मी आणि माझे विद्यार्थी
मी आणि माझे विद्यार्थी
बी. एड ची पदवी घेतल्यानंतर मला नेहमी वाटे की आदर्श शिक्षिका बनता नाही आले तरी आठवण म्हणून विद्यार्थ्यांच्या मनात आपण सदैव राहावे. म्हणतात ना, मरावे परी किर्तीरूप उरावे.
माझ्या सारख्या मराठी शिक्षिकेला विद्यार्थ्यांनी आपली मराठी भाषा वृध्दिंगत करावी हिच अपेक्षा कायम असते. त्यात आमची शाळा म्हणजे सी. बी. एसी. बोर्ड. मग तर मराठी भाषेत हिंदी., इंग्रजी चे आक्रमण च.
पण काही अनुभव हे आपल्या जीवनातील शाळेत एखाद्या चांगल्या विदयार्थ्यासारखे बरेच काही शिकवून जातात.
दारावरची बेल वाजली. "ओळखलत का मॅम? " क्षणभर मला काही आठवेना. "मॅम मी प्रणव रोकडे. तुमचा माजी विद्यार्थी. " "ओह प्रणव तू इकडे कसा काय? "थोडेसे लाजूनच प्रणव म्हणाला. " मॅम मी आज माझ्या लग्नाची पत्रिका तुम्हाला देण्यासाठी आलो आहे. मला आश्चर्य वाटले कारण पाचवीतील प्रणव आज बोहल्यावर चढताना सुध्दा मला आठवणीत ठेवतो.
त्याचे अभिनंदन करून मला तो पाचवीत असताना चा प्रसंग आठवला. रोज शाळेत जाताना मुलांना काही नवीन माहिती द्यावी हा आम्हा शिक्षकांचा नेहमीचा प्रयत्न. शिकवत असताना काही विदयार्थी मला लगेच कनेक्ट होत होते, त्यातीलच हा प्रणव. पाठानुसार विदयार्थ्यांना रोज नवीन कार्य म्हणजे अॅक्टीविटी करण्यासाठी देणे. प्रणव प्रत्येक कार्य व्यवस्थित करून देत होता. इतर विषयांपेक्षा मराठी विषयावर जास्त प्रेम करू लागला .
एक दिवस अचानक मला त्याने विचारले, " मॅम तुमचे लग्न झाले आहे का? " अचानक आलेल्या प्रश्नाने मी स्तंभित झाले. पण हसून बोलले, "अरे हा प्रश्न का विचारलास? "प्रणव लाजतच म्हणाला, " मला तुमच्या़शी लग्न करायचे आहे., कालच माझ्या मामाच लग्न झाले तेव्हा विचार केला. "त्या ११ वर्षा च्या मुलाचे वाक्य ऐकून मला जोरात हसू आले. पण त्याच्या भावना दुखावल्या जातील म्हणून मी त्याला सांगितले, " अरे तू उदया खूप मोठा झालास की लग्न कर. माझे लग्न झाले आहे पण तुला ृखूप चांगली बायको नक्की मिळेल. "
आज त्याने हया प्रसंगाची आठवण पुन्हा काढली आणि म्हणाला, "मॅम मला लग्न ठरल्या पासून एक गोष्ट सलत होती की मी जी तुम्हाला पाचवी मध्ये मागणी घातली त्यावेळी तुम्ही संयम दाखवून मला खूप चांगल्या प्रकारे समजावले. म्हणून मी आज माझ्या पायावर उभा आहे. आणि सहचारिणीला सांभाळण्यासाठी सक्षम आहे. माझ्या मुळे तुमच्या भावना दुखावल्या असतील तर मला माफ करा. " हे सांगून तो माझ्या पाया पडला. "यशस्वी भव".आशिर्वाद देत असताना हातात मिठाई चा बाॅक्स देऊन तो कधी निघून गेला ते कळलेच नाही.
कधीकधी वाटत, एका शिक्षकाला विद्यार्थ्यांचे प्रेम व आदर आणि त्याच्या जीवनातील यश हया पेक्षा दुसरे काय हवं.
