अविस्मरणीय प्रवास
अविस्मरणीय प्रवास
अनुपमा जेव्हा आगगाडीत बसली तेव्हा बाबांनी किती कष्टाने आपल्याला काही तरी शिकायला पाठवले आहे याची बाबांच्या टाटा मध्ये जाणीव होत होती. आगगाडी सुटली तसे सगळ्या मुलांचे आईवडील 'सांभाळून जा, काळजी घे 'हे शब्द कानावर पडत होते. विचारांच्या गर्तेत दादर कधी आले ते कळलेच नाही.
थोडया वेळाने स्वामीनी अम्मा आल्या . त्यांच्या आदेशानुसार सर्वांनी आपले डबे उघडले. सर्व जण डबा एकमेकांशी देवघेव करू लागले. "अनु, घे ना भेळ हया पिशवी मधून" ज्योती बोलली. अनुपमा भेळ पिशवीतून घेणार तेवढयात "अरे! माझे चिरमुरे खिडकीतून बाहेर उडाले. अनुपमा खिडकी बंद कर पहिले. " ज्योती कळवळून सांगू लागली. अनुपमा ने लगेच खिडकी बंद केली. बघता बघता सगळे जण ज्योती कडे पाहून हसू लागले. अनुपमा ही हसू लागली. तीने ज्योती ला पिशवी तील भेळ पुन्हा ताटलीत ओतून दिली. स्वत: आईने मायेने दिलेली चपाती चटणी खाऊ लागली. सर्व जण बिस्किटे, केक, चिवडा इ. पदार्थ खात होते पण तीला फक्त भूक दिसत होती. रात्र खूप झाली होती. बिहारला पोहचायला अजून एक दिवस होता.
बिहारमध्ये मुंगेर हया ठिकाणी स्वामी सत्यानंद सरस्वती यांच्या आश्रमात योगाभ्यासाच्या शिबिरात पोहोचयचे होते. सकाळी आश्रमात ८ वाजता पोहचल्यावर सगळे लोक टकले पाहिल्यावर सगळ्याना छातीत धडकी बसली. पण नंतर सगळे स्वामी इतके प्रेमाने वागले तेंव्हा दिवस कसा जात होता हे कळत नव्हते. सकाळी ५ वाजता बेल वाजल्यानंतर उठून आंघोळ करून ६ वाजता ध्यानधारणा व योगासने करण्यासाठी हॉलमध्ये हजर राहावे लागे. ज्योती, मीना, समिक्षा १० वर्षाच्या मुली लवकर उठत नसत. "ज्योती, मीना उठा ग लवकर नाही तर उशीर झाला तर स्वामीजी आश्रमाला १० फे-या घालायला लावतील चालेल का? " अनुपमा बोलली. "जा तू मी नाही येत आज हॉलमध्ये" ज्योती बोलली. सर्व जण निघून गेले. ज्योती डोक्यावर चादर घेऊन झोपली. थोडया वेळाने तिला जाग आली. पटापट आवरून कोरा चहा मिळेल या आशेने ज्योती उठली. बाहेर बाथरूममध्ये जाण्यासाठी ती निघाली तर खोलीला बाहेरून कुलूप लावले होते. ज्योती मनातून खूप घाबरली. काय करावे ते सुचत नव्हते. अशावेळी आईची खूप आठवण येत होती. तिथे रडून पण फारसं कुणी येणार नव्हते. तेवढ्यात मुलांचा आवाज ऐकून ती खिडकीजवळ धावत गेली. सगळे जण कपडे धुण्यासाठी हौदाजवळ उभे होते. ज्योतीला अनुपमा दिसली तिने अनु म्हणून जोरात हाक मारली पण सगळ्यांच्या आवाजात अनुपमाला काही ऐकू आले नाही. ज्योती मनातून खूप उदास झाली.
तेवढ्यात अनुपमाचा वाचवा म्हणून आवाज ऐकू आला. ज्योती वरतून पाहू लागली अनुपमाला हौदात घसरून पडलेले पाहून सर्व मुले हसत होती ते पाहून ती पण हसू लागली. अनुपमा कपडे बदलण्यासाठी खोलीची चावी स्वामीनी अम्माकडून घेऊन आली. खोली उघडल्यानंतर ज्योती अनुपमाला बिलगली व रडू लागली. अनुपमाने तिची समजूत काढली. नंतर ज्योतीने पटापट आवरले. दिवस कसे भुर्रकन जात होते.
परतीचे दिवस जसे जवळ येत होते तसे एक दिवस सर्व मुलांना स्वामीजी स्वत: एका बसमध्ये घालून गंगा नदीच्या काठावर घेऊन गेले. नदीचा शांत प्रवाह सर्वांचे मन शांत करून गेला. सर्व जण नदीच्या काठावर ध्यान लावून बसले. स्वामीजींनी नेहमीप्रमाणे गोष्ट सांगून मुलांना ध्यानाला बसवले. आज सर्व मुले मनातून सुखावली होती.
स्वामीजींनी सर्वांना लिची विकत घेऊन दिली. सर्व जण खूप खूष झाले. आज सर्व जण घरी निघण्यापूर्वी एकमेकांना स्वत:चा पत्ता व फोन नंबर देत होते. जणूकाही एका कुटुंबापासून सगळे जण विभक्त होणार होते. ट्रेनमध्ये बसल्यावर सगळे शांत झाले होते पण स्वतः बरोबर एक अविस्मरणीय अनुभव घेऊन जात होते. दोन दिवसांनी मुंबईला पोहचल्यावर अनुपमा वडिलांना पाहून जोरात बिलगली.
