कोरा चहा
कोरा चहा


गबाळ्या वेशातील काहीसा अडाणी वाटणारा दूधवाला बराच वेळ हुज्जत घालत राहिला पण बाईसाहेबांनी त्याला दाद दिली नाही.
"पंचवीस रुपये लिटरने हिशोब करा, बाईसाहेब. वीस रुपये लैच कमी होतात."
"अरे, लाज कशी वाटत नाही तुला? पंचवीस रुपये म्हणतोस! निम्यापेक्षा जास्त पाणीच तर असतं तुझ्या दुधात!" ठसक्यात उत्तर आलं.
"आई शप्पथ घेऊन सांगतो बाईसाहेब, खोटा धंदा आपल्याकडून कधी व्हायचा नाही." दुधवाल्याने गळ्याचं कातडं चिमटीत पकडत म्हटलं.
"अशा खोट्या शपथा घेणारे खूप पाहिलेत मी." लेदरच्या बटव्यातून शंभरच्या तीन नोटा काढून त्याच्या हातावर देत त्या म्हणाल्या, "अर्धा लिटरचे महिन्याभराचे तीनशे होतात. हे घे."
"अहो, गरिबाच्या पोटाकडे तरी पहा." त्याचा हात आपसुक पोटाकडे गेला.
"बरं, हे आणखी वीस रुपये घे. आता उगाच कटकट नको करू सकाळी सकाळी." बाईसाहेबांनी दहाच्या दोन नोटा त्याच्या हातावर टेकवल्या.
स्वत:वरच चरफडत त्याने वीस रुपये हातात घेतले. मोटरसायकलला किक मारली. "उद्यापासून तुम्ही दुसरा दूधवाला शोधा." गावाच्या बाहेरपर्यंत केकाटत जाणाऱ्या मोटरसायकलच्या आवाजात त्याचा आवाज विरून गेला.
चट्टेरीपट्टेरी गाऊनचा पायात येणारा घोळ सांभाळत बाईसाहेब किचनमध्ये आल्या. "माजलेत साले! सगळ्यांना नुसता पैसा दिसतोय साहेबांचा! हो, कमावतोय माझा नवरा ढीगभर पैसे. तुमच्यासारख्या भिकारड्यांना वाटायला नाही काही. चार आणे कमावणारा, फडतुस दूधवाला. तुला काय वाटलं, मी अडाणी आहे? उद्यापासून दुसरा दूधवाला शोधा म्हणे. उद्या तूच येशील नाक घासत आणि म्हणशील, बाईसाहेब किती लिटर घालू?"
साहेब कामावरून घरी येईपर्यंत बाईसाहेबांचं स्वत:शीच बडबडणं चालू होतं.
नवरा दमून भागून घरी आल्यावर बायकोने एखादा कप चहा करून द्यावा अशी आजन्म खोटी आशा बाळगणाऱ्या साहेबांपुढेही तिने तीच भुणभुण लावली. टाय काढता काढता त्याच्या मनात विचार आला, या टायनेच स्वत:ला फास लावून घ्यावा किंवा हिचा तरी गळा आवळावा.
आॅफिसमधून येणाऱ्या नवऱ्याची तिने कधी वाट पाहिली नव्हती तितकी वाट तिने आज दुधवाल्याची पाहिली. हलकट मेला!
"अरे या या या! आज कशी काय आठवण झाली म्हणायची आमची?" अवचित आलेल्या पाहुण्यांचं हस्तीदंती स्वागत झालं खरं पण बाईसाहेबांच्या कपाळावर पसरलेलं आठ्यांचं जाळं कु
णाला दिसलं नाही.
"गुड्डू, दुकानात जा आणि दूध पिशवी घेऊन ये." बाईसाहेबांनी पन्नासाची नोट लाडक्या मुलाच्या हातावर टेकवली.
"नो."
"माय लिटिल, स्वीट प्रिन्स प्लीज गो." इंग्लिश मिडियमध्ये शिकणाऱ्या मुलाचा होमवर्क करता करता त्यांचंही इंग्लिश बऱ्यापैकी सुधारलं होतं.
"आधी फाईव रुपये दे. देन आय गो." चिरीमिरी खाण्याची बापाची सवय पोरातही उतरली यात आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नव्हतं. परंतु त्याचा वापर त्याने घरातच करावा याचा बाईसाहेबांना राग आला. पण बाहेर हॅालमध्ये बसलेल्या पाहुण्यांसमोर तमाशा नको म्हणून त्या गप्प बसल्या.
"ओके. पण गुपचूप जा. पाहुण्यांसमोरून आणू नको."
वीस रुपयांची दूध पिशवी दुकानदाराने फ्रीजचा चार्ज लावून पंचवीस रुपयाला दिली. किडलेल्या दातांकडे दुर्लक्ष करत लिटल प्रिन्सने पाचची कॅडबरी खाल्ली. पाहुण्यांची नजर चुकवून तो किचनमध्ये गेला तेव्हा पाहुण्यांशी गप्पा करत बसलेल्या बाईसाहेबांना संकटातून सुटल्यासारखं वाटलं. त्याही लगबगीने उठून किचनमध्ये गेल्या. त्यांनी मुलाच्या हातून वीस रुपये जवळजवळ हिसकावून घेतले.
चहापत्ती टाकून उकळलेल्या पाण्यात बाईसाहेबांनी दूध टाकलं आणि आक्रितच घडलं, दुधाबरोबर चहाही फुटला होता. कपाळावरचा घाम पुसत बाईसाहेब हिशोब जुळवू लागल्या. अर्धा लिटर दुधाचे वीस रुपये, दुकानदाराचा मनमानी चार्ज पाच रुपये, लाडक्या पोराचं कमिशन पाच रुपये. एकूण तीस रुपये. एक लिटरचे साठ रुपये. महिन्याचे झाले सहा त्रिक अठरा आणि दोन शून्य, एक हजार आठशे. निम्मे केले तर नऊशे. त्यापेक्षा आपला दूधवाला परवडला. पावणे चारशेमध्ये ताजं आणि पाणी न मिसळता दूध द्यायचा. पाच पन्नास रुपये वाचवायला गेलो आणि नासकं दूध नशिबी आलं. साखर आणि चहा पावडर वाया गेली ती वेगळीच.
नव्या कोऱ्या क्रोकरी सेटमधून बाईसाहेब चहा घेऊन आल्या.
"कशाला उगाच तकलिफ घेतली?" पाहुण्यांनी कप हातात घेतला. कपातला कोरा चहा पाहून त्यांचं तोंडही चहासारखंच कडू झालं.
पाहुण्यांच्या मनाची घालमेल बाईसाहेबांनी चटकन ओळखली. "आम्ही कोराच चहा पितो. ब्लॅक टी. आरोग्याला चांगला असतो."
बाईसाहेब कशानुशा हसल्या. एका गाढवाने दुसऱ्या गाढवाच्या ताणेत आपला सूर मिळवावा तसा पाहुण्यांनी बाईसाहेबांच्या हास्यात आपला सूर मिसळला आणि कप ओठांना भिडवला.