STORYMIRROR

Aruna Honagekar

Romance

3  

Aruna Honagekar

Romance

तिसरी घंटा

तिसरी घंटा

3 mins
187

अप्पासाहेब आज सकाळी मार्निंग वाँकला गेले तेंव्हा सर्व जेष्ठ नागरिक एकत्र गप्पा मारायला नेहमीच्या कट्ट्यावर बसले. बंडूकाका जरा खुशीत दिसले आणि गाऊ लागले सखी मंद झाल्या तारका.. अप्पांना जरा आश्चर्य वाटले "काय बंडू आज काय नविन? खुशीत दिसतात. " बंडूकाका म्हणाले"अरे काल नातवाने नाटकाची तिकीटे आणली आणि बोलला तुम्ही आजीला घेऊन जा पहायला. मी तर आश्चर्य चकित झालो. तर म्हणतो कसा आजोबा लाईफ एकदाच मिळते एन्जॉय करायला शिका. मग काय गेलो हिला घेऊन आणि खरचं रे हिचा सहवास किती वर्षांनी मिळाला असे वाटले. नाही कंबर दुखणे नाही गुडघे दुखी सगळे विसरून गेलो बघ. " बंडूला खुश बघून अप्पासाहेबांनी मनाशी ठरवले आपण पण सुमतीला घेऊन नाटकाला जावे. 

 तसा अप्पासाहेबांचा स्वभाव कडक असला तरी वाढत्या वयानुसार 'मी गेल्यावर बायकोचे काय होईल ?'हि चिंता त्यांना आताशा सतवत होती. येता येताच बालगंधर्व नाट्य गृहात जाऊन एका विनोदी नाटकाची दोन तिकीटे त्यांनी विकत घेतली. आज अप्पासाहेब कितीतरी दिवसांनी उत्साही दिसत होते. सकाळी सकाळी नव-याचा आनंदी चेहरा पाहून काहीतरी नवीन बदल सुमतीबाई च्या लगेच लक्षात आला. 

 " चहा घेताय ना? " अप्पासाहेब भानावर आले. सुमती च्या हातातील चहा टेबलावर ठेवून म्हणाले, "सुमा, ", सुमा म्हंटल्यावर सुमतीबाई विचार करू लागल्या. खूप वर्षांनी आज पतीराजांकडून हि हाक ऐकू आली. " अग ऐक ना, आजची संध्याकाळ तुझ्यासाठी. आपण नाटकाला जाणार आहोत. ' सुमतीबाई अप्पासाहेबांकडे पहातच राहिल्या. "पण शंतनू ला कोण सांभाळणार? सुनबाई ला काय सांगू? ", " अग, माझं राजाशी येताना बोलणे झाले आहे, तो करतो म्हणाला शंतनू ची सोय. तू कशाला काळजी करते. त्याची फक्त खिमट करून ठेव. तो मावशींना बोलावणार आहे, ती भरवेल"

  सुमतीबाई उत्साहाने कामाला लागल्या. सुनबाईने पाळणाघरातील मावशीकडे शंतनू ला ठेवण्यासाठी सांगितल्यामुळे अप्पासाहेब त्या ला तीन वाजताच तिथे ठेवून आले. येताना सुमतीबाई साठी मोग-याचा गजरा घेऊन आले. सुमतीबाई नी शंतनू साठी कुकरला खिमट लावून ठेवली. त्या तयारीला लागल्या. खूप दिवसांनी अप्पासाहेबांच्या आवडीच्या गुलाबी रंगाची त्यांनी साडी नेसली. अप्पासाहेब सुमतीला बघून गाणे गुणगुणू लागले. " ऐ मेरी जोहरजबी, तुझे मालूम नही", आणि सुमती च्या केसात गजरा त्यांनी माळला. 

   नाटकाची वेळ झाली म्हणून पटापट दारे खिडक्या बंद करून ते रिक्षाने नाट्यगृहात पोहचले. पहिली घंटा वाजली तसे अप्पासाहेबांनी आपला डावा हात सुमतीबाई च्या खांद्यावर ठेवला. "इश्य! आज काय स्वारी एकदम रंगात आहे वाटतं", " अग, इतकी वर्षे आपण हया मुलाबाळांच करण्यात आपले मजेचे क्षण वाया घालवले, आतातरी मनासारखे जगू." दुसरी घंटा वाजली.सुमतीबाईंना थोडे हलके वाटायला लागले. 

  तिसरी घंटा वाजली आणि नाटकाचा पडदा उघडला. अन् अचानक सुमतीबाई ना कुकरची आठवण झाली. मनात काहूर दाटून आले. "कुकरच्या तीन शिट्टी नंतर कुकर बंद केला का मी? की नाही? काय करू? कसं सांगू ह्यांना? सांगितलं तर रागावतील. " नाटक सुरू झाले पहिल्या च विनोदाला सगळे हसत होते. अप्पासाहेब तर दिलखुलास हसू लागले. पण सुमतीबाई मात्र रडघाईला आल्या. अप्पासाहेबांनी सुमतीबाई चा चेहरा पाहून विचारले, " काय झालं प्रिये तुला विनोद कळत नाही आहे का? " शेवटी सुमतीबाई नी धीर करून सगळे सांगून टाकले. 

   "अग, एवढचं ना, थांब मी सुनबाई ला लवकर घरी जाऊन गॅस तपासायला सांगतो. " सुमतीबाई म्हणाल्या, "नको, नको, शेजारच्या काकूंना सांगूया, त्यांच्याकडे चावी असते. " ताबडतोब अप्पासाहेबांनी शेजारी फोन लावला, " हॅलो, मिलिंद का? अरे जरा आमचा दरवाजा उघडून गॅस बंद आहे का? हे पाहशील का? ", " अहो काका मी बाहेर आहे, पण आईला निरोप देतो, ती पाहून तुम्हाला फोन करेल", अप्पासाहेबांनी सुमतीबाई ना सगळं ठिक आहे,शांतपणे नाटक बघायला सांगितले. सुमतीबाई आता शांत झाल्या. 

   पण आता अप्पासाहेब अस्वस्थ होते कारण नाटकाचा ़़पहिला अंक झाला तरी शेजारच्या काकूंचा फोन आला नाही. दुसरा अंक चालू झाला, आणि फोन वाजला. अप्पासाहेबांनी घाईत फोन उचलला, "कुकर बंद केला आहे, काळजी करू नका. " सुनबाई चा फोन होता. अप्पासाहेबांना मनातून कसेतरी वाटले. "आपण सुमतीला घाई करायला नको होती. पण सुनबाई, नातू, मुलगा हयांच्या चक्रात आपल्या जीवनाच्या नाटकाची तिसरी घंटा सुरू झाली तरी आनंद कधी अनुभवायला मिळणार? काही नाही आतापासून मुक्त व्हायचे आणि बायको बरोबर आनंदी सहजीवन अनुभवायचे" अप्पासाहेब स्वत:शीच म्हणाले. अंधारातील नाटक पाहता उजेडातील नाटक कधी समोर आले हे कळलेच नाही.   


विषय का मूल्यांकन करें
लॉग इन

Similar marathi story from Romance