पाणपोई
पाणपोई




कोणाचा तरी बाजरीचा कट्टा दुकानातून उचलता उचलता शेठने संभाऊला हाटकलं, "सोमनाथ, आपल्याला पाणपोई टाकायची आहे, बरं का! "
"कुठं? " संभाऊने विचारलं.
"मंदिरासमोर. "
"बरं ." असं म्हणून संभाऊ कट्टा घेऊन निघून गेला.
संभाऊला कामाची तशी काहीच गरज नाही पण तरुणपणात काम केलेलं शरीर स्वस्थ बसू देत नाही म्हणून तो पडेल ते काम करतोय. खरं तर पाणपोईसारखं बैठं काम त्याच्या प्रकृतिला मानवणारं नाही, पण कोणालाही नकार देणं संभाऊच्या स्वभावातच नाही.
पाण्याचं दान केल्यानं पुण्य मिळतं असं म्हणतात. पण संभाऊला पाप पुण्याशी काही घेणं देणं नव्हतं. त्र्यंबकेश्वर मंदिरासमोर साधासुधा मंडप टाकून त्यात मोठमोठे माठ ठेवले आणि शेठच्या मृत भावाच्या स्मरणार्थ धर्मदाय पाणपोईचा बोर्ड टांगून संभाऊच्या कामाला सुरुवात झाली.
छोट्या बांबूला दोन पत्र्याचे डबे बांधून संभाऊने एक कावड तयार केली. मंदिरातील अमृत कुंडातून पाणी आणलं. एका डब्यातच दोन्ही माठ धुवून झाले उरलेलं पाणी माठात ओतून संभाऊ पुन्हा अमृतकुंडाकडे गेला. एका माठात तीन चार डबे पाणी मावेल म्हणजे तीन माठात दहा बारा डबे म्हणजे पाच सहा खेपा पाणी वाहिल्यावर थोडा विसावा मिळेल असा विचार करत संभाऊ कुंडावर पोहोचला. दोन्ही डबे भरून परत आला.
संभाऊ परत येऊन पाहतो तर माठात थेंबभरसुद्धा पाणी उरलं नव्हतं. "अर्रर्र, पाणी गेलं कुठं? " संभाऊ स्वतःशीच विचार करत परत निघाला आणि मंदिराच्या दरवाजाकडे जाता जाता मागे मोठा गलका ऐकू आला. पाणपोईपाशी यात्रेकरूंची झुंबड उडाली होती.
कोणी वाटर बॅग, कोणी बाटल्या तर कोणी हातात येईल त्या भांड्यात पाणी भरून घेत होतं. माठातलं पाणी कसं संपलं याचं कोडं सुटलं होतं.
"फोडा साल्यांनो ते माठ! " संभाऊ स्वतःशीच पुटपुटला 'आपण दिवसभर पाणी वाहत राहिलो तरी ही यात्रेकरूंची गर्दी कमी होणार नाही. यात्रेकरूंच्या कृतघ्नपणाचा त्याला खूप राग आला पण काहीच प्रतिक्रिया न देता तो डबे खाली ठेवून फक्त झुंडीकडे पाहत होता.
मालकाला पुण्य मिळावं म्हणून स्वतः उरस्फोड करण्याची संभाऊची अजिबात इच्छा नव्हती.......