी मुद्रांची लयलूट करून लष्करी जवान विसावले. तोफांचा भडीमार संपला तरी सदा निवांत बसून राहिला होता. त्याला पितळ वेचायची कोणतीही घाई नव्हती. कारण आज कुणीही ही पितळ वेचायला आलं नव्हतं. शिवाय सर्व तुकडे अजून थंड झाले नसतील किंवा पितळ वेचता वेचता एखाद्या जवानाला पुन्हा बॉम्ब फोडायची हुक्की यायची. तसं झालं तर सदाची काही धडगत नव्हती. गेली त्याच बॉम्बस्फोटामुळे हवेत विषारी वायू भरून राहिला होता. नाकाला मिरची झोंबली आणि डोळ्याला पाणी यावं असा उग्र दर्प निवडण्याची तो वाट पाहू लागला.
दहा-पंधरा मिनिटे निव्वळ बसून घालवल्यावर सदा उठला. बॅटरी सुरू केली. बॅटरीच्या उजेडात पितळी गोळ्यांचं सोनं झालं होतं. पितळाचे तुकडे उचलून भराभर तो आपल्या पिशवीत टाकत होता. लवकरच त्याची अर्धीअधिक पिशवी भरत आली. अचानक त्याची चप्पल जळत असल्याचा त्याला वास आला. क्षणाचाही विलंब न लावता त्यांनी उडी मारली. सदाने त्या जागेवर बॅटरी पार्लि आणि भीतीने गारठून गेला. एक मोठा पितळी बॉम्ब फुटण्याच्या बेतात होता. आता मात्र उरलेले तुकडे त्याला होईना. शक्य तितक्या लवकर तेथून पळून जावं त्याला वाटू लागलं. मृत्यूला त्याने कदाचित पहिल्यांदाच इतक्या जवळून पाहिलं असेल.
'मरू दे ते पितळ. मीच मेलो तर काय भावात पडंल?' आता पुन्हा कधीच पितळ वेचायला न येण्याची त्याने प्रतिज्ञा केली. पितळ्या देवाकडे फिरून न पाहताच तो जणू काळावर विजय मिळवून जात होता. परंतु त्याला काय माहित की पितळ्या डोंगराकडे जाण्याचा मार्ग एकेरी होता. फिरून परत जाणाऱ्यांची पावलं त्या जमिनीत उमटत नव्हती. काळही त्याच्यावर कुरघोडी करेल याची त्याला जराही कल्पना नव्हती.
धावता पळता त्याला धाप लागली आणि समोर वाघ यावा तसा काका त्याला सामोरा आला. दोघांनीही बॅटऱ्या पाडून एकमेकांना निरखून पाहिलं. 'बरा सापडला एकदाचा. आत्ता तुझ्या सगळ्या पापांचा हिशोब पूर्ण करतो.' असं सदा मनाशीच म्हणाला पण सदाने हालचाल करायच्या आत अगोदरच काकाने शिट्टी वाजवली. दबा धरून बसलेले काकाचे चमचे धावत आले. मग कोणतीही ही बातचीत न करता ते सदावर तुटून पडले. प्रतिकाराची कोणतीही संधी न देता सदावर काठ्या-लाठ्यांची बरसात होऊ लागली.
'आपला बाप डोक्यात गोळा पडून मेला नाही. काकानेच त्याला कपटाने मारलं असेल.' हे सदाला उमगलं. पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. रडत ओरडत तो मार खात होता. आपल्याला पाठ दाखवून पळणाऱ्या भक्ताकडे पितळे देव जिभल्या चाटत पाहत होता. पुतण्याला होणाऱ्या वेदना काकाला पहावल्या नाही. तो सदाच्या मदतीला धावला. काकांनी आपल्या काठीचा एकच जोरदार फटका सदाच्या डोक्यात घालून जीवनातील सर्व दुःखांपासून त्याची सुटका केली. पितळ्या देवाच्या सर्वांगावर रक्ताचा अभिषेक झाला. सदाची कवटी फुटून मेंदू बाहेर आला काकाने त्याला तसाच उचलला आणि त्याच्या आईच्या पुढ्यात घेऊन टाकला. सदाच्या आईने हंबरडा फोडला. काकाजवळ उत्तर तयार होतं. पितळ्या डोंगरात पितळ वेचत असताना अंगावर बोंब पडून मेला. सर्वांचाच यावर विश्वास बसला असं नाही, पण आक्षेप घ्यायची कुणालाही गरजही पडली नाही. आता सदाची जमीन आईच्या नंतर काकाच्या घशात जाणार होती. पितळ्या डोंगराच्या नावाखाली काकाने दोन खून पचवले सहज पचवले होते.
पण पितळ्या देवाला त्याबद्दल काहीही घेणं-देणं नव्हतं. कोणत्या का मार्गाने होईना पण ह्या वर्षीचा नरबळी त्याला मिळाला होता.