रिचार्ज
रिचार्ज
विश्वास व मेधा एक आनंदी जोडपं, एक मुलगा अमेय जो आपल्या कुटुंबासोबत अमेरिकेत स्थायिक झालेला अस एक हम दो हमारा एक असं कुटुंब.
विश्वास च वय साठीच आणि मेधा पंचावन्न त्यामुळे एकमेकांना आधार देतच आयुष्य पुढे सरलेलं
"अगं जरा पाठीला तेल चोळशील का? " विश्वास म्हणाला, मेधा ने राईच तेल थोडे गरम करून आणले आणि ती विश्वास च्या पाठीवर चोळू लागली. "किती काळजी घेतेस गं, तुझ्या पायाला मी तेल लावू का? " मेधा म्हणाली, "इश्य ! त्यात काय ऐवढे तुम्ही बरं व्हा मग बघू. " मग मेधा आपल्या कामाला निघून गेली.
विश्वास ला अंथरुणावर लोळून लोळून कंटाळा आला होता. बाजूला पडलेला फोन पाहून तो व्हाॅटसअप पाहू लागला, ग्रुप वरची राजकारणं, गुडमॉर्निंग चे मेसेजेस बघून त्याला कंटाळा आला. सहजच फेसबुक उघडले तर शाळेच्या ग्रुप वर कोणत्यातरी सुधाचं स्वागत होत होतं. क्षणभर बोलक्या डोळ्यांची, दोन वेण्या घालणारी सुधा त्याच्या डोळयासमोर आली. तिचा धन्यवाद , चा रिप्लाय आल्यावर त्याने तीला वैयक्तिक मेसेज केला, "हाय, कशी आहेस? " अचानक मेसेज आल्यावर सुधा बावरली."मी ठीक आहे, तू कसा आहेस?" असेच जवळ जवळ अर्धा तास मेसेजिंग झाल्यावर त्याने तीचा व्हाॅटसअप नंबर घेतला. तीचा नंबर बायको ला कळू नये म्हणून डेड बॅटरी या नावाखाली सेव्ह केला.
रोज व्हाॅटसअप वर दोघांच्या गप्पा चालू झाल्या. विश्वास च्या पाठदुखी चे समजल्या पासून सुधाची रोज चौकशी असायची.
एकदा मेधा विश्वास च्या पाठीवर तेल लावत असताना सुधाचा फोन आला. विश्वास ने मेधा ला फोन कुणाचा आहे विचारल्यावर ती म्हणाली, " अहो तुमच्या फोनची बॅटरी डेड दाखवतेय थांबा मी चार्जिंग ला लावते. "
विश्वास काय ते समजला आणि मनातच हसला. मेधा कामात गढल्यावर विश्वास ने सुधाला फोन केला. फोनवर सुधाने विश्वास ला भेटण्यासाठी विचारले. विश्वास ने ही विचार केला आता तो चालू शकत होता त्यामुळे शनिवारी कॅनरा हाॅटेल मध्ये संध्याकाळी ५ वाजता भेटायचे ठरले. आता विश्वास ची स्थिती अगदीच अ़़धीर मन हे झाली होती. गुरूवार गेला, शुक्रवारी संध्याकाळ पासूनच त्याची तयारी सुरु होती.अखेर शनिवार उजाडला. विश्वास सकाळ पासून खुशीत होता. मेधा लाही फरक जाणवत होता. "मग काय आज पाठदुखी कमी झालेली दिसते, सकाळ पासून चालणं वाढलेले दिसते.एकंदरीत चांगले आहे म्हणा मन तरूण तर स्वास्थ्य चांगले राहत नाही का? मेधा ने विचारलेल्या अचानक विचारलेल्या प्रश्नाने विश्वास गोंधळून गेला. " नाही गं आज जेष्ठ नागरिक संघात संध्याकाळी संगीताचा कार्यक्रम ठेवला आहे ,जाईन म्हणतो. " विश्वास ने लगेच मेधा ला सांगून टाकले. "किती वाजता आहे? कारण मी पण महिला मंडळात हळदीकुंकू ला जाणार आहे. ", " पाच वाजता बोलावले आहे पण जरा साडेचार लाच निघतो. पहिल्या रांगेत बसायला मिळेल. " विश्वास म्हणाला.
मेधा केंव्हाच आत निघून गेली होती. संध्याकाळी विश्वास आपल्याला साजेसा असा फिकट रंगाचा टी शर्ट व परफ्यूम मारून कॅनरा हाॅटेल जवळ येऊन उभा राहिला. विश्वास ची अधीरता वाढतच होती.
समोरून येणाऱ्या फिकट गुलाबी रंगाच्या साडीतील सुधाला पाहून विश्वास खूश झाला. दोघे एका कोपऱ्यातील जागेवर जाऊन बसले. दोन मिनिटे काय बोलावे हे दोघांना सुचत नव्हते. मग विश्वास च म्हणाला, "सुधा अगदी पूर्वी सारखीच अजूनही तशीच दिसतेस. तुझ्या केसांमध्ये फक्त पांढरा रंग आला एवढाच काय तो फरक. ", सुधा लाजतच म्हणाली, " तुझं आपल काही तरीच, तुला आठवतय का ? शाळेतून आपली मैत्री काॅलेज पर्यंत १२ वी पुरती राहिली, नंतर तू इंजिनिअर बनायला गेलास. सर्व जण आपल्याला तोतामैना म्हणायचे. पण माझ्या साठी फक्त तू एक चांगला मित्र होतास. "विश्वास ने निश्वास टाकला, " माझ्या साठी मात्र तसे नव्हते, मला तू आवडायचीस, पण विचारायचे धाडस नाही झाले. असो, तुझ्या गाण्याचं काय झाले पुढे? आपण पूर्वी संगीताच्या मैफिली ला जायचो आठवतयं का? "
"अरे संसार गाण्यात इतकी रमून गेली की आता हे गेल्यापासून मुलाचा संसार सांभाळत बसले आहे. सून नोकरी करते ना, कुठे गाऊ आता. " सुधा म्हणाली. "अग, गाण्याला वय नसते तू आमच्या जेष्ठ नागरिक संघाची सदस्य हो तिथे तुझी गाण्याची मैफिल ठेऊ. " विश्वास म्हणाला, "हे बघ मी तुला आमच्या संघाच्या ग्रुप मध्ये टाकलं, आता बोल." सुधा हसू लागली. गप्पा अशाच रंगत गेल्या. कधी ७ वाजले ते कळलेच नाही. दोघेही पुन्हा भेटू या भाषणावर आपापल्या घरी निघाले.
आज विश्वास ने शिटी वाजवतच दारावरची बेल वाजवली, मेधाने हसतच विचारले, "मग काय डेड बॅटरी ऑन झाली का? कसा झाला कार्यक्रम? " विश्वास ची शिटी तोंडातच अडकून राहिली. "अरे मी तुमचा पासवर्ड हॅक करून तुमचे चॅट वाचले साॅरी हं, माझे पण मित्रमैत्रिणी आहेत की बिंदास बोला, एकमेकांना मदत करा .या वयात आपली मुले त्यांच्या विश्वात बिझी असतात अश्यावेळी आपणच एकमेकांना साथ देऊ शकतो. "मेधाच्या या बोलण्याने विश्वास चा ताण कमी झाला. दोघेही हसत हसत पुन्हा नव्याने रिचार्ज झाले.

